मुंबई | प्रतिनिधी
उद्या ता. २३ जुलै रोजी कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅली निघणार असून अकोले व संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक पक्षभेद विसरून शेतकरी म्हणून Protest आंदोलनात सामील होत आहेत. याविषयी रा.कॉं.चे शरद पवार यांनी अकोले येथील मेळाव्यात शब्द दिल्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांकडे दूध उत्पादकांचा प्रश्न मांडण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरेसा वेळ दिला. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने शरद पवार व एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी डॉ. अजित नवले, विनोद देशमुख, अभिजित देशमुख, बबलू देशमुख, प्रकाश देशमुख व नामदेव साबळे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
उद्या होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व ट्रॉलीसह सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी समितीने केले.
दुधाला ४० रुपये भाव मिळावा, दुधाला एफ.आर.पी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दूध भेसळ थांबावी, पशुखाद्याचे दर कमी करावे आदी मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सुरू असलेले आंदोलन प्रश्न सुटेपर्यंत सुरू ठेवण्याचा संकल्प दूध उत्पादकांनी केला आहे.
उद्या निघणाऱ्या भव्य ट्रॅक्टर रॅलीमध्ये अकोले व संगमनेर तालुक्यातील शेकडो ट्रॅक्टर सामील होत असून ट्रॅक्टर रॅलीची रांग किमान दहा किलोमीटर लांब असेल व५५ किलोमीटरचे अंतर पार करून रॅली संगमनेर शहरात धडकेल. दूध व्यवसायात शेतकऱ्यांसाठी केवळ शेण शिल्लक राहिले आहे. ट्रॅक्टरच्या मधून शेण नेत प्रांत कार्यालयाच्या समोर ते ओतून शेतकरी या रॅलीच्या माध्यमातून आपला असंतोष व्यक्त करणार आहेत.
ता. २३ जुलैच्या भव्य रॅलीनंतर सुद्धा कोतुळ येथे सुरू असलेले व राज्यभर सुरू असलेले आंदोलन प्रश्न सुटेपर्यंत सुरूच राहणार आहे, असे समितीने सांगितले.