मनपा आयुक्तपदी देवीदास पवार यांची नियुक्ती - Rayat Samachar

मनपा आयुक्तपदी देवीदास पवार यांची नियुक्ती

रयत समाचार वृत्तसेवा

अहमदनगर | प्रतिनिधी

येथील महानगरपालिकेच्या आयुक्तपदी देवीदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचा आदेश नुकताच शासनाचे अवर सचिव अ.का. लक्कस यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी उपायुक्त पदावरून थेट मनपा आयुक्तपदी घेऊन आलेल्या डॉ. पंकज जावळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर अनेक दिवस हे पद खाली होते. मधल्य काळात प्रभारी आयुक्त दिले होते. परंतु आता कायमस्वरूपी देवीदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनियुक्त आयुक्त देवीदास पवार यांनी परळी, लातूर, विरार, यवतमाळ, उल्‍हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथे मुख्‍याधिकारी तसेच परभणी, जळगाव येथे आयुक्‍त पदावर काम केले आहे. त्यांची तब्बल २२ वर्षे प्रशासकीय सेवा झाली असून अमरावती महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्त म्हणून ते कार्यरत होते. डॉक्टर प्रवीण अष्टीकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर पवार यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला  होता. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात येथे सहाय्यक आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. मूळ नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले पवार यांचे शिक्षण परभणी येथे झाले. १९९६ साली त्यांची परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी यवतमाळ, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथील पालिकांमध्ये मुख्याधिकारी (सीईओ) म्हणून कार्य केले.

अहमदनगर महानगरपालिकेत विना रिमोट कंट्रोल काम करण्याचे त्यांचे कसब दिसून येईल की ‘उठ म्हणता उठ आणि बस म्हणता बस’ असा कारभार करावा लागेल, हे येता काळ सांगणार आहे. देवीदास पवार यांना सर्वात आधी नगररचना विभाग ‘हागणदारी मुक्त’ करावा लागणार आहे. याच विभागाने डॉ. पंकज जावळे आणि शेखर देशपांडे यांच्या सर्व्हिसचा बळी घेतलेला आहे.

Share This Article
Leave a comment