जामखेड | रिजवान शेख, जवळा
तालुक्यातील खर्डा येथे काल ता. २४ जुलै रोजी शहरातील ग्रामपंचायतची जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतीचा पहिल्या मजल्यावरील काही भाग कोसळला असून याकडे ग्रामपंचायतीने कमालीचे दुर्लक्ष केले.
ग्रामपंचायतच्या जुन्या इमारतीमधील दुकान ग्रामपंचायतच्या कार्यालयाखाली असून या दुकानातील इमारतीच्या आतील भाग अचानक कोसळला, परंतु ग्रामपंचायतने भाडेतत्त्वावर दिलेल्या दुकानात काम करणारे ओंकार वडे हा युवक दहा मिनिटांपूर्वी जेवणासाठी घरी गेल्याने तो गंभीर अपघातातून बचावला असून, त्याच्या दुकानातील कॉम्प्युटर व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा जीवाची हानी झाली असती तर याला जबाबदार कोण होते, असा प्रश्न या घटनेने निर्माण झाला आहे.
खर्डा शहरातील जुनी ग्रामपंचायत (कमेटी) ही जीर्ण झालेली धोकादायक इमारत कधीही पडू शकते. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका होऊ शकतो म्हणून ही इमारत पाडावी यासाठी ग्रामस्थ गेली अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. मागील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी ठराव मंजूर करून जिल्हा परिषदकडे ता. १३/१०/२०२१ ला पाठवल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने ही इमारत पाडण्यास हरकत नसल्याचे सांगितले. सध्याचे ग्रामपंचायत प्रशासन कमालीची दुर्लक्ष करत आहे.
धोकादायक इमारत पडून कोणाचा तरी जीव जावा याची वाट ग्रामपंचायत प्रशासन पाहत आहे की काय ? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित देखील केला जात आहे.
ही खर्डा शहरातील जुनी ग्रामपंचायत (कमेटी) ची इमारत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून रहदारीस मोठा अडथळा होत आहे. ही इमारत पाडणे अत्यंत आवश्यक बनले आहे. जर ही इमारत पडून अपघात झाला तर जीवित हानीही होऊ शकते.
समस्त खर्डा ग्रामस्थ यांच्या वतीने आकाश पवार, गणेश सुळ, बबलू सुरवसे, गणेश नेहरकर, मयुर सुरवसे, पृथ्वी चव्हाण, सारंग जोरे, अक्षय जायभाय, गोरख चव्हाण, रियाज बागवान, सुशांत सुळ, महेश चव्हाण, लुकमान बागवान, आकाश पवार, आदी तरूणांनी या गंभीर बाबीसाठी ग्रामपंचायतकडे पाठपुरावा देखील केला. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांमधून चर्चा होताना दिसत आहे.