अहमदनगर | प्रतिनिधी
श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी ता.२० जुलै रोजी सावेडीतील माऊली सभागृहात ‘क्रांतीज्योती कृतज्ञता सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक अहमदनगर शहरातील शिक्षणक्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षक गुरुजनांचा खा.निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी खा. लंके म्हणाले की, गुरु हे खऱ्या अर्थाने आपल्याला जीवन जगण्याचा आधार शिकवतात, गुरु हे केवळ व्यक्तिमत्वच नव्हे तर संपूर्ण कुटुंब घडवितात. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरूंचा सत्कार करणे ही एक विलक्षण संकल्पना अभिषेक कळमकर यांनी मांडली असून व्यक्तीने कुठल्याही क्षेत्रात काम करीत असताना त्या क्षेत्रात छत्रपती शिवरायांप्रमाणे उत्कृष्ट काम करायला हवे, असेही लोकप्रिय खा.डॉ.निलेश लंके म्हणाले.
खा. लंके पुढे म्हणाले की, शिक्षकांनी अनेकांचे कुटुंब घडविले आहे. अहमदनगर शहरात असे अनेक गुरुवर्य आहेत ज्यांच्यामुळे अनेकांच्या जीवनाला आधार मिळाला आहे. अशा शिक्षकांचा सत्कार करण्याची अभिनव संकल्पना अभिषेक कळमकर यांनी मूर्त स्वरूपात आणली, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि असे स्तुत्य उपक्रम पुढेही चालू रहावे अशी अपेक्षा खा.लंके यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रास्ताविक मनोगतात अभिषेक कळमकर म्हणाले, महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने गेल्यावर्षी शिक्षकांचा सत्कार व्हावा याकरिता पुरस्कार जाहीर केले परंतु आजअखेर शिक्षकांना पुरस्कारीत करण्यात आलेले नाही ही शोकांतिका आहे. शहरातील गुणवंत शिक्षकांनी माझ्यासह अनेकावर संस्कार केले. पिढ्या घडवल्या त्या ज्ञानतपस्वी गुणी गुरुजनांचा सन्मान व्हावा यातून युवा पिढीपर्यंत एक वेगळा सामाजिक आदर्श जावा व गुरुजनांपासून दुरावत चाललेल्या गुरुशिष्य परंपरेचा सांधा पुन्हा जुळावा, हीच अपेक्षा ठेवून सोहळ्याचे आयोजन केल्याचे प्रतिपादन अभिषेक कळमकर यांनी केले.
खेळाडू यांच्या जीवनात शिस्त ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि हीच शिस्त शिक्षकांच्या शिकवणीच्या माध्यमातून आपण आत्मसात करतो. हल्ली राजकारणात अनेक पेचप्रसंग उद्भवतात अशात शिक्षकांनी शांत राहण्याची दिलेली शिकवण आठवते. शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमी शांत रहा, असे सांगतात. त्याचीच प्रचिती आज मी माझ्या राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना घेत आहे. असे प्रतिपादन श्रीयोग प्रतिष्ठानचे अभिषेक कळमकर यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खा. डॉ.निलेश लंके, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, जिल्हा परिषद अहमदनगरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडुस, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
अशोक कडूस, रमाकांत काठमोरे, दिनकर टेमकर या जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातील मान्यवर अधिकाऱ्यांनी आजचे बदलते शिक्षण शिक्षक व आधुनिक तंत्रज्ञान यातही शिक्षक सर्वोच्चस्थानी असणार आहे.
अगदी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनाच्या वाटेवर शिक्षकांशिवाय गत्यंतर नाही हे सांगितले. तंत्रज्ञान परिवर्तन घडवून आणू शकेल पण ते तंत्रज्ञान पुढे घेऊन जाण्यास शिक्षकच असावा लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेत भावनिक व चारित्र व शीलसंपन्न बुद्धिमत्ता आणि बाल मानसशास्त्र जाणण्यासाठी शिक्षकच पाहिजे. पारंपरिक शिक्षणव्यवस्था परिवर्तनाकडे घेऊन जाणारा खरा दुवा शिक्षकच आहे.
अहमदनगरचे विडंबनकार व ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांनी शिक्षक, शिक्षण व राजकारण यांच्यात अडकलेला शिक्षक व त्यातून हवी असलेली गुणवत्ता यावर कोपरखळ्या मारीत शैक्षणिक वैगुण्यावर मुक्त फटकेबाजी केली. गुरुजीचे स्थान फक्त गुरुजीच घेऊ शकतो हे मात्र त्रिकाल बाधित सत्य आहे.
सन्मानासाठीच्या निवड समितीने शिफारस केलेल्या प्राचार्य खासेराव हणमंतराव शितोळे, शंकर भीमराज बारस्कर, प्रा. बाळकृष्ण बालय्या सिद्दम, रतीलाल धोंडीराम कासवा, अर्जुन तात्याभाऊ पोकळे, डॉ.प्रा.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजिज, राजेंद्र धोंडीबा लांडे, पोकळे विजयकुमार कारभारी, नवनाथ सहाद् बोडखे, अर्चना पद्माकर गिरी, भरत शामराव बिडवे, विठ्ठल बाळासाहेब उरमुडे, शीतल शहादेव बांगर, अरविंद जुगलकिशोर कुडिया, बाबासाहेब बबन शिंदे, श्रीकांत निंबाळकर, भाऊसाहेब शंकर कबाडी, संजय धोपावकर, उद्धव सोन्याबापू गुंड, अंजली जितेंद्र वल्लाकट्टी देवकर, बाबर रावसाहेब एकनाथ, संजयकुमार हरीश्चंद्र निक्रड, शिंदे अंबादास गोवर्धन, तेज उम्नेश प्रसन्नकुमार, पोपट पांडुरंग लोंढे, शेख नसीम इब्राहीम, नंदा सतीश कानिटकर, शुभांगी सुभाष नायर, अशोक बाबुराव डोळसे, सतीश सुखदेव मेढे, विद्या महेश पोतदार, गोविंद जयवंत कांडेकर, नूतन संदीप पाटोळे, डॉ.गोवर्धन गोविंद पांडुळे, सीमा शिवाजी म्हस्के, संजय पडोळे, खान मेहरिम अनुकशीन, वृषाली प्रसाद कुलकर्णी, विमल संजय कानडे यांचा सत्कार करण्यात आला.
अतिशय नियोजनबद्ध व आकर्षक आणि शेवटपर्यंत भरगच्च असा वंदनीय सोहळा शहरात प्रथमच पार पडला यासाठी श्रीयोग प्रतिष्ठानने शहरातील प्रत्येक शाळेत जाऊन सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. यावेळी सर्व शिक्षकांना आपला अभिषेक म्हणुन गुरुपौर्णिमेनिमित्त छोटीशी भेट दिली.