राजर्षी : वारसा नेमका कशाचा असतो हे लख्खपणे समजलेला राजा - आनंद शितोळे - Rayat Samachar

राजर्षी : वारसा नेमका कशाचा असतो हे लख्खपणे समजलेला राजा – आनंद शितोळे

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
चित्र सौजन्य - इंद्रजित सावंत, कोल्हापूर

स्मृतिवार्ता | आनंद शितोळे |२६.६.२०२४

राजर्षी !!

जारो राजे झाले, मात्र माणसातला राजा, राजातला माणूस हाच आणि असा सन्मान लाभणारा हाच राजा.

वारसा नेमका कशाचा असतो हे लख्खपणे समजलेला राजा.

आजच ह्या राजाला का आठवायच ?

जेव्हा महाराष्ट्रातल्या आदिवासी, डोंगराळ, दुर्गम, ग्रामीण भागातल्या शाळा ‘ परवडत नाहीत ‘ म्हणून नादान राज्यकर्ते बंद करायला निघतात तेव्हा तब्बल शंभर वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा मंजूर करून अंमलात आणणारा हा राजा आठवायचा.

जेव्हा शिक्षण व्यवस्था भांडवली हातात देऊन बटिक करायला राज्यकर्ते आतुर झालेले आहेत तेव्हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात बहुजनांच्या शिक्षणासाठी बोर्डिंग, शाळा उघडायला सढळ हस्ते मदत करणारा राजा आठवायचा.

संपूर्ण मुंबई इलाख्याचे शिक्षणाचे बजेट होते त्यापेक्षा जास्त तरतूद आपल्या राज्यात करून ते पैसे शिक्षणावर खर्च करणारा खरा शिक्षणमहर्षी !!

जेव्हा दलित समाजातल्या माणसाला घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणून मारहाण केली जाते तेव्हा शंभर वर्षापूर्वी दलित माणसाला आपल्या गावात हॉटेल काढून देऊन तिथे चहा प्यायला जाणारा राजा आठवायचा.

जेव्हा ऑनर किलिंग सारखा हिडीस प्रकार बोकाळलेला असताना, पोटच्या लेकरांचे जीव घेणारे हैवान असताना शंभर वर्षापूर्वी आपल्याच घरात मराठा धनगर विवाहाला पुढाकार घेणारा राजा आठवायचा.

मुलींच लग्नाचं वय कायद्याने वाढवून, सज्ञान मुलांना स्वतःच्या लग्नाचा हक्क कायद्याने देणारा तोही १०० वर्षांपूर्वी, दूरदृष्टी असलेला राजा.

जेव्हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फीचे पैसे सरकारने दिले नाहीत म्हणून पदवी प्रमाणपत्र मिळायला अडवल जात तेव्हा डॉक्टर आंबेडकरांच्या मागे उभा राहणारा राजा आठवायचा.

जेव्हा महाराष्ट्रात लेकीबाळी हंडाभर पाण्यासाठी पाच पाच किलोमीटर पायपीट करतात तेव्हा दूरदृष्टी दाखवून धरण बांधून सिंचनाची सोय करणारा राजा आठवायचा.

जेव्हा लोकशाही मार्गाने लोककल्याणकारी राज्यव्यवस्था राबवणे अपेक्षित असलेल सरकार भांडवलदारांच्या तुंबड्या भरण्यात दंग होत तेव्हा मर्यादित अधिकार आणि संसाधन असताना लोककल्याण साधणारा राजा आठवायचा.

पिढीजात वारसा, संपत्ती काहीही पाठबळ नसताना केवळ ज्ञानाच्या जोरावर संपत्ती आणि अधिकार मिळवता येतो हे सांगणारा राजा आठवायचा.

ज्या संस्थेत अहमदनगर जिल्ह्यातली लाखो मुल शिकलीत आणि आजही ती संस्था शंभर वर्षाची झाल्यावर लाखो मुल दरवर्षी शिकतात , त्या संस्थेत शिकण्याच भाग्य मला लाभल , त्या संस्थेची पायाभरणी करणारा राजर्षी !!

रयतेचा राजा छत्रपती !!
राजर्षी शाहू महाराज !!
त्रिवार मुजरा !!

– आनंद शितोळे, अहमदनगर, महाराष्ट्र

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *