education: शिक्षणाच्या वंचित समूहांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय समाजकार्य संकल्पना व्यापक करणे गरजेचे - डॉ.सुरेश पठारे; उल्हास नवभारत साक्षरता अभियान कार्यशाळा संपन्न - Rayat Samachar

education: शिक्षणाच्या वंचित समूहांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय समाजकार्य संकल्पना व्यापक करणे गरजेचे – डॉ.सुरेश पठारे; उल्हास नवभारत साक्षरता अभियान कार्यशाळा संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा
5 Min Read
72 / 100

अहमदनगर | २२ ऑगस्ट | प्रतिनिधी

राष्ट्रीय समाजकार्य दिनानिमित्त सुरु असलेल्या समाजकार्य सप्ताहाच्या अनुषंगाने येथील जिल्हा परिषद education विभाग (योजना) वचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता अभियान कार्यशाळेचे आयोजन सीएसआरडी सभागृहामध्ये करण्यात आले. जिल्ह्यातील केंद्रप्रमुख शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण दिले गेले. उद्घाटन प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी नवभारत साक्षरता अभियानाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. शिक्षणाच्या मुख्य धारेपासून वंचित असलेल्या व्यक्तींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. उद्घाटन प्रसंगी सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, उपशिक्षणाधिकारी (योजना) संजय सरवदे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती संगमनेरचे बाळासाहेब गुंड, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बाबुराव जाधव, मनपा प्रशासनाधिकारी जुबेर पठाण तसेच तालुकास्तरीय नोडल शिक्षण विस्ताराधिकारी व जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख, प्रत्येक केंद्रातील एक तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते.

शिक्षणाधिकारी बुगे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, जिल्ह्यातील पंधरा वर्षांवरील निरक्षर लोकांचे सर्वेक्षण करून त्यांना साक्षर करण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविला जात आहे. या अभियानात शिक्षकांची महत्वपूर्ण भूमिका असून त्यांनी स्वयंस्फूर्त सहभाग घेऊन जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे पंधरा वर्षे व त्याहून अधिक वयाच्या अशा लोकांना वाचन व लेखनाची संधी उपलब्ध करून देणे, ज्यांना काही कारणास्तव हे शिक्षण मिळालेले नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम ता.१ एप्रिल २०२२ पासून सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रौढ शिक्षणाचे सर्व पैलू समाविष्ट असून, मुलभूत साक्षरता, सांख्यिकी ज्ञान, जीवन कौशल्ये, व्यवसायिक कौशल्ये व सतत शिक्षणाचा विकास हा या योजनेचा उद्देश आहे. शिक्षकांनी साक्षरतेच्या अभियानात सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे. शिक्षण हाच सर्वसमावेशक विकासाचा मार्ग असून शिक्षकांनी समाजाच्या सर्व घटकांपर्यंत हे शिक्षण पोहचविण्याचे कार्य केले पाहिजे, असे आवाहन बुगे यांनी केले.

कार्यशाळेत उपस्थितांना ‘उल्हास’ मोबाईल ॲपविषयी माहिती देण्यात आली. या ॲपद्वारे अध्ययनकर्ते आणि स्वयंसेवक यांची नोंदणी करून त्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या ॲपमुळे शिक्षण प्रक्रियेचा व्यापक विस्तार होऊ शकतो, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. कार्यशाळेत २०२७ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल माहिती देण्यात आली. या टप्प्यात पायाभूत शिक्षण, जीवन कौशल्ये आणि निरंतर शिक्षणाच्या माध्यमातून साक्षरता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमात जीवन कौशल्य आत्मसात करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे डॉ. सुरेश पठारे यांनी शिक्षकांशी संवाद साधत सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील शिफारशीनुसार २०३० पर्यंत सर्व तरुण आणि प्रौढ व्यक्तींना शंभर टक्के साक्षरता व संख्या ज्ञान संपादनासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे. शालेय समाजकार्याच्या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी पुढील काळात ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. समाजातील दुर्बल घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य ठरणार आहे. डॉ. सुरेश पठारे यांनी शिक्षण विभागाच्या योजनेला सीएसआरडीकडून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. साक्षरता हा समाजाच्या प्रगतीचा मूलमंत्र आहे. शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर आपली भूमिका महत्वाची आहे. शालेय समाजकार्य अंतर्गत प्रशिक्षित समाजकार्यासाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे शालेय समाजकार्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे व समाजात शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

तालुका व जिल्हा स्तरावर साक्षरता अभियानाचे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वांनी समर्पितपणे कार्य करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक संस्थांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यशाळेत शिक्षकांसाठी विविध चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. या सत्रांमध्ये साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या उपाययोजना, तंत्रस्नेही शिक्षकांची भूमिका आणि साक्षरता कार्यक्रमाचे महत्त्व याविषयी माहिती दिली गेली. उपस्थित शिक्षकांनी आपापले अनुभव व विचार मांडले. यामध्ये त्यांनी ग्रामीण भागातील साक्षरतेच्या अडचणी आणि त्यावर उपाययोजना यावर चर्चा केली.

कार्यशाळेचा समारोप करतांना संजय सरवदे यांनी शिक्षकांना उद्देशून सांगितले की, या कार्यशाळेतून शिक्षकांना नवभारत साक्षरता अभियानाचे महत्त्व आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले कौशल्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांनी या कार्यशाळेतून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून आपल्या केंद्रांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शिक्षण विभाग कर्मचारी तसेच सीएसआरडी संस्थचे प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

Read This : The Right to a Dignified Burial is Being Denied to Tribals in the Municipal Area

Share This Article
Leave a comment