Natural Delivery Awareness Rally: नैसर्गिक प्रसूतीबाबत जनजागृतीसाठी अहिल्यानगरमध्ये भव्य रॅली; ३४० नर्सिंग विद्यार्थी व प्राध्यापकांचा सहभाग

Natural delivery awareness rally: नैसर्गिक प्रसूतीबाबत जनजागृतीसाठी भव्य रॅली; ३४० नर्सिंग विद्यार्थी व प्राध्यापकांचा सहभाग

rayatsamachar
3 Min Read
Subeditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | २४.११ | रयत समाचार

Natural delivery awareness rally: मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा आहे. या काळात आईचे आरोग्य, बाळाची सुरक्षितता आणि सन्मानपूर्वक मातृत्व काळजी यांना सर्वोच्च प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. मात्र, अलीकडच्या काळात सिझेरियन प्रसूतींचे वाढते प्रमाण हा आरोग्य क्षेत्रातील चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि सुरक्षित मातृत्वाचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अहिल्यानगरमध्ये भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये ३४० नर्सिंग विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

‘सोसायटी ऑफ मिडवाईफ इंडिया’ (SOMI) यांच्या वतीने नैसर्गिक प्रसूती पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी देशभरात राष्ट्रव्यापी वॉकथॉन आणि जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे कॉलेज ऑफ नर्सिंग आणि रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रॅलीला सकाळी ९.१५ वाजता डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप प्रोफेसर चौक येथे करण्यात आला.

- Advertisement -

Natural delivery awareness rally

सिझेरियन प्रसूती ही काही वैद्यकीय परिस्थितींमध्ये आई आणि बाळाचे प्राण वाचविणारी अत्यावश्यक प्रक्रिया असते. मात्र, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यकता नसताना केवळ पर्याय म्हणून सिझेरियन प्रसूतीचा अवलंब होऊ नये, हा या जनजागृती मोहिमेचा प्रमुख संदेश होता. प्रत्येक गर्भवती महिलेला तिच्या आरोग्यस्थितीनुसार योग्य वैद्यकीय सल्ला, नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक मार्गदर्शन, भावनिक आधार आणि सन्मानपूर्वक मातृत्व काळजी मिळणे आवश्यक आहे. नैसर्गिक प्रसूतीला प्रोत्साहन देतानाच माता आणि बाळाची सुरक्षितता सर्वोच्च ठेवणे, प्रसूतीविषयक निर्णयांमध्ये महिलेच्या मताचा आणि सन्मानाचा आदर करणे तसेच वैद्यकीय गरजेनुसार योग्य हस्तक्षेप स्वीकारणे, ही या मोहिमेची प्रमुख भूमिका होती.

या रॅलीमध्ये नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक असे एकूण ३४० जण सहभागी झाले होते. हातात जनजागृतीपर फलक घेऊन आणि घोषणा देत विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व पटवून दिले. आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींसह समाजातील सर्व घटकांनी या जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र संघटनेच्या अहिल्यानगर शाखेच्या सचिव डॉ. नीलम बागल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “सुदृढ मातृत्व आणि नैसर्गिक प्रसूतीची तयारी ही केवळ गर्भधारणेनंतर सुरू होणारी प्रक्रिया नसून मुलींच्या किशोरवयापासूनच त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी मुली आणि महिलांनी दैनंदिन आहारात कॅल्शियम व लोहयुक्त पदार्थांचा पुरेसा समावेश करणे गरजेचे आहे.”

या सामाजिक उपक्रमासाठी संस्थेचे वैद्यकीय संचालक प्रा. डॉ. अभिजित दिवटे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलचे अध्यक्ष श्री. अमर गुरव यांनी विशेष उपस्थिती दर्शवून उपक्रमाला पाठिंबा दिला.

संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा ए. चांदेकर आणि उपप्राचार्या डॉ. योगिता औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीमती नीलिमा जगताप, श्रीमती रेबेका साळवे आणि कु. नम्रता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. सकाळी १०.१५ वाजता रॅलीचा उत्साहात समारोप झाला.

हे हि वाचा :   सावित्रीबाईंच्या शैक्षणिक वारशाची शाळा वाचवा! सिंथिया फॅरार ते क्लेरा ब्रुस : अहिल्यानगरच्या ऐतिहासिक मुलींच्या शाळेचे भवितव्य काय? ऐतिहासिक शाळेला ‘आदर्श मॉडेल स्कूल’ चा दर्जा द्या

- Advertisement -


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading