गाणगापूरचा महेबुब - विनायक देशमुख - Rayat Samachar

गाणगापूरचा महेबुब – विनायक देशमुख

5 Min Read

धर्मवार्ता

एक अनुभव गाणगापूरचा

श्री दत्त महाराजांच्या कृपेने गाणगापूर क्षेत्री जाण्याचा योग आला. प्रथम भीमा-अमरजा संगमावर जाऊन औदुंबर वृक्षाचे व श्रीदत्त महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर श्री दंडवते आश्रमात जाऊन मुक्कामाची व्यवस्था केली. गाणगापूर येथील निर्गुण पादुका मठात दररोज रात्री आठ वाजता महाराजांची पालखी निघते. ज्या ज्या वेळी गाणगापूरला जातो, त्यावेळी आवर्जून पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात मी सहभागी होत असतो.

गाणगापूरला गेल्यानंतर प्रत्येक भेटीत सामांन्यातील असामान्य दत्तभक्तांशी कोणत्या न कोणत्या रुपात भेट होते, असा माझा अनुभव आहे. कालही असाच काहीसा अनुभव आला.

रात्री बरोबर ७.३० वा. पालखी दर्शनासाठी मंदीरात गेलो. सोमवार असुनही मठात मोठी गर्दी होती. पालखी प्रदक्षिणा ८ वा. सुरु होणार होती. तोपर्यंत मी तेथील वातावरणात समरस होऊन पावित्र्याचा आणि उपस्थित दत्तभक्तांच्या अपार श्रध्देचा अनुभव घेत होतो. प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांतील भाविकांची संख्या मोठी होती. कुणी दत्त महाराजांचा जयघोष करत होते. तर कुणी आपापसातील गप्पांमध्ये दंग होते. काही जण धार्मिक पुस्तकांची तर काही जण पालखीसाठी हार आणि फुलांची विक्री करत होते.

निर्गुण मठात दत्त महाराजांच्या जयघोषात आणि वाद्यवृदांच्या उपस्थितीत पालखीच्या तीन प्रदक्षिणा होतात. पहिली प्रदक्षिणा झाली आणि आपल्याकडील उरलेल्या हार फुलांची जास्तीत जास्त विक्री व्हावी, यासाठी फुलवाल्यांची लगबग वाढली. अशातच दोन प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि सर्व भक्तमंडळी आता तिसऱ्या प्रदक्षिणेची वाट पाहू लागली.

माझे लक्ष मात्र एका युवकाने आकर्षित केले होते. त्यांच्या हातात दहा वीस किलो गुलाबाची फुले बसतील अशी मोठी कॅरी बॅग होती. त्यात सुंदर अशी गुलाबाची फुले आणि गुलाबाच्या पाकळ्या होत्या. दोन प्रदक्षिणा झाल्या मात्र त्याची फुलं फारशी विकली गेली नव्हती.

तेवढ्यात तिसऱ्या प्रदक्षिणेची चाहूल लागली. पालखी येण्यापूर्वीच हा तरुण त्याच्या पिशवीतील गुलाबाची फुले मोफत वाटत होता. काही क्षणापूर्वी दहा रुपयांना फुलांचा गुच्छ विकणारा हा तरुण आता मोफत फुले वाटत होता. पालखी येण्यापूर्वीच आपल्या हातातील सर्व फुले दत्तभक्तांना वाटुन तो तरुण गर्दीतुन कधी नाहीसा झाला, हे समजलेच नाही. माझे मात्र आता पालखीकडे लक्ष नव्हते. त्या तरुणाचे मला विलक्षण कौतुक वाटले. त्याची भेट घेण्याची मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली. तिसरी प्रदक्षिणा संपली आणि मी त्या तरुणाला शोधू लागलो. मंदिर परिसरात प्रत्येक फुलाच्या दुकानात त्याला शोधले. पण त्याची भेट झाली नाही. त्यांच्या न झालेल्या भेटीची खंत मनात ठेवून आश्रमात आलो आणि त्याचा विचार करत झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रीदत्त महाराजांच्या अभिषेकासाठी आणि मठातील पादुकांच्या दर्शनासाठी जायचे होते. त्यामुळे लवकरच मंदिरात पोहोचलो. प्रथम श्रीदत्त महाराजांचा अभिषेक केला आणि निर्गुण पादुकांच्या मठात दर्शन घेतले. दर्शन घेताना महाराजांसमोर एक इच्छा व्यक्त केली की, कालच्या त्या तरुणाची आज माझी भेट होऊ दे आणि दर्शन घेऊन बाहेर आलो. पादुकासमोर नतमस्तक होऊन मी प्रदक्षिणेस सुरुवात केली. चार पावले पुढे जातो तर समोरून कालचा तो युवक पुन्हा ताज्या फुलांच्या कॅरीबॅगसह गजरे आणि फुलांची विक्री करताना मला दिसला. मला अतिशय आनंद झाला.

मी त्याला बाजूला घेतले आणि विचारले की “काल तिसऱ्या प्रदक्षिणेच्या आधी सर्वांना मोफत गुलाबाची फुले तूच वाटलीस ना ?”

तर तो म्हणाला “हो”

मग मी त्याला विचारले की “तु ती फुले अशी मोफत का वाटलीस ?”
तो म्हणाला, “ही माझी नेहमीची पद्धत आहे. दिवसभर मी फुलांची विक्री करतो आणि त्यातून जे काही पैसे मिळतील त्यातून माझ्या कुटुंबाचा चरितार्थ भागवतो. मात्र दुसऱ्या प्रदक्षिणेनंतर जेवढी फुले शिल्लक असतील ती मी सर्व दत्तभक्तांना मोफत वाटतो. हिच माझी ‘दत्तसेवा’ असे मी समजतो. महाराजांची सेवा करताना नफ्या तोट्याचा विचार न करता पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला लागतो. मात्र महाराज माझे कधीच नुकसान होऊ देत नाहीत. आजचे नुकसान ते उद्या भरुन काढतात.”

सामान्य आणि गरीब फुल विक्रेत्याचे हे विचार आणि श्रीदत्तात्रेयांवरील त्याची श्रद्धा पाहून मी चकीत झालो.
मग मी त्याला विचारले,
“दररोज तुला किती पैसे मिळतात.?”
तो म्हणाला,”चार-पाचशे रुपये मिळतात. महिन्याला बारा-पंधरा हजार रुपये कमवतो आणि त्यात माझा उदरनिर्वाह चालवतो.”

सकाळच्या एवढ्या गर्दीत मी त्याला खाली वाकून नमस्कार केला आणि माझ्याकडून त्याला अल्पशी आर्थिक भेट दिली. त्याला देखील या सगळ्या घटनेचे आश्चर्य वाटले आणि साश्रूपूर्ण नयनांनी त्याने मला नमस्कार केला.

आता आश्चर्याचा खरा धक्का तर पुढे होता. मी त्याला विचारले, “तुझे नाव काय ?”
त्याने सांगितले ” महेबुब. मी धर्माने मुस्लिम आहे. मात्र मी श्री दत्तगुरूंचा सेवक आहे. महाराज मला काहीच कमी पडू देत नाहीत आणि माझी सर्व संकटे दूर करतात.”

गाणगापुरात पुन्हा एकदा मी अनुभवले,       जैसी ज्याची भक्ती, तैसी मिळे प्रचिती !!

– विनायक देशमुख, अहमदनगर

Share This Article
Leave a comment