राहुरी | प्रतिनिधी
तालुक्यातील वांबोरी येथील युवालेखक आशिष अशोक निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ चरित्रग्रंथास सातारा येथील प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी नुकतीच दिली.
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार स्पर्धेचे पुरस्कार जाहीर झाले. यावेळी अध्यक्ष संदीप डाकवे, उपाध्यक्ष आप्पासाहेब निवडूंगे, सचिव रेश्मा डाकवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विविध साहित्यकृतींमधून हरहुन्नरी लेखक आशिष निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ या चरित्रग्रंथाची निवड झाली असून यंदाचा राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
एका संकटग्रस्त कुटुंबातील स्त्रीला संशयकल्लोळातून कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागले, हे सांगणारी ही वास्तव कथा या ग्रंथातून मांडण्यात आली आहे. एका आईचे कर्तव्य पार पाडले. कुठलाही दोष नसताना, गैरसमजाच्या अग्निदिव्यातून जात तिने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. यात आपले अस्तित्व, ओळख मात्र ती पार विसरून गेली. रमाबाई कांबळे यांचा जीवनपट वाचून आपल्या जीवनातील असंख्य अडचणी आपल्याला नगण्य वाटतील व स्त्रीचा आदर करणे गरजेचे आहे हे देखील मनोमन पटते. नात्यांची ओळख सांगणारे हे आशयघन पुस्तक काळजाचा ठाव घेणारे आहे. एरवी कुणाच्या लक्षातही न येणाऱ्या सामान्य स्त्रीचे ‘अग्निदिव्य’ आशिष निनगुरकर यांनी आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून प्रकाशात आणले. याच ग्रंथाची दखल स्पंदन संस्थेने घेतली असून ‘चपराक प्रकाशन’ची दर्जेदार Literature निर्मिती असलेल्या ग्रंथाला साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
आशिष यांची आतापर्यंत एकूण आठ पुस्तके प्रकाशित झाली असून या पुस्तकांनी साहित्यक्षेत्रातील विविध मानाचे साहित्य पुरस्कार पटकावले आहेत. त्यातील ‘अग्निदिव्य’ची दखल घेण्यात आली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कारप्राप्त लेखक आशिष निनगुरकर यांना लवकरच एका समारंभात गौरवण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली. आशिष निनगुरकर यांचे सर्वत्र कौतुकासह अभिनंदन होत आहे.