अहमदनगर | प्रतिनिधी
जिल्ह्यासह शहराची कामधेनू असलेली नगर अर्बन बँक भ्रष्ट संचालकांसह लोचट अधिकारी यांनी अक्षरशः लुटून खाल्ली. भारतातील अनेक बँका व्हाईटकॉलर क्रिमिनल्सने लूटल्या. ठेवीदारांचे लाखो रूपये वसूलीविना पाण्यात गेले. तेथील ठेवीदारांना योग्य मार्गदर्शन व व्यापक एकजूट नसल्याने बँक लूटारूंचे काहीच वाकडे झाले नाही. ते राजरोसपणे केंद्र व राज्य सरकारच्या आशिर्वादाने उजळमाथ्याने फिरत असताना अहमदनगरमधील ११३ वर्षे जुनी असलेली वैभवशाली बँक अशीच केंद्रातील सरकारच्या राजकीय पाठबळाने लुटून बुडविली. परंतु येथे ॲड. अच्युतराव पिंगळे, बँक बचाव समिती शिलेदार तथा माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या बँकींग अभ्यासाच्या मार्गदर्शनामुळे आणि ठेवीदारांच्या व्यापक एकजूटीमुळे लुटणाऱ्या व्हाईटकॉलर क्रिमिनल्सची
पळताभुई थोडी झाली. आता बँक जागेवर येण्याची चिन्हे दिसत आहेत. बँक बचावचा चिवट लढा योग्य वळणावर येवून ठेपला आहे.
बँक बचाव समितीचे ज्येष्ठ सदस्य कॅप्टन धोंडोपंत कुलकर्णी यांनी समितीच्या वतीने कर्जदारांसह लुटारू संचालकांना कळकळीचे शरण येण्याचे आवाहन केले आहे की, …आता बस झाले! किती दिवस तुम्ही बायका, मुलांना, घरच्या कुटुंबाला सोडून बाहेर रहाणार आहात ?
सविस्तर आवाहन येथे वाचा :
नगर अर्बन बँकेवर प्रेम करणारे लाखो नगरवासीय नागरिक व्यापारी, उद्योजक, तरूण वर्ग, ठेवीदार बंधू भगिनींनो,
अगदी काही महिन्यापूर्वी बँकेविषयी कुत्सित उद्गार, बँकेची हेटाळणी कुचेष्ठा केली जात होती. ४/१०/२०२३ रोजी बँक बंद पडल्यानंतर बँकेचे तत्कालीन चेअरमन संचालक अधिकारी ज्यांनी ज्यांनी बँक बंद पाडण्यात सहभाग घेतला ते सर्वजण अतिशय आनंदात दिवस साजरे करीत होते. मोठमोठे कर्जदारही आता आपणाला कर्ज भरण्याची जरूरी नाही त्यांन तत्कालिन चेअरमन, संचालक कर्ज भरू नका, अशी ताकीद देत होते. ते कर्जदारही बिनधास्तपणे मुक्तसंचार करित होते.
दिवस पलटतात, असे म्हटले जाते त्याप्रमाणे आता बँकेचे दिवस पलटू लागलेले आहेत. बँक बंद पाडल्यानंतर अधिक त्वेषाने, जिद्दीने, जोमाने आणि चिवटपणे बँक बचाव संघर्ष समितीचे काम व चळवळ अधिक गतीमान व शक्तीने सुरू केली. निरंतर विचार विनीमय करून नियोजनबद्ध रितीने अंदोलने आयोजित केली.
पहिला मोर्चा आयोजित झाला त्या मोर्चाची हेटाळणी सहन केली. थांबलो नाही पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात यशस्वी झालो. अनेक प्रकारचे पत्रव्यवहार पोलीस प्रशासनासह केंद्रिय सहकार खाते अधिकारी यांचेकडे केले. परंतु दुसरा आसूड मोर्चा आयोजित करून पोलीस प्रशासनास या आंदोलनाची गंभीर दखल घेणे भाग पडले. सातत्याने भेटीगाठी, चर्चा चालूच ठेऊन पोलीस प्रशासनाचे धिमे सहकार्य लाभू लागले. त्यामुळे बँकेचे संचालक, चेअरमन सतर्क झाल्याने अटकेच्या भितीने परागंदा झाले. त्यातही आमचा संघर्ष चालूच राहिल्याने अंतिम परिणाम बँकेचे चेअरमन व दोन संचालकांची अटक अटळ झाली. त्या धक्क्याचा परिणाम इतर संचाकल अटकेच्या भितीने आजपर्यंत फरार झाले आहेत.
रस्ता रोको आंदोलन यशस्वी केले. त्याचा परिणाम आणखी काहीजण दोषी अधिकारी, कर्जदारांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याने व त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई सुरू झाली. त्यापुढे पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळू लागलेले आहे.
आणखी खूप महत्त्वाची अभिमानाची व आनंदाची बाब म्हणजे अहमदनगर जिल्हा न्यायालयाचे मा. जिल्हा न्यायाधिश पी. आर. सित्रे साहेब हे खूपच सहृदयी व बँकेच्या बाबतीत सहानुभूती ठेवणारे असे न्यायाधिश लाभले आहेत. सुरूवातीपासूनच बँकेच्या ठेवीदारांची बाजू शांतपणे ऐकून घेऊन त्यातही महिला ठेवीदारांच्या डोळ्यातील अश्रूंची गळती व व्याधीग्रस्त महिलांच्या भावना ऐकून घेऊन, समजून घेऊन ठेवीदारांना सहानुभूती ठेऊन आरोपी कोणीही समोर येईल त्याला जामिन मंजूर करायचा नाही अशी ठाम व कणखर भूमिका घेऊन आतापावेतो पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या मोजक्याच का होईना १०-१५ आरोपी कर्जदारांना जामिन मंजूर केलेला नाही. इतकेच नाही तर अटकपूर्व जामिनासाठी आलेल्या अर्जाच्या सुनावणीतही आधी बँकेच्या कर्जाची रक्कम भरा नंतर जामीन बघू असे ठाम निर्धाराचे न्यायाधीश बँकेला लाभले. हे बँकेचे दिवस पालटल्याचे संकेत दिसत आहे.
बँकेचे कर्ज भरायचेच नाही. आपले कोणी काही करू शकत नाही अशी भूमिका घेणाऱ्या व कित्येक दिवसापासून कर्ज थकबाकी असतानाही न जुमानणाऱ्या संगमनेरस्थित बड्या राजकिय संरक्षण असणाऱ्या अमित पंडीत सारख्या खोट्या कर्जदाराला १६ कोटी थकबाकी भरणे भाग पडले. तसेच पुणे येथील मोठे कर्जदार सुशील घनश्याम अग्रवाल सारख्या कर्ज चुकवणाऱ्या महाठकालाही नुकतेच एक कोटी कर्ज भरणा करावाच लागला आहे.
मा. न्यायालयाच्या न्यायालयीन परिणाम बँकेच्या कर्ज वसूलीत झाला आहे व पुढेही निश्चित होणार आहे. अशा न्यायाधिश साहेबांचा आम्हाला जरूर अभिमान असून त्यांचे आम्ही हृदयापासून आभारी व ऋणी आहोत.
अशा न्यायी न्यायधिशांकडील कामकाज काढून घेऊन अन्य न्यायाधिशांकडे देण्याच्या हालचाली बँकेविरुद्धच्या समाजकंटकांकडून झाल्या परंतु ठेवीदारांच्या सामुहिक प्रयत्नातून त्या हालचाली आम्ही हाणून पाडल्या. अशा ठेवीदारांना त्रिवार सलाम.
बँकेचे दिवस पालटायला सुरूवात झाली असे म्हणताना बँकेला लाभलेले बँकेचे अवसायक गणेश गायकवाड साहबे यांनी पदभार स्विकारताच बँकेच्या कर्जवसुलीस प्राधान्य देत त्यासाठी आवश्यक एकरकमी कर्जफेड योजना मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली व ती एकरकमी कर्जफेड योजना नुकतीच मंजूर करुन आणली त्याचा फायदा मोठमोठ्या कर्जदारांना ते देऊ लागले आहेत.
बँकेची कर्जाची आतापावेतो ३० कोटी ८६ लाखांची वसूली झालेली आहे. शिवाय पाच लाखाच्या आतील ठेवीदारांना रु. ६३ कोटी परतावा देण्यासाठी डी.आर.सी.ची ६५ कोटींची विमा रक्कम पाठवून ही ६३ कोटीची ठेव रक्कम परवानगी येत्या एक दोन महिन्यात ठेवीदारांना मिळणार आहे. एकरकमी कर्जफेड योजनेमुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी कर्जाची वसूली होणार आहे. गायकवाड साहेब यांना नुकतेच बँकेच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देऊन बँकेच्या कर्जाची वसुली करण्यासाठी त्यांना कार्यप्रवण केले आहे. असे दैनंदिन २० ते २५ कर्मचारी ढोल, ताशा, झांज पथकांसह कर्जदारांच्या दारात जाऊन नेटाने कर्जाची वसुली करू लागले आहेत. ते कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.
एक रकमी कर्जफेड योजनेतून कर्जाची मोठ्या प्रमाणात वसूली झाल्यानंतर आणखी अंदाजे ८० कोटी वसुली झाली तर ५ लाखांच्या वरील ठेवीदारांच्या रकमाही येत्या सहा महिन्यात परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय बँकेकडे सरप्लस निधी शिल्लक राहू शकेल व बँक पुन्हा पुनर्स्थापित होण्यास अडचण येणार नाही असा ठाम विश्वास अवसायक गणेश गायकवाड यांनी ठेवीदार संघर्ष समितीच्या सदस्यांबरोबर संपन्न झालेल्या बैठकित व्यक्त केला आहे. अशा अवसायकांचे आम्ही हृदयापासून अभिनंदन करीत आहोत.
आम्ही कमी पडतो ते पोलीस दलाचे म्हणावे असे सहकार्य मिळत नसल्याने. आम्ही बँकप्रेमी नागरिक, व्यापारी, उद्योजक, तरूण वर्गाला मनापासून विनंतीपूर्वक आवाहन करीत आहोत की, पोलीस दलांबरोबर वारंवार भेटीगाठी चर्चा हा आमचा सिलसिला चालू आहेच. यापूर्वीही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. पोलीसदलाने बँकेच्या महाकाय प्रचंड आर्थिक घोटाळ्याचा फॉरेन्सिक ऑडिट शोध घेतलेला असून त्यातून प्रथम दर्शनी १०५ आरोपी निष्पन्न झालेले असून त्यापैकी जवळपास ८० ते ८५ आरोर्षीचा शोध अद्यापही लागलेला नाही. तसेच फॉरेन्सिक ऑडिटही अपूर्ण असून ते पूर्ण करून घेऊन त्यातून निष्पन्न होणारे २० ते २५ आरोपींचा शोध घेणे जरूरीचे आहे. ते सर्व पूर्ण करून सर्व आरोपींना अटक होणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनास आम्ही वारंवार संपर्क करीत आहोत. परंतु पुनःश्च लवकरच स्वतंत्र निवेदन देऊन ता. १५ ऑगस्ट २०२४ ची अखेरची डेडलाईन देऊन उर्वरीत आरोपींचा शोध घेण्यास अंतिम इशारा देऊन त्यानंतर फक्त तीन दिवसांची शॉर्टनोटीस देऊन केव्हाही नगर-औरंगाबाद रोडवर पोलीस अधिक्षक कार्यालयानजीक ११ ते ३ वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
आपण सर्वजण बँकप्रेमी बँकेवर नितांत प्रेम करणारे आहात. आपल्या नगर जिल्ह्याची कामधेनू असलेली, नगरचा ऐतिहासिक ठेवा जतन करणे व बँक पुनर्स्थापित होणेस्तव या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग द्यावा.
नगरचा व्यवसाय बंद रहाणाऱ्या बुधवारचा दिवस मुद्दाम निवडून याप्रमाणे बँकच्या सर्वसाधारण सभेत टिनपाट खाऊच्या पुड्यासाठी सहकार सभागृहात आपण रांगेत होतात. त्याच एका बुधवारच्या दिवशी आपला व्यवसाय दुकान कृपया अर्धा दिवस बंद ठेवून आंदोलनास बहुसंख्येचे पाठबळ द्यावे.
पोलीस प्रशासनास आरोपीचा शोध घेण्याचे कार्य हाती घ्यावेच लागेल. याच प्रेमाचे निवेदनाद्वारे फरार संचालक अधिकारी यांनाही आणि विनम्रतेचे आवाहन करतो की, आता बस झाले. किती दिवस तुम्ही बायका मुलांना घरच्या कुटुंबाला सोडून बाहेर रहाणार आहात ? बाहेरचे खाणार आहात ? किंवा बाहेर रहायचे म्हणजे पुन्हा नातेवाईकांना त्रास देणार आहात ? पावसापाण्याचे दिवस आहेत. बाहेरचे खाऊ पिऊ नका, प्रकृती बिघडेल. आता बस झाले. या परत आपल्या घरात. एखाद दिवस कुटुंबाबरोबर घालवा व दुसऱ्या दिवशी पोलीसांना शरण या.
नाहीतरी आता तुम्ही केलेल्या कुकर्माची जबाबदारी शासन आपणावर लवकरात लवकर निश्चित करणारा आहे. ती जबाबदारी पेलणे व त्या जबाबदारीची रक्कम भरणे आपणाला अटळ ठरणार आहे. मग आता बाहेर का दिवस घालवता. या तुमच्या व पोलीसांच्या दारात आनंदाने घालवा तुमच्यावरच्या जबाबदारीची रक्कम तातडीने भरा. पोलीसांवरील व बँक बचाव कृती समितीवरील भारही हलका करा. अशी आम्ही आपणांस प्रेमाची विनंती करीत आहोत,असे आवाहन बँक बचाव कृती समितीच्या वतीने डी. एम कुलकर्णी यांनी केले.