अहमदनगर | प्रतिनिधी
जिल्ह्यासह शहराची कामधेनू असलेली नगर अर्बन बँक सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. न्यायालयाची कठोर न्याय्य भूमिका, बँक बचाव समितीचा अभ्यासपुर्ण कारभार, काही इमानदार ठेवीदारांचा चिवट लढा, माध्यम प्रतिनिधींची सक्रीय साथ या सर्वांचा परिपाक दिसून येवू लागला आहे. संगमनेरचा मोठ्ठा राजकीय पाठबळ असलेला थकबाकीदार अमित पंडीत याने नुकतेच १०.६४ कोटी रूपये बँकेत भरले आहेत. न्यायालयाने तात्पुरता जामिन देताना तशी अट घातली होती. ती अट पुर्ण झाली व ठेवीदारांचे हक्काचे, कष्टाचे पैसे बँकेत जमा झाले. कालच असाच एक पुण्याचा बिल्डर सुशिल अग्रवाल यानेही या सामुहिक दणक्यामुळे १ कोटी रूपये जमा केले आहेत.
हे दोन्हीही थकबाकीदार फार म्हणजे फारच मोठे होते. सत्ता, संपत्ती व सर्व प्रकारचे पाठबळ असलेल्या व्यक्ती जर थकबाकी भरत असतील तर इतरांनीही लवकर भरून बँकेस सहकार्य करावे असे आवाहन बँक बचाव समितीने केले आहे.
केंद्र व राज्यातील राजकीय पाठबळाने नगर अर्बन बँक अक्षरशः लुटली गेली होती. बँक बचाव समिती शिलेदार तथा माजी संचालक राजेंद्र गांधींसह ॲड. अच्युतराव पिंगळे, राजेंद्र चोपडा, अरूण बोरा अशा अनेकांनी एकजूटीने चिवट लढा दिला. त्यास काही इमानदार ठेवीदारांची साथ दिली. यातून सकारात्मक परिणाम समोर यायला सुरूवात झाली आहे.