शेतातील पाचट जाळून ऊसतोडणी करू नये, असे प्रकार आढळल्यास प्रदूषण नियंत्रण कायद्याखाली कारवाई करण्यात येईल
अहमदनगर | २५ डिसेंबर | प्रतिनिधी
(Ahilyanagar News) सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान होईल अशी कोणतीही कृती कारखान्यांनी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखान्यांच्या प्रश्नाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्रादेशिक सहा साखर संचालक संतोष बिडवई, निवासी उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपसंचालक साखर संजय गोंदे, जिल्हा सहकार उपनिबंधक गणेश पुरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, विशेष लेखा परीक्षक आर.एफ.निकम आदी उपस्थित होते.
(Ahilyanagar News) यावेळी सालीमठ म्हणाले, साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी दर देऊ नये. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांचे समाधान होईल असा दर देण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्याला अधिकची रक्कम देता यावी यासाठी इथेनॉलसारख्या उपउत्पादनाकडे वळण्याचा प्रयत्न करावा. ऊसाची रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर अदा करावी. शेतातील पाचट जाळून ऊस तोडणी करू नये. असे प्रकार आढळल्यास प्रदूषण नियंत्रण कायद्याखाली कारवाई करण्यात येईल.
साखर कारखान्यांनी वजनकाट्याचे मानकीकरण करून घ्यावे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी काही कारखान्यांना भेट देऊन वस्तुस्थिती तपासावी. भेटीदरम्यान वजन कमी असल्याचे प्रकार लक्षात आल्यास कारवाई करण्यात येईल. वजन करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा.
साखर कारखान्यांनी करार करून तोडणीसाठी लावलेल्या हार्वेस्टर चालकांना शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे न घेण्याचे स्पष्ट निर्देश द्यावे, असे प्रकार आढळल्यास त्वरित कारवाई करावी. ऊसाची वाहतूक करताना वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीत ऊसाचा दर, गतवर्षीच्या ऊसाची अदा करायची रक्कम, पाचट जाळून ऊस तोडणी करणे, कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे, ऊस दर जाहीर करताना परिपत्रक काढणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा