अहमदनगर | तुषार सोनवणे
शहरातील बोल्हेगाव गावठाणाशेजारील राजे संभाजी नगरमधील वृध्द, महिला व विद्यार्थ्यांचा अत्यंत महत्वाचा असलेला प्रश्न माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेता कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नांमुळे सुटला असून या ठिकाणी काँक्रीटीकरण कामाला सुरवात झाली. ही वसाहत अनेक वर्षापासून उभी असून मोठ्या प्रमाणात नागरी समस्या होत्या, पथदिवे, सांडपाणी व ड्रेनेज, रस्ता असे अनेक प्रश्न याठिकाणी नागरिकांना भेडसावत होते.
येथील नागरिक महानगरपालिकेचे सर्व टॅक्स इमानेइतबारे भरीत आहेत. तरीही मनपाचे या ठिकाणी दूर्लक्ष होते. येथील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी स्थानिक नगरसेवकांकडे समस्या सोडवण्याची मागणी केली. यावर कुमारसिंह वाकळे यांनी मनपामधे पाठपुरावा केला. त्यामुळे मनपा व जिल्हा प्रशासनाने वेळ देवुन नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरवात झाली. या भागात नव्याने मोठ्या प्रमाणात वसाहत वाढत आहे त्या तुलनेत मनपा नागरी सुविधा देण्यास कमी पडताना दिसते.
माजी नगरसेवक वाकळे यांच्या प्रयत्नातून बोल्हेगाव गावठाण, राजेसंभाजीनगर मुख्य रोड व मॉडर्न कॉलनी अंतर्गत काँक्रीटीकरण काम आता प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी ६” मुख्य व अंतर्गत ४” पाईपलाईन टाकुन पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली. कॉलनी अंतर्गत व मुख्य ड्रेनेज लाईनचे काम पुर्ण केले. येथील म्हसोबा देवस्थानसमोर काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केलेले असून नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी ओपन जिम सुरू केली आहे. अशी विविध प्रकारची विकासकामे नगरसेवक वाकळे यांनी बोल्हेगाव भागातील राजेसंभाजीनगर या ठिकाणी केले आहेत.
पूर्वी या ठिकाणी ‘रोड कमी आणि खड्डे जास्त’ अशी परिस्थिती होती. पावसाळ्यात पायी चालणे कठीण होते. वृद्धांना तसेच शाळेतील लहान मुलांना खूप त्रास सहन करावा लागत होता. सद्यस्थितीतील या मुख्यरोडचे काम पुर्ण झाल्यानंतर म्हसोबा देवस्थान परीसर, गणेश कॉलनी, श्रीराम कॉलनी, मॉडर्न कॉलनी, विघ्नहर्ता कॉलनी या सर्व परीसराची रोडची समस्या सुटणार आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांमधे समाधानाचे वातावरण आहे.
कृपया, प्रतिक्रिया कळवा