अहमदनगर | तुषार सोनवणे
बोल्हेगाव गावठाण येथे मनपाच्या माध्यमातून आरोग्यकेंद्राची उभारणी करण्यात आली. पूर्वाश्रमीच्या politics ग्रामपंचायत कार्यालयाच्या जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आलेले आहे. बोल्हेगाव, गांधीनगर, रेणुकानगरसह उपनगरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. मनपातील माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी मोठा पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून याचे उदघाटन नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. संग्राम जगताप उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त यशवंत डांगे, आरोग्याधिकारी अनिल बोरगे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संपत बारस्कर, विपुल शेटीया, राजेंद्र कातोरे, साहेबराव सप्रे, भालचंद्र भाकरे, साधनाताई बोरुडे उपस्थित होते.
बोल्हेगावचे संस्थापक कै.किसनसिंग गोविंदसिंग परदेशी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात झाली. गीते मेजर, मोरया पार्क येथील आदिनाथ सातपुते, गावचे माजी सरपंच ज्ञानदेव कापडे, माजी पोलीस अधिकारी मल्हार कांबळे,तावडे काका, डॉ. कविता माने, डॉ.अपूर्वा वाळके, राजेंद्र कातोरे यांनी आपले मनोगते व्यक्त केले.
ग्रामस्थांच्या वतीने संपत पाटील वाकळे, बाबजी वाकळे, अप्पा वाकळे, बाळू वाकळे, भीमा नाना वाकळे, रावसाहेब वाटमोडे, गोरख वाटमोडे, शमसुद्दीन सय्यद यांनी आ. जगताप यांचा सत्कार केला. तर इतर मान्यवर यशवंत डांगे, अनिल बोरगे, कविता माने, अपूर्वा वाळके, भालचंद्र भाकरे, रावसाहेब सप्रे, रणदिवे साहेब, मा.नगरसेवक विपुल शेटिया, अमोल लगड यांचा सत्कार रमेश वाकळे, पप्पू कदम, बहिरू आमले, राजूआप्पा वाकळे, सदाशिव कोलते यांनी केला.
आरोग्याधिकारी अनिल बोरगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपनगरात आरोग्य केंद्राची गरज होती हे नमूद केले तसेच आरोग्य केंद्रात नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा देण्यात येतील अशी ग्वाही दिली.
पंधरा हजार लोकसंख्येमागे एक असे अठरा प्राथमिक आरोग्य केंद्र नगर शहरात उभारण्यात येतील. नागरिकांनी व्यायाम, प्राणायम, चांगले विचार अंगिकारले पाहिजे तसेच अपप्रवृत्तीच्या विचारांना मूठमाती दिली पाहिजे. अहमदनगर मनपा शहरात डेंग्युमुक्त अभियान राबवत आहे. साठवलेले पाणी तपासणी. धूर फवारणी अभियान राबवत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करून आयुक्त डांगे यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
आमदारांना पाडणे लुंग्यासुंग्याचे काम नाही – कुमारसिंह वाकळे
आभार प्रदर्शनावेळी चांगले काम करताना खूप अडचणी येतात पण त्यावर मात करून काम करावे लागते. गावातील आरोग्यकेंद्रावर तेथील कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. संपूर्ण गावकरी येथील स्टाफला सहकार्य करतील. पहिल्या वेळेस मी महानगरपालिकेत गेलो त्यावेळी पालिकेतील अधिकाऱ्यांना बोल्हेगाव कुठे आहे हे माहित नव्हते ते २०१३ नंतर सगळ्यांना माहित झाले. निधी मिळत नसतो तो मिळवावा लागतो आणि अनेक अडचणींवर मात करून कामे करावी लागतात. शंभर पेक्षा जास्त रस्ते वॉर्डात आम्ही केले. लोकसभेला प्रभागातून विखे यांना लीड दिले. असेच लीड विधानसभेलाही आमदार साहेब तुम्हाला प्रभागातून मिळेल आणि यावेळी तुम्ही ५१ हजारच्या फरकाने निवडून याल. शहराचा विकास कोणीही थांबवू शकत नाही. जनतेनेही चांगल्या माणसाच्या मागे उभे राहावे. संग्राम भैय्या हाच आमचा पक्ष साहेब तुम्ही कोणतेही चिन्ह घ्या आम्ही ते चालवू. आमदारांना पाडणं लुंग्या सुंग्याचे काम नाही. जे कोणी म्हणत असेल शहरात दहशत आहे त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद द्यावी असा टोला विरोधकांना कुमार वाकळे यांनी लगावला. मागचे २५ वर्ष आणि आत्ताचे १० वर्ष यात फरक स्पष्ट आहे असेही ते म्हणाले.
यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आभार वाकळे यांनी मानले तर सूत्रसंचालन पंकज वाकळे यांनी केले.
बोल्हेगाव करांना काम करणारे नेतृत्व लाभले – आ. संग्राम जगताप
तुम्हाला काम करणारे नेतृत्व लाभले आहे. नगर शहरात १८ आरोग्य केंद्र जरी मंजूर झाले असले तरी पहिले प्राथमिक आरोग्यकेंद्र बोल्हेगावमध्ये सुरु झाले. याचे संपूर्ण श्रेय इथल्या नागरिकांना आणि मा.नगरसेवक कुमार वाकळे यांना आहे. मागील दोन चार वर्षात आपल्या गावाचा कायापालट झाला आहे. आपण खऱ्या अर्थाने आता मनपात आलो आहोत. आरोग्याच्या बाबतीत जागृती करणे फार गरजेचे आहे. आज प्राथमिक आरोग्य केंद्र गावात चालू झाले आहे. पुढील १० दिवसात बोल्हेगाव सावेडीला जोडणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन होईल तसेच त्यानंतर बोल्हेगावात लवकरच सिटी बस चालू होईल असे आश्वासन अध्यक्षीय भाषणावेळी बोलताना आमदार जगताप यांनी दिले. नगर शहरात होणाऱ्या विकास कामासाठी राज्य सरकार भरीव निधी देत आहे. नगर शहरात राज्य सरकारच्या माध्यमातून एक एकरवर मोठा दवाखाना उभा राहत आहे. त्यासाठी राज्य शासनाने २८ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती त्यांनी दिली. मनपा दिवाबत्ती शिवाय कुठेही जास्त लक्ष देत नाही आयुक्तांने याचा विचार करून शहरासाठी भरीव निधी उपलब्ध करावा असे आवाहन जगताप यांनी केले.
कुमार वाकळे जे ठरवतात ते करतात – मा.नगरसेवक संपत बारस्कर
प्रभागात ड्रेनेज, रस्ता, पाणी, आरोग्य या सुविधा भाऊंनी निर्माण केल्या आहेत. आरोग्यकेंद्राच्या मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकत नाही, कारण आमचा हाच मानस आहे कि आपले आरोग्य कायम चांगले राहिले पाहिजे. येथील आरोग्यकेंद्रात उच्चशिक्षित डॉक्टर असणार आहेत. या आरोग्यकेंद्रात नक्कीच चांगल्या सुविधा मिळणार आहेत. या जास्तीत लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. कामात कोणीही कामचुकारपणा करू नये आणि केल्यास कुमारभाऊ च्या कामाची प्रचिती मनपातील अधिकाऱ्यांना आहेच ते ”जे ठरवतात ते करतात” याचा दाखला देताना त्यांनी मागे प्रभागात पाण्याची समस्या निर्माण झाली होती त्यावेळी मोठे आंदोलन उभारले होते. त्यानंतर पाण्याची समस्या दूर झाली पण नागरिकांची गैरसोय ज्या कर्मचाऱ्यामुळे झाली त्याला सस्पेंड करा अशी मागणी त्यांनी लावून धरली शेवटी मनपाने त्यांना काही दिवस रजेवर ठेवले नंतर आम्ही आणि आयुक्त साहेबांनी मध्यस्ती करून त्या कर्मचाऱ्याला परत कामावर रुजू केले अशी मिशक्कील टिप्पणी बारस्कर यांनी केली. त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. अशा सर्वांगीण विकासासाठी भाऊंना साथ देणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. पुढे बोलताना यशवंत डांगे सारख्या दबंग अधिकाऱ्याची शहराला गरज होती. ते शहरासाठी नक्कीच भरीव कार्य करतील अशी आशा आहे. आम्ही निवडणुकीसाठी राजकारण करीत नाही. विरोधक दारोदारी फिरत आहेत परंतु जनता त्यांना भीक घालणार नाही. आमदार संग्राम जगताप यांची नाळ जनतेशी जोडलेली आहे त्यामुळे ते प्रचंड मताने निवडून येतील असेही ते म्हणाले.