नगर तालुका | तुषार सोनवणे
येथील चांदबिबी महालावर अहमदनगर जिल्हा वॉलपेंटर्स असोसिएशनच्या वतीने Artist सदस्यांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मागील काही वर्षात डिजिटल, फ्लेक्स प्रिन्टिंगच्या युगात जिवंत चित्रकला असलेली वॉलपेंटिंग करणाऱ्या कलाकारांवर काम मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. मोठमोठे भांडवलदार स्पर्धेत असल्याने कलाकारांची पिळवणूक होते. त्यांच्या समोरील डिजीटल युगाची मोठी आव्हाने आणि समस्या असून यावर मेळाव्यात चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्याचे ‘सांस्कृतिक धोरण’ असून त्यामधे कलाकारांना त्यांची कला वाढविण्यासाठी संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासनाकडे एकजूटीने विविध मागण्या कराव्या लागणार असल्याची चर्चा झाली.
अलीकडच्या काळात पेंटींग कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. डिजिटल युगात काम मिळणे कठीण झाले आहे, त्यासाठी संघटित होऊन नवीन कामाची संधी शोधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन असोसिएशनचे अध्यक्ष निसार पठाण यांनी केले. यासारखे जास्तीत जास्त समाजाभिमुख कार्यक्रम घेण्याची गरज असल्याचे संघटनेचे सचिव विठ्ठल पुरी यांनी बोलताना सांगितले.
यावेळी Artist संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र पवळ, खजिनदार विलास येलूलकर, सुनील गायकवाड, विजय आगळे, बाळासाहेब केदारे, अरुण थोरात, अनिल शिंदे, सचिन खुडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण थोरात यांनी तर आभार मार्गदर्शक बाबासाहेब तुंगार यांनी मानले.