अहमदनगर | विजय मते
विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम आई-वडील यांचा आदर करावा. ते सर्वात पहिले आपले गुरु. ज्ञानाच्या रूपाने शिक्षक तुमचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करीत असतात. जीवनात गुरूंना आदर्श मानून त्याचे पालन करा. जीवनातील अज्ञानरूपी अंधाराला दूर करण्यासाठी प्रत्येकाने गुरूंचा आदर करावा. असे प्रतिपादन डॉ. श्याम पांगा यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाअुलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. पांगा यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्या अनुराधा चव्हाण, डॉ. वेणू कोला, डॉ. प्रसाद घुगरकर, डॉ. विजय तारडे, डॉ. रोशनी सूर्यवंशी, प्रणाली अनमल, स्वाती कडनोर, पल्लवी कदम, शितिका वाघ आदींसह शिक्षक शिक्षका वृंद उपस्थित होते.
डॉ. पांगा पुढे म्हणाले, जीवनात प्रत्येकाला गुरुची गरज असते. गुरु नसेल तर जीवन निरर्थक आहे. गुरु आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात. आपल्या उणिवा ओळखून गुरु त्या सोडवून आपले जीवन सुकर करतात. गुरु आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने शिष्यांचे अज्ञान दूर करून त्यांना सत्याकडे घेऊन जातात. जीवनात आपल्याला अलौकिक व्यक्तिमत्व गुरु देत असतात. तेव्हा त्यांचा आदर करावा. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रथम डॉ.ना.ज.पाअुलबुधे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शिक्षकांविषयी असलेले प्रेम केवळ गुरुपौर्णिमेला व्यक्त न करता आम्ही रोजच त्यांचा आदर करतो. अशा भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी काळे यांनी केले तर ओंकार पानसंबळ यांनी आभार मानले.