Politics | निवडणूक केवळ राजकीय सत्तासंघर्ष नसून, ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ असा लढा- मोकाटे; ‘घराणेशाही’ भाजपवर हल्लाबोल

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

राहुरी | ११.४ | रयत समाचार

(Politics) राहुरी नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीचे राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आक्रमक पावित्रा घेत प्रचाराला सुरुवात केली. ही निवडणूक म्हणजे केवळ राजकीय सत्तासंघर्ष नसून, तो ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ असा लढा असल्याची ठाम भूमिका मोकाटे यांनी मांडली.

(Politics) नुकतीच गोविंद मोकाटे यांनी कार्यकर्त्यांसह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उमेदवारीनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना मोकाटे म्हणाले, मी गेल्या २० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून तळागाळात काम करत आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर पवार साहेबांनी जो विश्वास दाखवला, तो सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ही लढाई आता केवळ माझी राहिली नसून ती मतदारसंघातील प्रत्येक सामान्य नागरिकाची झाली.

(Politics) मतदारसंघातील प्रश्नांवर बोट ठेवत त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मोकाटे पुढे म्हणाले, गेल्या १० वर्षांत केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात फक्त निराशाच टाकली आहे. कांद्याचा प्रश्न असो वा ऊसाचा दर, शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय झाला नाही. कापसालाही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. मतदारसंघातील असंख्य तरुणांनी स्वतःहून फोन करून मला निवडणूक लढवण्याचा आग्रह केला, हीच जनशक्ती यंदा परिवर्तनासाठी सज्ज आहे.
भारतीय जनता पक्षाने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. विरोधकांकडून पैशाचा मोठा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न होईल, मात्र राहुरी नगरची स्वाभिमानी जनता कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, असा विश्वासही मोकाटे यांनी व्यक्त केला.
येत्या २३ तारखेला मतदान होणार असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जनता ‘तुतारी’च्या पाठीशी उभी राहील, असा त्यांना विश्वास आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading