History | शिवस्पर्शित थिवी किल्ल्याचे अरण्यरुदन- प्रभाकर ढगे

रयत समाचार वृत्तसेवा
6 Min Read

इतिहासवार्ता | १९.२ | प्रभाकर ढगे

है दफन मुझ में मेरी कितनी रौनके मत पुछ,
उजड उजडकर बसता रहा वो किला हूं मैं |

(History) स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी या तिघाही पराक्रमी राजांनी प्राप्त परिस्थितीत परकीय आक्रमक म्हणून पोर्तुगीजावर वेळोवेळी स्वाऱ्या करून त्यांना हाकलून लावण्याची एकही संधी सोडली नाही. याचे पुरावे पोर्तुगीजांनीच लिहून ठेवलेल्या रोजनिशी आणि पत्रव्यवहार यातून सापडतात. जुन्या ऐतिहासिक इमारती, वाडे, किल्ले, शिलालेख, ताम्रपत्र, पत्रव्यवहार देखील हा इतिहास कथन करतात.

(History) भावार्थ मांद्रेकर आणि सचिन मदगे हे अलीकडील तरूण पिढीतील गोमंतकीय इतिहासकार राज्यातील इतिहासावर नवा प्रकाशझोत टाकतांना दिसतात. त्यांच्याकडून शिवकालाबाबत सत्यान्वेषी व सकस असे विपुल इतिहास लेखन होण्याच्या आशा आहेत.

(History) गोव्यात एकूण ५१ किल्ले होते, अशा नोंदी सापडत असल्याचा व ४३ किल्ल्यांचा इतिहास उपलब्ध असल्याचा सचिन मदगे यांचा दावा आहे. पांडुरंग नागवेकर यांनी ही संख्या ३२ एवढी नोंदली आहे. सध्या गोव्यात जेमतेम १६ किल्ले अस्तित्वात असल्याचे दिसते. त्यातील केवळ दहा किल्ले बघण्याच्या अवस्थेत असले तरी त्यांचीही पडझड वेगाने सुरू आहे. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा सांगणाऱ्या ऐतिहासिक खूणा जो समाज जपत नाही, त्याला इतिहासाचा वृथा अभिमान बाळगण्याचा नैतिक अधिकार उरत नाही.
बार्देश तालुक्यातील थिवी किल्ल्याला २०२१ साली भेट दिली असता, हा किल्लाही दयनीय अवस्थेत असल्याचे दिसून आले. किल्ल्याच्या भिंती आणि तटबंदी अजून शिल्लक असली तरी त्याचे चिरेबंदी दगड चोरून नेऊन लोक आपापली घरे बांधत असल्याचे विदारक चित्र दिसले. काही स्थानिक नागरिकांना त्याची खंत आहे पण किल्ला संरक्षणासाठी काय करावे, याबाबतीत त्यांना मार्गदर्शन करणारे कोणी नाही. पुरातत्व खात्याचा केविलवाणा फलक तिथे असला तरी किल्ला संरक्षणासाठी कसलीही व्यवस्था इथे दिसली नाही. याउलट किल्ल्याच्या परिसरातील कालव्यावर असलेला ऐतिहासिक कमानीचा मजबूत साकव गायब होऊन तिथे नवा सिमेंट काँक्रिटचा पूल करोनाकाळात उभा राहिला असल्याची माहिती गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी दिली.
मिगेल दी नोरोन्हा व कोंदे दी लिन्हार्स या दोन पोर्तुगीज विजरईंच्या काळात म्हणजे १६३५ साली हा किल्ला बांधायला सुरूवात झाली. १६५२ पर्यंत त्याचे बांधकाम पूर्ण झाले. उत्तरेकडून होणारे सावंतवाडकर भोसले व मराठ्यांचे हल्ले रोखणे आणि आदिलशहाच्या महत्वाकांक्षेला लगाम घालणे या हेतूने हा किल्ला बांधण्यात आला. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी शापोरा व म्हापसा नदीला जोडणारा खंदक खोदला त्यावर साकव उभारला. आता हा साकव इतिहासजमा झाला आहे. तीन किमी लांबीची भिंत म्हणजेच हा किल्ला आहे. बाहेरील हल्ल्यापासून बार्देशचे संरक्षण करणे एवढाच हा किल्ला बांधण्यामागचा हेतू होता. सेंट ख्रिस्तोफर, सेंट मिंगेल व सेंट थाॕमस असे किल्ल्याचे तीन भाग आहेत.History
बार्देश तालुक्यात पोर्तुगीज हिंदूंवर धर्मांतर सक्ती करत असल्याची तक्रार छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा १९ नोव्हेंबर १६६७ रोजी त्यांनी या किल्ल्यावर स्वारी करून तो ताब्यात घेतला. येथील पोर्तुगीज सैन्य आग्वाद व रेईश मागुश किल्ल्यावर पळून गेले. शिवाजी महाराजांनी बार्देशवर स्वारी करण्याची दोन कारणे होती. एक म्हणजे पेडणे, कुडाळ, डिचोली येथील देसायांनी मराठा साम्राज्याविरूध्द बंड करून ते पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेले होते. आणि दुसरे कारण पोर्तुगीज विजरई कोंदी दी सावेंद सेंती याच्या हुकूमावरून दोन महिन्याच्या आत हिंदूंनी धर्मांतर करावे अथवा बार्देश सोडून जावे, असा फतवा काढण्यात आला होता.
या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी थिवी किल्ला जिंकून घेतला. देसाई आणि पोर्तुगीज सैन्य पळून गेले तेव्हा किल्यातील धर्मगुरू बंदुका घेऊन लढायला उभे राहिले. मराठा सैनिकांनी त्यापैकी चौघांना ठार करून किल्ला ताब्यात घेतला. १९ ते २२ नोव्हेंबर असे तीन दिवस शिवाजी महाराजांचे वास्तव्य या किल्ल्यावर होते. त्यानंतर पोर्तुगीजांवर दहशत बसली आहे, असे बघून ते डिचोली मार्गे महाराष्ट्रात निघून गेले. त्यानंतर पोर्तुगीज विजरईने शिवाजी महाराजांचा धसका घेऊन त्यांच्याशी तह केला. डिचोलीचा हा तह मोडी लिपीत व मराठी भाषेत लिहिला गेला.
दोन वर्षानंतर मराठ्यांचे दुर्लक्ष झालेले पाहून पोर्तुगीज सैनिकांनी पुन्हा हा किल्ला ताब्यात घेतला. इनासिओ झेवियर दी मिनेझिस याने हा किल्ला जिंकला. शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी यांनी फोंडा व दुर्भाट येथील लढाईनंतर सासष्टी व बार्देश जिंकून पोर्तुगीजांना मोठा धक्का दिला. याच दरम्यान औरंगजेब आपली लाखोंची फौज घेऊन मराठा साम्राज्य जिंकून घेण्यासाठी दक्षिणेत उतरला. त्यामुळे संपूर्ण गोवा जिंकून पोर्तुगीजांना येथून कायमचे हाकलून लावण्याचे मनसुबे संभाजी राजेंना सोडून आपले राज्य वाचविण्साठी महाराष्ट्रात परतावे लागले. त्या धामधुमीतही थिवीचा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. छत्रपती संभाजींच्या कारकिर्दीच्या अस्तानंतर थिवी किल्ला पुन्हा पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला.
१७३९ साली महाराष्ट्रात नाट्यमय घटना घडल्या. छत्रपती शाहूंच्या आदेशानुसार चिमाजी अप्पाने वसईवर चढाई केली. त्याचवेळी बाजीरावाने गोव्यात सैन्य पाठवले. व्यंकटराव घोरपडे व नरगुंदकर भावे या सरदारांनी पोर्तुगीज सैन्याची दाणादाण उडवत बार्देश व सासष्टीत सैन्य घुसवले. मुरगाव वगळता सर्व प्रदेश मराठ्यांनी ताब्यात घेतला. वसईतून जसे पोर्तुगीज हुसकावले गेले तसेच गोव्यातून पोर्तुगीज कायमचे हुसकावले जाण्याचा सुवर्णक्षण यावेळी जवळ आला होता. पण पोर्तुगीज विजरईने सासष्टीतील काही स्थानिक व्यापाऱ्यांना हाताशी धरून फंदफितुरीचे डावपेच खेळायला सुरूवात केली. त्यांच्या या खेळीला यश आले आणि ३२ हजाराची लाच देऊन त्यांनी सासष्टी मराठा सैन्याकडून सोडवून घेतली. बार्देशवरचा ताबा सोडण्यास मात्र सावंतांनी नकार दिला. त्यांचे सैन्य थिवी किल्ल्यावरच थांबले.
१७४० मध्ये पोर्तुगालवरून नव्या दमाचे सैन्य, आधुनिक तोफा, बंदुका गोव्यात दाखल झाल्या. पोर्तुगीज सैनिकांच्या नव्या शस्त्र सज्जतेपुढे सावंतांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. अशा रीतीने गोवा पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. त्या काळात मराठा सैन्याऐवजी परकीय पोर्तुगीजांना कोणी व कशासाठी मदत केली, याचे अनेक संतापजनक पुरावे इतिहासात दडलेले आहेत. पां.पु. शिरोडकर, स.शं. देसाई, जयसिंगराव राणे, फ्लावियान डायस, पांडुरंग नागवेकर या इतिहासकारांनी ठिकठिकाणी त्याचा पर्दाफाश केलेला आहे.

History

(लेखक दैनिक रयत समाचारचे समुह संपादक आहेत)

(पुर्वप्रसिध्दी)


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading