अहमदनगर | १७ नोव्हेंबर | प्रतिनिधी
Election अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यांची जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पाहणी केली. रस्त्यांच्या कामांमुळे मतदारांना केंद्राकडे जाण्यास अडचण होणार नाही यादृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ यांनी अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील सेंट झेविअर, सेंट मोनिका, न्यू आर्टस् कॉलेज या मतदान केंद्रांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कामांना भेट देऊन पाहणी केली. मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे मतदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. मतदान केंद्रावर मतदारांना वाहन नेता येईल, अशा पद्धतीने व्यवस्था करावी. ता.१६ नोव्हेंबरपासून मतदान केंद्राकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याच्या सुचनाही त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.