Ad imageAd image

Public issue | दुष्काळ, महागाई आणि आत्महत्यांचे संकट दारात; महाराष्ट्राने आताच जागे व्हावे; वरून सुखराज यांचे आवाहन

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | १३.६ | रयत समाचार

(Public issue) निसर्गातील प्रत्येक घटक समोर उभ्या ठाकलेल्या भीषण दुष्काळाचे संकेत देत आहे. त्यातच वाढत्या युद्धसंकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडण्याची चिन्हे दिसत असून, त्याचा थेट परिणाम ग्रामीण भारतावर होणार आहे. शहराकडे आधार असलेल्या कुटुंबांचा ताणदेखील पुन्हा गावच्या जमिनीवर येण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा आकडा यंदा भयावह पातळी गाठू शकतो, असा गंभीर इशारा ‘टू मच डेमोक्रॅसी’ आणि ‘द ग्रेट इंडियन इल्युशन‘ या शेतकरी आंदोलनावरील माहितीपटाचे दिग्दर्शक वरून सुखराज यांनी दिला.

(Public issue) पुढे ते म्हणाले, खायच्या तेलापासून ट्रॅक्टरच्या डिझेलपर्यंत सर्वच गोष्टींचे दर झपाट्याने वाढत आहेत. या महागाईचा पहिला फटका मोठ्या शेतकऱ्यांकडे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या रोजगारावर बसणार आहे. दुसरीकडे शहरांमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या मुलामुलींच्या राहणीमानाचा खर्च वाढत असून, चहापोह्यांपासून प्रवासखर्चापर्यंत सर्वच गोष्टी महाग होत आहेत. भरती प्रक्रियांतील घोळ, पेपरफुटी आणि अनिश्चिततेमुळे तरुण पिढीही संभ्रमात सापडली आहे.

(Public issue) आजच्या घडीला महाराष्ट्रातील उरलेसुरले सर्व सहृदयी राजकारणी, सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिक यांनी एकत्र येऊन मोठे काम उभे करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करतानाचे फोटो काढून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा शेतकरी आत्महत्या होऊच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

नंतर मदत देतानाच्या फोटोला शेकडो लाईक्स मिळतील; पण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा फोटो त्या घराच्या भिंतीवर एकटाच लटकत राहील. त्यामुळे संकट येण्यापूर्वीच त्याला रोखण्यासाठी काम झाले पाहिजे, अशी कळकळीची भावना त्यांनी व्यक्त केली.
गावात असाल तर लोकांशी संवाद साधा, गावापासून दूर असाल तर मुद्दाम गावात जाऊन परिस्थिती समजून घ्या. सरकारी आकडेवारी आणि एक्सेल शीटमधील संख्यांमध्ये अडकून न राहता जमिनीवरील वास्तव जाणून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
सरकार नावाची अजस्त्र यंत्रणा जंगलं खणण्यात आणि महामार्ग लादण्यात व्यस्त आहे. अशा वेळी महाराष्ट्र वाचविण्याची जबाबदारी इथल्या माणसांवरच आहे. शेतकरी, मजूर, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून समाजानेच पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन वरून सुखराज यांनी केले.
शेवटी, हाच खरा ‘महाराष्ट्रधर्म’ आहे, असे सांगत त्यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading