अहमदनगर | ३ नोव्हेंबर | प्रतिनिधी
महाराष्ट्रासाठी भारत Election आयोगाने नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात विविध यंत्रणांमध्ये समन्वय, निवडणूक प्रशासनाची पूर्वतयारी आणि निवडणुका मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी भारत निवडणूक आयोगाने विविध विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक पोलीस निरीक्षक, सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.
मिश्रा यांनी यावेळी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील निवडणूक विषयक तयारीची माहिती घेतली. त्यांनी निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निवडणूक तयारी विषयी माहिती घेतली. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम चांगले असून शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नागरिकांशी संवाद साधणारे उपक्रम आयोजित करावे, चांगले उपक्रम राबविणाऱ्यांना सन्मानित करावे, अशी सूचना त्यांनी केली.
मतदारसंघाची स्थिती, मतदान केंद्र संख्या, मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सोयीसुविधा आणि उपाययोजना, मतदान साहित्य वितरण केंद्र, कायदा आणि सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कार्यवाही, मतदारांची जनजागृती आदी विषयाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.