Shrirampur Updates: कांबळे यांचे पाऊल रोजच पडते पुढे पुढे; मतदार द्विधा मनावस्थेत; गावकरी मंडळ कानडेंकडे - Rayat Samachar

Shrirampur Updates: कांबळे यांचे पाऊल रोजच पडते पुढे पुढे; मतदार द्विधा मनावस्थेत; गावकरी मंडळ कानडेंकडे

रयत समाचार वृत्तसेवा
65 / 100

श्रीरामपूर | ९ नोव्हेंबर | शफीक बागवान

Shrirampur Updates उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे पाऊल रोज पुढे पुढे पडत आहे. यामुळे मात्र लहू कानडे आणि हेमंत ओगले यांच्या गोटात आता नको ते प्रश्न उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे यांचा फोटो फ्लेक्सवर झळकवीत कांबळे यांनी आपल्या प्रचाराचा रोज धडाका लावला आहे. गुप्त आणि सूप्त प्रमाणात त्यांना मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता लहू कानडे आणि हेमंत ओगले यांच्या गोटात चिंता वाढू लागली आहे.

निवडणुकीत कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून कोणालाही हलके समजू नये, असा संदेश माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी या निवडणुकीतून उमेदवारी कायम ठेवीत दिला असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

शांत, संयमी आणि मितभाषी अशी ओळख असलेल्या भाऊसाहेब कांबळे यांच्या राजकारणाची सुरुवात नगरसेवकापासून झाली. शिक्षण मंडळाचे सदस्य, सभापती आणि नगरसेवक असे वेगवेगळे टप्पे पार केल्यानंतर माजी आमदार स्व. जयंत ससाणे यांचे विश्वासू म्हणून भाऊसाहेब कांबळे यांना गेल्या दहा वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत घवघवित यश मिळाले होते. स्व. ससाणे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी शहराचा आखीव-रेखीव विकास केला.
ससाणे यांच्या संघटनेशी कांबळे यांनी संबंध तोडल्यामुळे त्यांना गत विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. राधाकृष्ण विखे भानुदास मुरकुटे चंद्रशेखर कदम यांनी कांबळे यांचा प्रचार करून देखील कांबळे यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. स्वर्गीय गोविंदरावजी आदिक आणि जयंत ससाणे या जोडगोळीने गेल्या पंचवीस वर्षापासून श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.

राज्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची महायुती अस्तित्वात असताना तसेच लहू कानडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतरही माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आपला उमेदवारी अर्ज येथे कायम ठेवला आहे.
कांबळे यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात रोजच समीकरणे बदलत आहेत. कधी काय होईल हे काहीही सांगता येत नसताना कांबळे यांच्या प्रचाराचा पाऊल रोजच पुढे पुढे पडत आहेत.

यामुळे लहू कानडे यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि सचिव अविनाश आदिक तसेच माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक हे लहू कानडे यांची धुरा सांभाळीत आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. वैयक्तिक लहू कानडे यांचेही मोठे काम आणि मतदारांशी संबंध आहेत. सद्यस्थितीत हेमंत ओगले, लहू कानडे आणि भाऊसाहेब कांबळे या तिघाही उमेदवारांमध्ये मतदारांना आकृष्ट करण्यासाठीची मोठ्या प्रमाणात स्पर्धा लागली आहे.

काँग्रेसचे करण ससाणे, हेमंत ओगले यांनी माजी उपनगराध्यक्ष हाजी अंजुम शेख यांचा पाठिंबा मिळवत कानडे यांना मोठा धक्का दिला आहे. कानडे काँग्रेसमध्ये असताना अंजुम शेख त्यांच्याबरोबर होते. मात्र कानडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे अंजुम शेख यांनी ससाणे गटास काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला.

अंजुम शेख हे स्व. ससाने समर्थक मानले जात होते. मात्र नगरपालिकेच्या गेल्या दहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ससाणे आणि शेख यांच्यात वितुष्ट आले. शेख यांनी पालिकेतील सुमारे १२ नगरसेवकांना बरोबर घेत या शहरात ससाणे यांना मोठे आव्हान दिले होते. राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो हे शेख यांनी ससाणे गटाशी हात मिळवणी करत दाखवून दिले.

सद्यस्थितीत अंजुम शेख हे ओगले यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. वॉर्ड नंबर दोनमध्ये राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे. पालिकेच्या गेल्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीसह ते बिनविरोध निवडून आले होते.
दुसरीकडे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना शेतकरी संघटनेने पाठिंबा देऊन राजकारणाची समीकरणे बदलविण्यास प्रारंभ केला. बेलापूर गावात गावकरी मंडळाने लहू कानडे यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक आणि गावकरी मंडळ एकत्र आल्यामुळे लहू कानडे यांच्या गोठात मोठा उत्साह आहे. या मतदारसंघात रोजच नवनवीन घडामोडी घडत आहेत.
भविष्यात राजकारणात काय वाढवून ठेवले आहे, हे पाहण्यासाठी मात्र उद्याची वाट पहावी लागणार आहे.
Share This Article
Leave a comment