अहमदनगर | विजय मते
वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपुर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा असते. यामध्ये भक्तीभाव, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ‘आषाढी वारीला पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान दर्शन विठोबाचे’ या इच्छेपायी वारकरी वारी चुकवत नाही. त्यामुळे पंढरीच्या वारीबद्दल सर्वांच्या मनात आदराचे, श्रद्धेचे स्थान निर्माण झाले आहे. तेव्हा एकदा का होईना वारी करा, असे विमोचन हभप सदाशिव गीते महाराज यांनी केले.
राहाता येथील श्रीक्षेत्र खंडेराव देवस्थान या पायी दिंडीचे सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकातील, रेणुकामाता मंदिरात सांगळे परिवाराच्यावतीने स्वागत करुन 1700 वारकर्यांना दुपारचे भोजन देण्यात आले. या वेळी बाळासाहेब, मधुराबाई, विलास, आश्विनी, विजय, कावेरी, विकास, सुनंदा असा सांगळे परिवार तसेच हभप सदाशिव गीते व भाविक उपस्थित होते.
हभप गीते महाराजांनी वारी शिवाय वारकरी, कुंकुवा शिवाय सुहासिनी अपूर्ण असते. त्यामुळे पांडूरंगाच्या दर्शनाशिवाय वारकरी समाधानी होत नाही. त्यामुळे वारीत सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन पायी प्रवासकरीत पंढरपुरला पोहचतात. सर्वधर्मसमभावाचे दर्शन या वारीमध्ये घडत असते.
श्री.विलास सांगळे म्हणाले, खंडेराव देवस्थानच्या दिंडीला दरवर्षी अन्नदानाचे नियोजन आमचा परिवार करीत असतो. या सेवेत सर्वांचे सहकार्य लाभते. रविवारी या दिंडीला महाप्रसाद देऊन खंडेरायाच्या पालखीचे पूजन, तळी-भंडारा, आरती करण्यात आली.
यावेळी परिसरातील भाविकांनी या दिंडीचे दर्शन घेतले. हभप गीते महाराजांनी सांगळे परिवाराचे आभार मानले.