राशीन | ऋषभ परदेशी
Rashin: राशीन ग्रामपंचायतीच्या गट क्रमांक १४७६ आणि १४७७ मधील अतिक्रमित जागेची भूमी अभिलेख विभागाकडून अखेर हद्द कायम करण्यात आली. आज, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या कारवाईमुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
सदर जमिनीची मोजणी १० जुलै २०२६ रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी फिरोज पठाण, रोहित चतुर, सुनील धामणे, प्रवीण गायकवाड आणि पंकज निमसे यांनी बुधवारी घटनास्थळी उपस्थित राहून हद्द कायमच्या अधिकृत खुणा दाखवल्या.
या प्रक्रियेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास कापरे यांच्यासह कर्मचारी दया आढाव, विनोद आढाव आणि इतर नागरिक उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमणाविरोधात योगेंद्र सांगळे यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्षात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची दखल घेत तत्कालीन अहमदनगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी घेतलेल्या बैठकीत सदर जागेची तातडीने मोजणी करून अतिक्रमण निश्चित करण्याचे निर्देश दिले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार भूमी अभिलेख विभागाने जमिनीची मोजणी पूर्ण केली. त्यानंतर आता गट क्रमांक १४७६ आणि १४७७ ची हद्द अधिकृतपणे निश्चित करण्यात आली आहे.
हद्द निश्चित झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता अतिक्रमण हटविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन यापुढे कोणती कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


