राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे कार्य प्रेरणादायी – डॉ. सुरेश पठारे; सामाजिक न्याय विषयावर परिसंवाद संपन्न - Rayat Samachar

राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे कार्य प्रेरणादायी – डॉ. सुरेश पठारे; सामाजिक न्याय विषयावर परिसंवाद संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
एक्स्प्रेस फोटो, अहमदनगर

प्रतिनिधी | पंकज गुंदेचा |२६.६.२०२४

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक न्याय क्षेत्रातील कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण, जातिभेद निर्मूलन या सामाजिक न्यायाच्या विचारांची मुहूर्तमेढ देशात राजर्षी शाहू महाराज यांनी रोवली. त्यांच्या विचार आणि कार्याचे आपण अनुकरण करून दुर्बल घटकातील समाजबांधवाना विकासाच्या मुख्य प्रक्रियेत आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे मत सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी व्यक्त केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिनानिमित्ताने सीएसआरडीमध्ये आयोजित ‘सामाजिक न्याय’ विषयावरील एक दिवसीय परिसंवादात ते बोलत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात पठारे म्हणाले, सामाजिक समतेचे पहिले पाऊल राजर्षी शाहू महाराज यांनी उचलले. अनिष्ट प्रथा, रुढी, परंपरांविरुद्ध महाराजांनी आवाज उठविला. सामाजिक आरक्षणाची देशात खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ शाहू महाराजांनी घातली. राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक, शेती, पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रांत समाजातील गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे कार्य केले. समाजसुधारणेच्या चळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरुषांची नावे महाराष्ट्राच्या समाजसुधारणा चळवळीमध्ये नेहमी अग्रक्रमाने घेतली जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या जनतेप्रती जे विचार होते, त्याच विचारांप्रमाणे शाहू महाराजांचे कार्य होते, असे ते म्हणाले.
तसेच २६ जून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्यामुळे यावेळी डॉ.सुरेश मुगुटमल यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम सांगत सर्वांना व्यसनमुक्तीची सामुहिक शपथ दिली. अंमली पदार्थ आणि पदार्थांच्या प्रतिबंधासाठी, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने ता. ७ डिसेंबर १९८७ रोजी हा ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो. आपणही सातत्याने व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली पाहिजे, असे सांगितले.

सीएसआरडी महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ. सुरेश पठारे यांच्या अध्यक्षेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास‌ डॉ.सुरेश मुगुटमल, डॉ. जेमोन वर्गीस, डॉ. विजय संसारे, डॉ. प्रदीप जारे, सॅम्युअल वाघमारे, विकास कांबळे, शरद गुंडरस, गिरीश शिरसाठ, किरण गीते, नाजीम बागवान, अमित सिंग यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी तर आभार डॉ. विजय संसारे यांनी मानले.

Share This Article
Leave a comment