श्रीगोंदा | गौरव लष्करे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीगोंदा दौऱ्यावर असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उद्या दुपारी ठिक १ वाजता मेळावा होणार आहे.
नागवडे साखर कारखान्याच्या चेअरमन तथा NCP काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी’ योजना महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केली असून, श्रीगोंदा तालुका आणि विशेषतः नागवडे यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी योजना प्रभावीपणे ग्रामीण भागांतील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. तसेच अजित पवार याचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे देखील यावेळी आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले.
नागवडे म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महिलांसाठी असून, या संदर्भात अजित पवार महिलांशी संवाद साधणार असल्यामुळे काही महिलांना अजित पवारांशी बोलण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे महिला भगिनींची उपस्थिती महत्त्वाची असणार आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याच दिवशी अजित पवारांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचे अभिष्टचिंतन आणि सत्कारही करण्यात येणार आहे. म्हणून राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी केले आहे.
मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते उपस्थित राहणार आहे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे प्रदेश युवकाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह आ. संग्राम जगताप, राज्य मार्केट कमिटीचे अध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, राज्य पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आदींसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.