
अहमदनगर | ११ जून | समीर मन्यार
(Public issue) केडगाव शास्त्रीनगर येथील महिलांचा संताप बुधवारी उसळला, जेव्हा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ड्रेनेज समस्येला कंटाळून त्यांनी थेट मैलामिश्रित पाण्याच्या बाटल्या हातात घेऊन अहिल्यानगर महापालिकेवर मोर्चा नेला. प्रशासक तथा महापालिका आयुक्तांच्या अनुपस्थितीत महिलांनी त्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत ‘आयुक्तांनी शास्त्रीनगरमध्ये येऊन आठवडा राहून दाखवा’ अशी थेट मागणी केली.
(Public issue) परिसरातील नागरिकांच्या घरांसमोर मैलामिश्रित पाण्याचे साठे झाले असून, त्यामुळे दुर्गंधी आणि साथीचे आजार पसरले आहेत. अनेकवेळा निवेदने देऊनही प्रशासनाने केवळ पोकळ आश्वासने दिली असून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळल्यामुळे पाणीदेखील अशुद्ध झाले आहे.
(Public issue) या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अनगत महानवर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हे आंदोलन छेडले. सहभागी महिलांनी आयुक्तांनी बाटलीत आणलेले पाणी प्यावे, व परिसरात आठवडा राहून नागरिकांची स्थिती अनुभवावी, अशी मागणी केली. आंदोलनात पप्पू भाले, दत्तात्रय दळवी, शुभम गायकवाड, विलास गायकवाड, संगीता जपे, आशा बोरुडे, यमुना गायकवाड आदींसह शेकडो महिला व नागरिक सहभागी झाले होते.
दरम्यान, उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी आंदोलकांशी संवाद साधताना अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप करत आंदोलकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मुंडे यांनी माफी मागावी, अन्यथा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.