Politics: इच्छुकांच्या भाऊगर्दीने प्रत्येकजण म्हणतो, 'मला आमदार झाल्यासारखं वाटतयं' - Rayat Samachar

Politics: इच्छुकांच्या भाऊगर्दीने प्रत्येकजण म्हणतो, ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतयं’

रयत समाचार वृत्तसेवा
6 Min Read
64 / 100

श्रीगोंदा | २५ सप्टेंबर | अशोक होनराव

Politics एकीकडे पक्षश्रेष्ठी आपल्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी “तयारीला लागा” असा संदेश देतात. दिलेला संदेश म्हणजे अधिकृत उमेदवारी नसते, असेही स्पष्टीकरण पक्षश्रेष्ठी दुसरीकडे बोलताना देतात. काही पक्षश्रेष्ठी कार्यकर्त्याने जमविलेली गर्दी पाहून, भारावून गेल्याने कार्यकर्त्याच्या उमेदवारीची घोषणा करतात. श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ याला अपवाद कसा असेल ? ता. २१ रोजी बारामती येथील गाठीभेटी व ता. २२ रोजी मुंबई पत्रकार परिषदेत श्रीगोंद्याचे पडसाद उमटल्याचे दूरदर्शनवरून राज्यभराने पाहिले.

विधानसभा निवडणूकीसाठी श्रीगोंदा तालुक्यातील इच्छुकांच्या भाऊगर्दीने प्रत्येक इच्छुकाला आमदार झाल्यासारखं वाटतयं. चौकाचौकात, वाड्या वस्त्यांवर चर्चाचे फड रंगत आहेत. इच्छुक उमेदवारी नेत्याला आश्वासरूपी पाठबळ देणारे सार्वत्रिक ठिकाणी “आमचा उमेदवार नेता लयी भारी” असे टाहो फोडून सांगताना दिसतात.

महाविकास आघाडी व महायुतीमधील इच्छुकांची संख्या प्रत्येक पक्षाची डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसते. याशिवाय तिसरी आघाडी (संभाजीराजे, राजुशेट्टी व बच्चु कडु) प्रकाश आंबेडकरांचा वंचित, जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा यांचेकडेही काही इच्छुक उमेदवार संपर्क साधून असल्याचे बोलले जाते. श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातून जे इच्छुक आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीतून घनःश्याम शेलार (काँग्रेस), राहुल जगताप (राष्ट्रवादी शरद पवार गट), साजनभैय्या पाचपुते (उ.बा. ठाकरे गट शिवसेना) हे इच्छुक आहेत.

महायुतीमधील तीन घटक पक्षामध्ये इच्छुकांची यादी मोठी आहे. विद्यमान आमदार पाचपुते, विक्रमसिंह पाचपुते, सुवर्णाताई पाचपुते (भा.ज.प.), अनुराधाताई नागवडे, बाळासाहेब नहाटा, दत्तात्रय पानसरे, निवास नाईक, शरद नवले, दिपक नागवडे (राष्ट्रवादी अजित पवार गट), राजेंद्र निळकंठ नागवडे (आम आदमी पार्टी), जि.प. माजी उपाध्यक्ष ओबीसी नेते आण्णासाहेब शेलार (सर्व पर्याय खुले किंवा अपक्ष) इतके उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपचे बबनराव पाचपुते त्यावेळचे एकसंघ राष्ट्रवादीचे उमेदवार घनःश्याम शेलार यांनी कडवी झुंज दिली होती. अटीतटीच्या लढतीत पाचपुते यांचा काठावर विजय झाला होता.

२०१९ च्या विधानसभा निवडणूकीचा निकाल तसा धक्कादायकच लागला. एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे शेलार यांनी भाजपाचे पाचपुते यांची दमछाक केली होती. श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील एकूण ३४४ मतदान केंद्रापैकी १५३ मतदान केंद्रावर शेलार यांनी आघाडी घेतली होती. तर उर्वरित १९१ मतदान केंद्रावर आ. पाचपुते यांनी आघाडी घेतली होती.

नगर तालुक्यातील ६६ मतदान केंद्रापैकी २६ मतदान केंद्रावर शेलार यांनी तर उर्वरित ४० मतदान केंद्रावर पाचपुते यांनी आघाडी घेतली. पाचपुते यांना त्यांच्या काष्टी गावातील १२ मतदान केंद्रावर तर श्रीगोंदा नगरपालिका हद्दीतील २५ मतदान केंद्रापैकी २० मतदान केंद्रावर पाचपुते यांना तर उर्वरित ५ केंद्रावर शेलारांना मताधिक्य मिळाले होते.

एकूणच निकाल पहाता २०१९ च्या निवडणूकीतील ११ उमेदवारांपैकी संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस व वंचित बहुजन आघाडीचे मच्छिंद्र सुपेकर यांनी चार अंकी मते मिळविली होती. पोष्टल १२८३ मतांमध्ये पाचपुते यांना ७५५ तर शेलार यांना ५२८ मते मिळाली होती. या अटीतटीच्या लढतीत घनःश्याम शेलार यांना ९८५०८ तर बबनराव पाचपुते यांना १०३२५८ मते मिळाली होती. आमदार पाचपुते यांचा केवळ ४७५० मतांचा विजय झाला होता.

२०१९ चे उमेदवारांचे जाहीरनामे व वचननामे पहाता हे शब्द जुने व बोथट वाटले. म्हणून पाचपुते यांच्या विकासवारी पुस्तिकेत ‘वारसा विचारांचा, आरसा विकासाचा.’ असा उल्लेख करून विकासकामांचा पाढा मतदारांसमोर मांडला होता. तर शेलार यांनी आपल्या प्रचार पत्रकावर जनता दरबारासमोर माझे आवाहन करून ३४ वर्षे फक्त आणि फक्त जनतेच्या सेवेसाठी वेचलेली असल्याचे आवाहन करत जनसेवेसाठी विजयी करा असे म्हटले होते.

प्रचार सभांमधून व जाहीर पत्रकांमधून आश्वासनांची खैरात करताना शेतीमालाला योग्यभाव, घोड, कुकडी, भिमा पाण्याचा प्रश्न, औद्योगिक वसाहतीचा प्रश्न, साकळाई व खाकीबाबा योजनेचा प्रश्न, बेरोजगारी हटविणे इत्यादी आश्वासने दिली परंतु ती फक्त बोलण्यापुरतीच व कागदावर राहिली. हे प्रश्न सोडविण्यासाठी ना सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले, ना विरोधकांनी हे वास्तव कुणीही नाकारू शकणार नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत हेच प्रश्न केंद्रातील सत्ताधाऱ्यांना भोवले. जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉ. सुजय विखे यांना याच प्रश्नाबरोबर शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न भोवला. लोकप्रतिनिधी बबनराव पाचपुते यांनी प्रचारात सक्रीय राहुनही ते सुजय विखे यांना मताधिक्य देवू शकले नाहीत हे देखील वास्तव आहे.

श्रीगोंदा शहरासाठी कोट्यावधींचा निधी पाचपुते यांनी आणला हे सत्य असले तरी निधी खर्च करताना विकासकामांमधील अनियमितता, कामाचा दर्जा, हरकती यामुळे अनेक विकासकामे अर्धवट राहिली आहेत. तर रस्त्यांच्या निकृष्ठ कामांमुळे रस्त्यांची अल्पावधीतच वाट लागली आहे. पाणी योजना करूनही पूर्ण दाबाने २४ तास बिसलरीसारखे शुध्द पाण्याचे आ. पाचपुते यांचे आश्वासन मृगजळ ठरले आहे. आजही शहरातील जनता पिण्यासाठी जारचे पाणी विकत घेत आहे तर नळ योजनेचे अनियमित येणारे पाणी सांडपाणी, धुणी भांडी यासाठी वापरत आहेत.

क्रिडा संकुल होवून ते हरवले आहे. पालिका इमारतीजवळील बांधलेली भाजी मंडई असून अडचण ठरली आहे. विद्यार्थी अभ्यासिकेची इमारत तत्कालीन हरकतीमुळे अर्धवट अवस्थेत व अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली आहे. याच इमारतीजवळील खुल्या जॉगींगचे सांस्कृतिक रंगमंचाचे कामही अर्धवट पडलेले आहे.

एकूणच काय तर कोट्यावधीचा निधी आला तो खर्चही झाला पण शहरवासियांच्या पदरी फक्त निराशाच पडली. यासाठी जसे लोकप्रतिनिधी जबाबदार वाटतात तसेच विरोधकही जबाबदार म्हणावे लागतील अशी चर्चा शहरात ऐकावयास मिळते.

लोकसभा निवडणूकीतील डॉ. सुजय विखे यांचा पराभव भाजपचे श्रेष्ठी व नेते यांच्या जिव्हारी लागला. तुतारीने कमळावर मात केली त्याची पुनरावृत्ती होवू नये यासाठी भाजप, राष्ट्रवादी, अजितदादा गट व शिवसेना शिंदेगट यांना सजगपणे विचार करून रणनीती आखावी लागणार आहे तर विरोधातील काँग्रेस राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना ठाकरे गट हे उमेदवारीचे दावे करीत असले तरी त्यांना एकविचारावर यावे लागेल असे दुसया फळीतील कार्यकर्ते व सामान्य मतदारांना वाटते आहे.

मागे वळुनी पहाता…
२०१४ चा विधानसभा निकाल

या निवडणूकीत सेना युती असूनही हे दोन पक्ष स्वतंत्र लढले. त्यामुळे भाजपाचे बबनराव पाचपुते यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. शिवसेनेचे गाडे यांची उमेदवारी नसती तर पाचपुते विजयी झाले असते.

२०१९ चा विधानसभा निकाल

या निवडणूकीत निवडणूक होईपर्यंत भाजप सेना युती राहिली. त्यामुळे पाचपुते विजयी झाले हे देखील सत्य आहे.

 

Share This Article
Leave a comment