अहमदनगर | तुषार सोनवणे
शहरातून पंढरपूरकडे रवाना होणारी शेवटची दिंडी असलेल्या मालेगाव येथील मास्तरबाबा संस्थान दिंडी सोहळ्याचे आज रोजी भुतकरवाडी येथे विष्णू बाजीराव भुतकर आणि परिवाराने जल्लोषात स्वागत केले. दिंडीप्रमुख असलेले ह.भ.प. खान्देशरत्न तुकाराम महाराज जेऊरकर यांचा भुतकरवाडी परिसरातील नागरिकांनी सत्कार केला. यावेळी सर्व भुतकर परिवाराने अन्नदानाबरोबर हरीभक्तीचा आनंद घेतला.
आषाढी एकादशीनिमित्त हजारो वर्षांपासून हरिभक्त दिंडीने पंढरपूरला जात असतात. रस्त्याने अभंग, ओव्या, भारूड, गौळणी गात विठ्ठलनामाचा गजर करत या दिंड्या पंढरपूरकडे जातात. यामधे स्त्री, पुरूष, वृध्द तसेच लहान मुले असतात. सर्वजण हरीभक्तीत तल्लीन होऊन संसारातील दु:खकष्ट विसरून जातात.
अहमदनगर शहरातून शेकडो दिंड्या पंढरपूरला निघाल्या असून लाखो वारकरी १७ तारखेला पांडुरंगाचे दर्शन घेऊन चंद्रभागा स्नान करणार आहेत. येथून जाणारी शेवटची दिंडी म्हणून प्रसिद्ध असलेली मु. खायरे ता. मालेगाव जि. नाशिक येथील मास्तरबाबा संस्थानची दिंडी खान्देशरत्न ह.भ.प. तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या नेतृत्वात पंढरपूरकडे निघाली आहे. हि दिंडी अनेक वर्षांपासून भुतकरवाडी येथे भुतकर परिवाराकडे भोजनासाठी येत असते. या दिंडीचे भूतकरवाडी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
अन्नदानासाठी विष्णू भुतकर, निशांत भुतकर, अशोक भुतकर, अमित भुतकर, अजीत भुतकर, विजय भुतकर, महेश भुतकर आदींसह भुतकर महिला मंडळाने पुढाकार घेतला.