अहमदनगर | प्रतिनिधी
बाल संगोपन योजनेचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी रामवाडी झोपडपट्टीमधील कचरा वेचकांच्या मुलांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर काळे फुगे सोडून अनोख्या पध्दतीने आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले.
कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत समितीच्या वतीने विकास उडानशिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये रामवाडी भागातील बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बालकांनी तोंडावर दु:खी भाव असलेले मुखवटे लाऊन योजनांचा लाभ मिळण्यासाठी जोरदार निदर्शने केली.
रामवाडी भागात बहुतांश कचरावेचक असून, त्यांच्या मुलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाने एकल बालकांसाठी दरमहा २,२५०/- रुपये मानधन देण्याची योजना सुरु केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कचरावेचक हा वर्ग वंचित राहिलेला आहे. कचरा वेचकांची अनेक एकल बालक या योजनेपासून वंचित असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
रामवाडी भागात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी विशेष शिबिर घेऊन लाभार्थींचे अर्ज भरुन घ्यावे, शासकीय योजनेचा एकल बालकांना हक्क मिळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नारायण कराळे यांना देण्यात आले.
रामवाडी भागातील अनेक एकल बालकांचा प्रश्न गंभीर आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांचा सर्व्हे होणे अपेक्षित आहे. या मुलांना शासकीय योजनांचा लाभ देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पाऊले उचलली न गेल्यास ते देखील पारंपारिक पध्दतीने भविष्यात कचरा वेचक होणार आहे. या बालकांना प्रवाहत आणण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.
– विकास उडानशिवे (अध्यक्ष, कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत समिती)