कर्जत | ३१ ऑगस्ट | रिजवान शेख, जवळा
Politics दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये अमूलाग्र बदल करणारे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या हस्ते मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत मनीष सिसोदिया यांची भेट घेऊन त्यांना शाळा उद्घाटनाचे निमंत्रण दिले.
दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील सर्व शाळांमध्ये अमूलाग्र बदल करून देशातील एकमेव असे अनोखे ‘रोल मॉडेल’ विकसित केले. सरकारी शाळांमध्ये खासगी शाळांप्रमाणे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या. शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण दिल्यामुळे सरकारी शाळांची गुणवत्ता वाढली. त्यामुळे श्रीमंतांची मुलेही या सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगा लावत आहेत. शिक्षण, पाणी, वीज या क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे दिल्लीत ‘आप’ सरकारची लोकप्रियता वाढल्याने गेल्यावर्षी केंद्र सरकारने मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. नुकताच त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून आज कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि मिरजगाव येथे बांधण्यात येत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे उद्घाटन करण्याचे निमंत्रण दिले.
आमदार पवार यांनीही त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात शिक्षणक्षेत्रात भरीव असे काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी ३९९ शाळांना डिजिटल पॅनेल, शाळांना पुस्तके, क्रिडा साहित्य, विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, शिक्षकांना प्रशिक्षण, टॅब, संगणक दिले. शाळांमध्ये इतरही अनेक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असून विद्यार्थ्यांना अवकाशाबाबत कुतूहल निर्माण व्हावे म्हणून फिरते तारांगण आणि टेलिस्कोपचीही सुविधा उपलब्ध करुन दिली. अशा सुविधा असलेला कर्जत-जामखेड हा कदाचित राज्यातील एकमेव मतदारसंघ असावा. प्रामुख्याने सामान्य कुटुंबातील मुले-मुली ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच शिक्षण घेत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच आमदार पवार यांनी हे सर्व प्रयोग यशस्वीरित्या राबवले आहेत. कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये जिल्हा परिषदेची शाळा ही ब्रिटीशकालीन शाळा असून नुकतेच या शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. यापूर्व स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते शाळेच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन करण्यात झाले होते. आता याच शाळेसाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सीएसआर निधीतून तब्बल चार कोटी रुपये खर्चुन अद्ययावत आणि प्रशस्त इमारत बांधण्यात येत आहे. यामध्ये वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक प्रयोगशाळा, स्टाफ रूम आणि विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यात येत आहे. इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. अशा प्रकारे सोयी-सुविधा असलेली अहमदनगर जिल्हा परिषदेची ही एकमेव शाळा असेल. याच शाळेचे उद्घाटन करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी मनीष सिसोदिया यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले.
अधिक माहिती देताना आमदार रोहित पवार म्हणाले, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया साहेब यांनी दिल्लीतील सरकारी शाळांचा कायापालट केला असून यापूर्वी मी या शाळांना भेट देऊन त्यांनी केलेल्या सुधारणांची पाहणी केली आहे. याच धर्तीवर मिरजगावमध्ये जिल्हा परिषदेच्या ब्रिटीशकालीन शाळेसाठी नवीन इमारत बांधली असून या इमारतीच्या उद्घाटनाचं निमंत्रण सिसोदिया साहेब यांना दिलं. याचा त्यांनी आनंदाने स्वीकार केला, त्यानुसार लवकरच उद्घाटनाची तारीखही जाहीर केली जाईल. तसंच सिसोदिया साहेब यांच्यावर राजकीय सूडातून अटकेची कारवाई केली होती. सुमारे दिड वर्षांनंतर ते जेलबाहेर आले असून यावेळी त्यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा