श्रीरामपूर | प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध सामाजिक कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम मागील सहा वर्षांपासून पुजारी वस्ती येथील शाळेत अध्यापिका व अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड राबवित आहेत. दरवर्षी १२ जुलै रोजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संस्थेच्या माध्यमातून वाटप करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्नातून उत्कृष्ट नियोजन सुरू आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ग्रामपंचायत सदस्य जयश्री पुजारी यांनी केले.
अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन संजय साळवे, मुख्याध्यापिका हर्षदा पुजारी, अध्यापिका वर्षा गायकवाड, सहर्षा साळवे, लंकाबाई पुजारी, सरस्वती महाडिक, रविंद्र पुजारी, गौतम बर्डे, मोहिनी पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अतिशय अभिमानास्पद आहे. यूट्यूबच्या माध्यमातून विविध संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याकरिता अपंग सामाजिक विकास संस्था नेहमीच आपल्या पाठीशी राहील. अशी ग्वाही अपंग सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष संजय साळवे यांनी दिली.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हर्षदा पुजारी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य नक्कीच प्रेरणादायी होईल असे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी अध्यापिका वर्षा गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपासह अल्पोपहार देखील देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहिनी पुजारी, भाग्यश्री वाबळे, ओम ओहोळ, सोहम जोशी, कु. सृष्ठी पगारे यांनी परिश्रम घेतले.