Press | युद्धाचे भडक चित्रण; पहिली मोठी कारवाई; न्यूज चॅनल्सचे टीआरपी महिनाभरासाठी स्थगित

1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | ६.३ | रयत समाचार

(Press) इराण- अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही टीव्ही न्यूज चॅनल्सकडून युद्धाचे अतिरंजित आणि भडक चित्रण केल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने मोठी कारवाई केली. माहिती व प्रसारण मंत्रालयाने देशातील सर्व न्यूज टीव्ही चॅनल्ससाठी टीआरपी (Television Rating Points) अहवाल चार आठवड्यांसाठी थांबवण्याचे आदेश दिले.

(Press) माहिती व प्रसारण मंत्रालयाने ता. ६ मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले, इस्रायल- इराण संघर्षाच्या बातम्या दाखवताना काही न्यूज चॅनल्सकडून अतिरंजित, तर्काधारित आणि सनसनाटी स्वरूपाचे प्रसारण करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या प्रसारणामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले.

(Press) २०१४ मधील टीव्ही रेटिंग एजन्सींसाठीच्या धोरण मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रसारण संस्थांनी सरकारच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले.

यामुळेच सार्वजनिक हित लक्षात घेऊन ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC) यांना तात्काळ प्रभावाने न्यूज टीव्ही चॅनल्सचे टीआरपी रिपोर्टिंग चार आठवड्यांसाठी स्थगित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ही कारवाई लागू राहणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे युद्धासंदर्भातील सनसनाटी प्रसारणावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. मीडिया क्षेत्रातही या निर्णयाची मोठी चर्चा सुरू झाली.

 

Share This Article