INDIA: फुकट्यांचा देश भारत ? प्रविण भिसे यांचे प्रासंगिक वाचा - Rayat Samachar

INDIA: फुकट्यांचा देश भारत ? प्रविण भिसे यांचे प्रासंगिक वाचा

रयत समाचार वृत्तसेवा
20 / 100

प्रासंगिक | प्रविण भिसे

    भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या विविध योजनांचा अभ्यास करता, भारत हा फुकट्यांचा देश होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. ‘जनतेला फुकट वाटा आणि सत्ता भोगा’ अशी परिस्थिती आज भारतात आहे. येथील जनतेला सुविधाही हव्यात पण वैयक्तिक स्वार्थ त्याहून मोठा. नेमकी हीच मानसिकता राजकारण्यांनी ओळखून फुकट वाटण्याचा सपाटाच लावला आहे.

एसटी बस मोफत केली. गरज नसताना लोक फिरत आहेत. परिस्थिती ही आहे की बसमध्ये पाय ठेवायलासुद्धा जागा नाही. निराधार योजना आणली पण चांगला भक्कम आधार असणारे लोक सुद्धा या योजनांचा भरपूर फायदा घेत आहेत. शेतकऱ्यांना शेतविमा, विविध सबसिडी, शेतकरी सन्मान निधी, विहीर, पंप, पाईप, स्पिंकलर, म्हशी, बकऱ्या… मोफत योजनांचा पाऊस पडत आहे.

पीएम आवास योजनेअंतर्गत मोफत घरे. मोफत आरोग्य पाच लाखापर्यंतचे आरोग्यविमे. मोफत धान्य, मोफत गोदाम. आता महिलांना लाडकी बहिण योजना. थोडक्यात काय तर मध्यमवर्गीय, नोकरदार, आणि टॅक्स पेयर सोडले तर एक घटक असा ठेवला नाही ज्याला फुकट काही मिळणार नाही. वरून जनतेची ओरड आहे की पेट्रोल स्वस्त करा. वस्तू स्वस्त करा. तिकडे शेतकऱ्यांना धान्याला अजून भाव हवा. इकडे जनतेला स्वस्ताई हवी. या योजना हव्यात पण खरोखर ज्याला गरज आहे त्यालाच. या योजनांचे दुष्परिणामही आता दिसत आहेत. काम करायला कुणी तयार नाही, कामावर मजूर मिळत नाही. शेतीच्या कामे निंदणी खुरपणीसाठी आधी स्त्रिया मिळायच्या. आता कदाचित त्याही कमी होतील. ग्रामीण भागात तर ही स्थिती आहे की महिन्याला हजार रुपये जरी कमावले तरी सर्व खर्च निभावतो कारण गोदाम मोफत किंवा कमी किमतीत मिळते. सबसिडीवर सिलेंडर मिळतात. वृद्धांना निराधारचे पैसे मिळतात, घर तर आधीच फुकट आहेत. यामुळे जनता कमालीची निष्क्रिय झाली, व्यसनी झाली. ग्रामीण भागामध्ये आता दारू पुरतेच काम करताना काही लोक दिसतात. या योजनांनी जनतेचे भले व्हायचे असते तर गेल्या पन्नास वर्षातच झाले असते. कित्येक वर्षांपासून दारिद्र्यरेषेखाली असणारे लोक आजही दारिद्र्यरेषेखालीच आहेत. आजही ते तेच आयुष्य जगतात कारण त्यातून बाहेर निघण्याची मानसिकता सरकारने कधी निर्माण होऊच दिली नाही. सर्व काही मोफत किंवा आरामात बसून मिळत असताना उगीच कामाची दगदग करणार कोण.

आता त्यांच्या डोळ्यात स्वप्नही निर्माण होत नाहीत. आधीच व्यसनाधीन असलेला बाप आजूबाजूला वातावरणही व्यसनाचे परिणामी या वर्गातील मुले शाळेत तेवढे लक्ष देत नाहीत आणि तरुण वयात तेही व्यसनाच्या अधिन होत आहेत. याचाही सर्व्हे सरकारने एकदा करायलाच हवा. पण राजकीय लोकांना याची काही देणंघेणं नसावे. तरुण वर्गाला स्वतःकडे आकर्षित करत ते त्यांच्याच रॅलीची महफिल वाढवत आहेत. पण या फुकटखाऊ बरबाद पिढ्यांचे भविष्य काय. इतके दिवस फुकट घेऊनही हे लोक जर तिथेच असतील तर यांच्यावर होणारा खर्च निष्फळ वाया जात नाही का? टॅक्स भरणारा वर्ग रात्रंदिवस मेहनत करून कुटुंबाला चांगले आयुष्य देण्याचे स्वप्न रंगवत सतत कष्ट करत मिळालेला त्यांचा तो पैसा…आणि त्यातून भरला जाणारा टॅक्स हा देश चालवतो, मोफत बसून खाणारी जनता नव्हे.

VIRAJ TRAVELS
Ad image

भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे, याचा अर्थ जगण्यासाठी, चांगल्या सुख सुविधांसाठी येथे बरीच स्पर्धा करावी लागणार आहे. असे असताना एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर फुकट वाटप होत असेल तर ही धोक्याची घंटा नक्कीच असणार आहे. इथे देश महत्त्वाचा की वैयक्तिक राजकीय स्वार्थ हे आता जनतेनेच ओळखणे आवश्यक आहे. हे असेच सुरू राहिले तर जनताच एक दिवस फुकट योजनांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल. टॅक्स पेयर्स यांनी टॅक्स का भरावा, कारण ते कष्ट करून त्यांच्या कुटुंबाला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करत आहेत. त्यांना कुठल्याच मोफतची अपेक्षा नाही. मग त्यांचा कष्टाचा पैसा जर असा फुकट वाटला जात असेल तर त्यांनी टॅक्स का भरावा. कारण पैसा तसाही पाण्यातच जाणार आहे.

अगदी खरे अजून एक म्हणावे वाटते की,भारत हा बेवड्याचा देश आहे. येथील गोरगरीब गरीब का झाले? तर त्याचे एकमेव उत्तर हे की काही कमावले तर ते कमावलेले दारू, जुगार, नशा अशा वाईट गोष्टीत बरेचजण व्यर्थ घालतात. मुलेबाळे, बायकापोरे कित्येकांची रस्त्यावर आली आहेत. याची सरकार नाही काळजी करत. कारण त्याला महसूल हवा आहे. कर्मचाऱ्यांकडून टॅक्स घ्यायचा, दारुच्या व्यवसायातून महसूल जमा करायचा आणि वाटायचे मोफत गरीबांचा खुप पुळका आल्यासारखे.

अरे, हिम्मत असेल तर प्रत्येक हाताला काम द्या. ज्यांचे हातपाय धड आहेत त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे काम द्या आणि खाऊ द्या कष्टाची भाकरी. जो भ्रष्टाचार, अनाचार चाललाय त्याला घाला लगाम. भारत हा ऋषी मुनींच्या देश आहे. भारत हा कष्टकऱ्यांचा देश आहे. भारत हा संतांचा देश आहे. भारत हा विचारवंतांचा देश आहे. भारत हा क्रांतिकारकांचा देश आहे. भारत हा त्यागी लोकांचा देश आहे. भारत हा सुजलाम्, सुफलाम् देश आहे. इथे केवळ ही माता स्वतंत्र व्हावी. ह्या मातेला सन्मान मिळावा म्हणून आपले सर्वस्व पणाला लावलेले श्रेष्ठ महाविभूती आहेत. हा फुकट्यांचा देश खरोखरच नाही.

ज्यांना शिक्षणाची आवड आहे, यांच्यासाठी असावी मदत. पण त्यांनी कमवा व शिका ही संकल्पनाही मनात रुजवायला हवी. जे जास्त कमावतात, असे आपल्याला वाटते ना त्या लोकांना कष्टही तेवढेच घ्यावे लागतात. रात्रीचा दिवस करावा लागतो, प्रसंगी कुटुंबापासून काही काळ त्यांना दूरही जावे लागते. तेव्हा कोठे त्यांना त्यांच्या स्वप्नातले जग गवसते. रात्रंदिवस पिऊन धुमाकूळ घालणारे शूरवीर भारतात खूप वाढलेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या वीरांची ही संख्या कमी नाही.

या सर्वांविषयीचा विचार या देशातील विचारवंतांनी केला पाहिजे. मला वाटते, सरकारला जर गरीबी हाटवायची असेल, खरेच देशाविषयी प्रेम असेल तर त्याने जमिनीवर पाय ठेऊन विकासाच्या संकल्पना राबविल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज द्यावे पण हे एक कर्ज फेडायचीही मानसिकता शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे.

- Advertisement -
Ad image

कित्येकजण गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या करतात व वडिलोपार्जित शेती करतात. का नाही माहिती नाही पण कर्ज काढून सरकार एकदिवस माफ करेल या आशावाद बाळगतात व ती त्यांची आशा पूर्ण ही होते. प्रत्येक शेतकऱ्याला, त्यांच्या कुटूंबाला स्वयंरोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न या देशातील जे उच्चभ्रू नागरिक आहे त्यांनी करावा. हा देश माझा असे वरवर म्हणण्यापेक्षा बेंबीच्या देठापासून माझा आहे असे म्हणा. आणि त्याप्रमाणे वर्तन असू द्या. आजकाल शेजाऱ्यांचं नुकसान होतयं आपल्याला काय करायचे अशी वृत्ती वाढीस लागली आहे.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. तर तशाच प्रकारचे शिक्षण प्रत्येकाला मिळणे जरुर आहे‌. प्रत्येक जण, डॉक्टर इंजिनिअर किंवा मोठा अधिकारीच बनेल असा अट्टाहास न करता त्यांच्या कलेने, त्यांच्या रुचीने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे. आजकाल इंग्रजी शाळेचा धुमाकूळ चालला आहे. शाळा ही शाळा न राहाता, ती पैसे कमविण्यासाठी उभारलेली शाखाच दिसत आहेत. शिक्षक उदासीन शाळा उदासीन. सरकारला जर वाटत असेल की, भारतातल्या सगळ्या लाडक्या बहीणी आहेत. लाडके भाऊ आहेत. तर त्याने दारु, नशिली उत्पादनं लगेचच बंद करावीत कितीतरी आया बहिणी ज्यांची आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. त्या सर्वजण नेत्याला भरभरून आशीर्वाद देतील. त्यांचे पूर्ण आयुष्य सुखासमाधानात आनंदात जाईल. आणि त्यांची खुर्ची प्रत्यक्ष देव आला तरी तोही हिरावून घेऊ शकणार नाही. उलट देव प्रसन्न होऊन त्याची व त्याला प्रिय भारत देशाची प्रगती करण्याची संधी मिळेल.

आज कित्येक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेऊन, त्यांच्या आईची इच्छा असते आपलं मुलं शिकावं पण तिचा नवरा त्या दारु पायी एवढा त्रास देतो, का नाईलाजास्तव तिला घरदार सोडून काहीतरी काम हुडकावे लागते किंवा माहेरचा आश्रय घ्यावा लागतो. जर माहेर बरे असेल तर नाही तर त्यांची दुर्दशाच नि यामुळे मुले सोबत जातात व त्यांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होतो.ही सत्य स्थिती सरकारने विचारात घ्यावी.

कष्टाने मिळवलेली भाकरी, कष्टाने मिळवलेला कपडा, कष्ट करून मुलाबाळांना शिकविण्याचा आनंद सर्वसामान्य लोकांना मिळू द्या. लोकांना आयंदी, आळशी बनवून भारत हा आयतोबाचा देश अशी प्रतिमा या भारताची होऊ नये. हीच अपेक्षा.

जे निराधार आहेत, वृध्द आहेत खरेच त्यांना गरज असेल तर अवश्य सरकारने मदत करावी. वृध्दाश्रम आता तर वाटते काळची गरज आहे. कारण रात्रंदिवस कष्ट करून मुलाबाळांना शिकविण्याचा अथांग प्रयत्न मायबापांने केलेले असतात. मग त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना नोकरी लागते, कामचा व्याप्ती असतो. त्यात दोघेही शिकलेले दोघेही नोकरी करणारे मग या वृध्द लोकांसाठी वेळ कोणाला असतो. म्हणून नाईलाजाने बरेच जण मायबापांना वृध्दाश्रमाचा रस्ता दाखवतात पण हे आश्रम नसून एक आगळं वेगळं सुंदर उपवन आहे. का ज्यात आपण दिलखुलास जगू शकू असे मनात बिंबणारे वृध्दाश्रम हवीत.

असो शेवटी सरकार जे करेल ते चांगले. त्याचा हुकूम म्हणजे देवाचा हुकूम असे मानण्याखेरीज आपण सर्वसामान्य लोक काय करणार?
फक्त एवढेच की,
भारत माझा छान खरोखर भारत माझा छान.
मेरे देश की धरती… सोना उगले उगले हीरेमोती, मेरे देश की धरती.
असे उत्साह वाढविणारा, हे गीत प्रत्येक मनात बिंबणारा देश असावा.
भारत माता की जय !

प्रविण भिसे, दहिगावने, शेवगाव, अहमदनगर

हे ही वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Share This Article
Leave a comment