Monsoon | संभाव्य दुष्काळ टाळण्यासाठी ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करा; कृत्रिम पावसाची भारतीय जनसंसदेची मागणी - Rayat Samachar

Monsoon | संभाव्य दुष्काळ टाळण्यासाठी ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करा; कृत्रिम पावसाची भारतीय जनसंसदेची मागणी

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ११.६ | रयत समाचार

(Monsoon) राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता विविध हवामान तज्ज्ञ, अभ्यासक आणि हवामानविषयक संस्थांकडून व्यक्त केली जात असल्याने संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने बंद पडलेला ‘प्रकल्प वर्षा’ तातडीने पुनरुज्जीवित करून कृत्रिम पाऊस (क्लाऊड सीडिंग) पाडण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी भारतीय जनसंसदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

(Monsoon) माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी याबाबत शासनाचे लक्ष वेधले. जून महिन्याचा मध्य जवळ येत असतानाही अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी आणि ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर सन २००५ मध्ये बंद करण्यात आलेला ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

(Monsoon) कृत्रिम पाऊस म्हणजे वातावरणातील उपलब्ध पावसाळी ढगांमध्ये विशिष्ट रसायनांची किंवा पदार्थांची फवारणी करून पर्जन्यनिर्मितीस अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याची वैज्ञानिक प्रक्रिया होय. भारतातील विविध राज्यांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून विशेषतः आंध्र प्रदेशमध्ये हायग्रोस्कोपिक क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाद्वारे सकारात्मक परिणाम मिळाल्याचे नमूद करण्यात आले.
या प्रकल्पासाठी काही कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असला तरी दुष्काळ पडल्यास शासनाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व्यवस्था, जनावरांसाठी चारा व पाणी, रोजगार हमी योजनांवरील खर्च, जलटंचाई निवारण उपाययोजना आणि विविध प्रशासकीय खर्चांवर शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागतात.

 

दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कृत्रिम पाऊस प्रकल्प राबविणे अधिक परिणामकारक आणि किफायतशीर ठरू शकते, असे मत भारतीय जनसंसदेने व्यक्त केले.

- Advertisement -

दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणारी पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याची समस्या, रोजगार हमी योजनांवरील वाढता ताण तसेच काही ठिकाणी होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठीही कृत्रिम पाऊस हा प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने आवश्यक रडार यंत्रणा, विमाने, हवामान निरीक्षण साधने तसेच क्लाऊड सीडिंगसाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा तातडीने उपलब्ध करून राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा आणि शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मागणीला भारतीय जनसंसदेचे राज्य निमंत्रक अशोक सब्बन, सरपंच कैलास पठारे, युवा नेते अशोक ढगे, वीर बहादूर प्रजापती, सुनील टाक, परदेशी, भगवान जगताप, भोसले, पोपटराव साठे आदींनी पाठिंबा दिला.
हे ही वाचा : Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading