शिक्षणवार्ता |प्रा.डॉ. विलास नाबदे
१९४७ मध्ये अहमदनगर महाविद्यालयाची स्थापना झाली. तो काळ असा होता की, १५० वर्षांच्या संघर्षानंतर देशाला नुकतेच राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले होते. देशापुढे असंख्य समस्या होत्या. त्या सोडविण्याचे मोठे आव्हान तत्कालीन शासनापुढे होते. केंद्र आणि राज्य सरकारे आपापल्या परीने प्रयत्न करीत होते. तत्कालीन मुंबई प्रांत आणि आजच्या महाराष्ट्रात शैक्षणिक आणि सांस्कृतिक मागासलेपण मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले होते. ब्रिटिशकाळामध्ये शिक्षणाच्या संधी अत्यंत कमी घटकाला प्राप्त झाल्या होत्या, परिणामी स्वातंत्र्यानंतर समाजाचा मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित होता.
शिक्षण नसल्यामुळे विवेकवाद समाजात रुजलेला नव्हता. कमालीची गरिबी, दारिद्र्य, अंधश्रद्धा, रोगराई, जातीवाद, अस्पृश्यता, धार्मिक कट्टरता, पुरुषप्रधान पद्धतीचे वर्चस्व इत्यादींमध्ये संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातील समाज मोठ्या प्रमाणावर पीडित होता. सामाजिक प्रश्न पराकोटीचे झाल्यामुळे सांस्कृतिक घटकातील समतोल बिघडत चालला होता. स्वातंत्र्यानंतर सामाजिक घटकाला योग्य दिशा देण्यासाठी आणि सांस्कृतिक घटकातील असमतोल दूर करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक थोर महापुरुष पुढे आले. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, एम. रानडे, गो. आगरकर इत्यादीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना निर्माण करून राष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहात महत्वाची क्रांती घडवून आणली. याच काळात शैक्षणिक प्रवाहात क्रांती घडवून आणण्यासाठी सर्वगुणसंपन्न ज्ञानपुरुष महाराष्ट्राच्या विविध भागातून पुढे आलेले दिसून येतात.
ऐतिहासिकदृष्ट्या वैभवशाली असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात रेव्ह. भास्कर पांडुरंग हिवाळे यांनी ता. २० जून १९४७ रोजी अहमदनगर महाविद्यालयाची स्थापना करून खऱ्या अर्थाने समाजातील वंचित वर्गाला उच्चशिक्षणातील संधीचे दार पहिल्यांदा उघडे केले. अत्यंत कमी विद्यार्थी संख्येत अहमदनगर महाविद्यालय सुरु झाले. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील बहुजन वर्गातील विद्यार्थी आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी एक नवी आकांक्षा घेऊन महाविद्यालयात शिकू लागले. Not thing but men I dare you हे महाविद्यालयाचे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवून अगदी वरील वाक्याप्रमाणे व्यवस्थेच्या सर्वस्तरातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. रेव्ह. हिवाळे सरांच्या सानिध्यात असलेल्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच उच्चशिक्षण घेऊन बाहेर पडली आणि महाविद्यालयाची ज्ञानश्रुंखला वेगाने समाजघटकांमध्ये अधिक गतीने विस्तारण्यास सुरुवात झाली. अहमदनगर महाविद्यालय सुरुवातीच्या काळात तत्कालीन बॉम्बे आजचे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित होते.
या महाविद्यालयाला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात स्थापन केलेली उच्चशिक्षणाची पहिली संस्था होण्याचा मान आहे. १९४७ मध्ये स्थापन झालेले, महाविद्यालय ही एक ख्रिश्चनधर्मीय अल्पसंख्यांक संस्था आहे, ज्यांचा दर्जेदार शिक्षण देण्याचा गौरवास्पद इतिहास आहे. स्थापनेपासूनच महाविद्यालय गुणवत्ता आधारित प्रवेश योग्यतेला प्राधान्य देते. आर्थिकदृष्ट्या दूर्बल असलेल्या बहुजन वर्गातील घटकांना शैक्षणिक संधी प्रदान करण्याचे उद्दिष्ट अहमदनगर महाविद्यालयाने आजपर्यंत कायम ठेवले आहे. महाविद्यालय स्थापनेपासूनच विज्ञान आणि कला महाविद्यालय सुरु झाले. विद्यार्थ्यांना ज्ञान, नाविन्यपूर्ण शिक्षणाबरोबर मूल्यशिक्षण, कौशल्य आधारित शिक्षण सुरु झाले. महाराष्ट्रातील नव्हेच तर भारतातील विविध राज्यातील अनेक विद्यार्थ्यांमधून शिक्षणतज्ञ, डॉक्टर, उच्चाधिकारी, शास्त्रज्ञ, सामाजिक राजकीय व्यक्तीमत्व याच महाविद्यालयातच घडले, ही महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. थोडक्यात महाविद्यालयातील उच्चशिक्षित झालेल्या प्रत्येक पिढीची श्रद्धा, मूल्य, दृष्टीकोन दुसऱ्या पिढीत रूपांतरित झालेली दिसून येतात. या प्रकारचे राजकीय सामाजिकरण व सांस्कृतिक ऐहीकिकरण घडवून आणणारे अहमदनगर महाविद्यालय हे खऱ्या अर्थाने ज्ञानगंगेचे माहेरघर आहे.
अहमदनगर महाविद्यालयातील उच्चशिक्षणामुळे जिल्ह्यातील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला एकप्रकारे हातभार लागलेला आहे. येथील उच्चशिक्षणामुळे सर्वच वर्गातील लोकांमध्ये विकासाच्या जाणिवांचे आत्मभान निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे समाजाच्या प्रगतीच्या शृंखला अधिकाधिक विस्तारात गेल्या म्हणूनच अहमदनगर महाविद्यालय सामाजिक आणि सांस्कृतिक विकासातील एक आधारवड आहे.
आज अहमदनगर महाविद्यालय ही कला, विज्ञान आणि वाणिज्य, संगणक शाखेची बहुविद्याशाखीय ज्ञानशाखा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असल्याने मजबूत आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक पाया निर्माण करत आहे. अहमदनगर शहराच्या मध्यभागी असलेल्या कॉलेजचा ३२.९ एकरचा प्रशस्त निसर्गसंपन्न हिरवागार कॅम्पस आहे. अनेक दौलदार वृक्ष लाखो विद्यार्थी घडविल्याचे जीवंत साक्षीदार आहेत. महाविद्यालय परिसरातील हिरवीगार मोठमोठी वृक्ष महाविद्यालयाचा ७५ वर्षाचा प्रवास अधोरेखित करत आहेत. पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही विषयांशी बांधिलकी ठेवून, अहमदनगर महाविद्यालय आपल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्माण करते. येथील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, त्यांची विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी, प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आणि पालकवर्गाला प्रभावित करते. आज याच ज्ञान घटकातून चित्रपट अभिनेते, शास्त्रज्ञ, लेखक, प्राध्यापक, डॉक्टर, कवी, संगणक तज्ञ, वृत्तपत्र संपादक आणि जबाबदार नागरिक याच महाविद्यालयातून महाराष्ट्राला नव्हे तर भारताला मिळाले.
आज महाविद्यालय बदलत चालले आहे अत्याधुनिक घटक, तंत्रज्ञान वापर, संगणीकीकरण यामुळे नवीन पिढीलासुद्धा महाविद्यालयाशी समरस होण्यात सहभाग मिळत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक इत्यादी कौशल्याबरोबर समाजव्यवस्थेतील सामाजिक मूल्य, येणाऱ्या प्रत्येक पिढीत रुजविण्यात महाविद्यालयाने महत्वाची भूमिका पार पाडलेली दिसून येते. अहमदनगर महाविद्यालयात उन्नत भारत अभियान, राष्ट्रीय सेवा योजना, एन. एस. एस, ग्रीन क्लब, स्नेहबंध इत्यादी उपक्रमातून विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार, नेतृत्व विकास, मानसिक विकास, अभियानाची संधी, व्यवस्थापन इत्यादी करीता एक खुला मंच प्राप्त झाले आहे. अशा सृजनशील उपक्रमातून विद्यार्थ्यांचा युवा दशेतील उन्नतीला सतत वाव मिळत असतो. विवेकवादाला प्राध्यान्य मिळावे आणि लोकशाहीला पोषक समाज निर्मितीच्या हेतूने महाविद्यालयातील गांधी अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांमध्ये मागील १४ वर्षांपासून प्रयत्न करत आहे. युवकवर्गात विद्यार्थी दशेतच सत्य आणि अहिंसा, परोपकार, मानवता, नागरी कर्तव्य, सामाजिक विकास इत्यादी प्रेरक मूल्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यामध्ये बिंबविण्याचा प्रयत्न गांधी अभ्यास केंद्र आजही करत आहे. अहमदनगर महाविद्यालयाच्या प्रवासात ७५ वर्षाच्या अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिकीकरणाला योग्य दिशा देण्याचे कार्य महाविद्यालयाने केले परिणामी समाजातील अप्रचलित घटकाचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. हे आजच्या नव्या पिढीला मान्य करावे लागेल.
अहमदनगर महाविद्यालय स्थापन होऊन ७५ वर्षाच्या प्रवासात फक्त उच्चशिक्षणाद्वारे विद्यार्थी घडवून सभोवतालच्या सामाजिक आणि राजकीय व आर्थिक व्यवस्थेला विकसित करण्याचे अप्रत्यक्ष महान कार्य केले. परिणामी सामाजिकीकरणाची प्रक्रिया अजून गतिशील निर्माण झाली.
– प्रा.डॉ.विलास विठ्ठलराव नाबदे,
(लेखक अहमदनगर महाविद्यालयाच्या गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक आहेत)