आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी - Rayat Samachar

आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी

रयत समाचार वृत्तसेवा

अहमदनगर | तुषार सोनवणे |२६.६.२०२४

येथील चौथे शिवाजी महाराज स्मारकात सकल भारतीय समाज, मराठा सेवा संघ, स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना, उर्जिता सोशल फौंडेशन, इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते चौथे शिवाजी महाराज समाधी आणि राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरवात करण्यात झाली. यावेळी आलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शाहूंच्या आठवणी सांगितल्या.

कार्यक्रमाची सुरूवात डॉ. सुरेश वरकड यांच्या क्रांतिगीताने झाली तसेच त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रास्ताविकात स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी आपण आपल्या ऐतिहासिक ठेव्याची मार्केटिंग केली पाहिजे जेणेकरून तरूणाईचा सहभाग वाढत जाऊन चळवळ मजबूत होईल, असा आशावाद व्यक्त केला.

यावेळी डॉ. सुधाकर शेलार यांनी सांगितले की सध्या देशात नवीन शैक्षणिक धोरण राबवले जात आहे परंतु ज्यांनी हे धोरण ठरवले आहे ते आणि ज्यांना याची अंमलबजावणी करावयाची आहे यांच्यात सुसुत्रता नाही. शैक्षणिक क्षेत्रात उदासीनता दिसत आहे. नेत्यांनी शाहू महाराजांचे अनुकरण करत जनतेत जाऊन परिस्थिती समजून घेत सुधारणा केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

फिरोज शेख यांनी मुस्लिम समाजासाठी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची उजळणी केली. त्यांनी सांगितले की, महाराजांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे मुस्लीम समाजातील मुलेही शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागली तसेच राजर्षी शाहूंनी कुराणाचे मराठीत भाषांतर करून जनतेस देण्यासाठी त्याकाळी २५ हजार रूपये देणगी दिली होती.

देशात पहिल्यांदा आरक्षणाची तरतूद व अंमलबजावणी करणाऱ्या शाहू महाराजांना आरक्षणाचे लाभधारक व आरक्षण मिळवू पहाणारे विसरून गेले आहेत. सध्याच्या काळात तरूणांमध्ये शाहू महाराजांचे विचार रुजवणे अत्यंत गरजेचे आहे, असे परखड मत बहिरनाथ वाकळे यांनी व्यक्त केले.

VIRAJ TRAVELS
Ad image

राज्य चालवताना अनेक आघाड्यांवर लढावे लागते. सर्व राज्यकर्त्यांनी ते परिस्थितीनुसार केलेही आहे परंतु राज्यातील कमकुवत घटकांना मजबूत करण्यासाठी प्रथम कृती करणारे शाहू महाराज हे एकमेव होते. शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे भारतभरात सामाजिक, राजकीय आणि आर्थिकक्षेत्रात आमुलाग्र बदल झाले, असे मत कार्यक्रम अध्यक्ष डॉ. पंकज जावळे यांनी मांडले.

कार्यक्रमासाठी महानगरपालिका उपायुक्त विजय मुंढे, श्रीकांत पवार, नगरसचिव मेहेर लहारे, उद्योजक अमोल गाडे, सुभाष कडलग, भाऊसाहेब थोटे, इंजी. अभिजित एकनाथ वाघ, आसिफखान दुलेखान, स्मारक समितीचे खजिनदार शुभम पांडूळे, प्रा. नंदा पांडूळे, संध्या मेढे, शिल्पकार विकास कांबळे, दिगंबर भोसले,  रवी केरू सातपुते, इंजी. क्षिरसागर, धिरज कुमटकर, भाऊसाहेब थोटे, राजेंद्र कर्डीले, ॲड. विद्या जाधव, शुभम शिंदे यांसह सकल भारतीय समाज, मराठा सेवा संघ आणि उर्जिता फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment