पणजी | २५.११ | प्रतिनिधी
(Goa news) कोंकणी शांती प्रकाशन (KSP) यांच्या वतीने ता. २३ नोव्हेंबर रोजी मिरामार येथील CSPH कॅम्पसवर ‘आदर्श परिसर, आदर्श समाज’ या विषयावर बहुभाषिक कवी संमेलन उत्साहात पार पडले. मराठी, कोकणी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषांतील कवींनी सहभाग नोंदवून गोव्यातील समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे सुंदर दर्शन घडविले. कवितांमधून परिसरातील मानवी नातेसंबंध, सहजीवन, सामाजिक सौहार्द आणि बदलत्या मूल्यांचे जिवंत चित्र उभे राहिले.
(Goa news) कवींनी समाजातील विविध पैलूंवर भाष्य करताना शेजाऱ्यांमधील वाढती दुरावलेली भावना, गैरसमज, सामाजिक तणाव, ध्रुवीकरण आणि मानवी नात्यांतील भावनिक अंतर याकडे लक्ष वेधले. काही कवींनी पूर्वीच्या सामायिक जीवनशैलीची उबदारता, सहवास आणि सांस्कृतिक सलोखा यांची आठवण करून देत सामाजिक बांधिलकीची गरज अधोरेखित केली. या वाढत्या दुराव्याचे वेळेत निराकरण झाले नाही तर त्याचे गंभीर परिणाम समाजावर होतील, असा इशाराही अनेक कवितांतून व्यक्त करण्यात आला.
(Goa news) कार्यक्रमाचे मान्यवर पाहुणे प्रसिद्ध कवी अभय सुराणा व कोंकणी शांती प्रकाशनाचे उपाध्यक्ष अब्दुल वाहीद खान होते. अभय सुराणा यांनी भूतकाळापासून आजच्या समाजापर्यंतच्या बदलत्या प्रवाहांवर आधारित त्यांच्या कवितांचे सादरीकरण केले.
अध्यक्षीय भाषणात अब्दुल वाहीद खान यांनी औद्योगिक क्रांतीनंतर वाढलेल्या भौतिकवाद, करिअरकेंद्री जीवनशैली आणि व्यक्तिवादामुळे समाजातील परंपरा, नीतिमत्ता आणि कौटुंबिक मूल्यांवर झालेले परिणाम अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की, संपत्ती, प्रतिष्ठा आणि सत्तेच्या मागे लागलेल्या जीवनात ‘परलोकातील जबाबदारी’ हा सर्वधर्मीय तत्त्वज्ञानाचा मूलभूत भाव मागे पडतो आहे. मानवतेची सेवा आणि इतरांच्या कल्याणासाठी वेळ देणे हीच मूल्यव्यवस्थेची पुनर्स्थापना करण्याची खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संमेलनात डॉ. पवित्रा देशप्रभू, सुनीता पेडणेकर, सोनाली पेडणेकर, सय्यदा आफिफा कादरी, शर्मीन देशमुख, महेश पारकर, नीलबा ए. खांडेकर, फहाद हाश्मी, सुरेखा खेडेकर, उद्धव पोळ, मोहिनी हलर्णकर, सय्यदा नाझमीन, वर्षा प्रभुगावकर, सलमा मकानदार, झोया खान पठाण आणि अनघा कामत यांनी काव्य सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा क्षीरसागर आणि जावेद कुरेशी यांनी केले. संपूर्ण संमेलनात बहुभाषिक काव्य, सामाजिक संदेश आणि सांस्कृतिक ऐक्याची भावना प्रभावीपणे रंगून गेली.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
