मुंबई | गुरुदत्त वाकदेकर |२५.६.२०२४
भारताने सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीचा मार्ग आता कठीण झाला आहे. आता त्यांना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. डार्नी सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माच्या ९२ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर २० षटकात ५ बाद २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ७ गडी गमावून १८१ धावा केल्या आणि भारताने हा सामना २४ धावांनी जिंकला.
यासह भारताने गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला. त्यावेळी अंतिम फेरीत भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने भारताचे विजेतेपदाचे स्वप्न उध्वस्त केले होते आणि आता ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारताने त्यांचा पुढचा मार्ग खडतर केला आहे. भारताने सुपर-८ मधील तिन्ही सामने जिंकले आणि ६ गुणांसह गट-१ मध्ये अव्वल स्थान पटकावले. तीन सामन्यांत दोन पराभव आणि एक विजयासह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचे दोन सामन्यांतून एक विजय आणि एक पराभवासह दोन गुण आहेत आणि ते तिसऱ्या स्थानावर आहे. मंगळवारी सकाळी अफगाणिस्तानला बांगलादेशचा सामना करायचा आहे आणि तो सामना जिंकण्यात संघ यशस्वी ठरला तर उपांत्य फेरीत प्रवेश करेल आणि ऑस्ट्रेलियाचा प्रवास इथेच संपेल.
२०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाला ६ धावांवर पहिला धक्का बसला. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला कुलदीपकरवी झेलबाद केले. यानंतर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सूत्र आपल्या हाती घेतली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी झाली. नवव्या षटकात कुलदीपने कॅप्टन मार्शला अक्षर पटेलकरवी झेलबाद केले. तो २८ चेंडूत ३७ धावा करून परतला. यानंतर ग्लेन मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, तो जास्त काळ विकेटवर टिकला नाही. त्याला कुलदीपने त्रिफळाचीत केले. याने २० धावा केल्या. या सामन्यात मार्कस स्टॉइनिसला केवळ २ धावा करता आल्या.
तर ट्रॅव्हिस हेडने ७३ धावा केल्या. त्याने भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले आणि ४३ चेंडूत ७६ धावा केल्या. सलामीच्या फलंदाजाने २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सध्याच्या स्पर्धेतील हे त्याचे दुसरे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने स्कॉटलंडविरुद्ध ६८ धावांची स्फोटक खेळी केली होती. १७व्या षटकात हेडला बुमराहने रोहित शर्माकरवी झेलबाद केले. त्याने १७६.७४ च्या धावगतीने ९ चौकार आणि ४ षटकार मारले. या सामन्यात टीम डेव्हिडने १५ धावा, मॅथ्यू वेडने एक१ धाव, पॅट कमिन्सने ११ धावा आणि मिचेल स्टार्कने ४ धावा केल्या. कमिन्स आणि स्टार्क नाबाद राहिले. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन बळी घेतले. तर कुलदीप यादवने दोन गडी बाद केले. याशिवाय बुमराह आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
या सामन्यात भारताने दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या विश्वचषकात भारताने २०० धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. टी२० विश्वचषकात भारताची ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २००७ मध्ये टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध २० षटकात ४ विकेट गमावत २१८ धावा केल्या होत्या. त्याचवेळी, चालू स्पर्धेत भारताने बांगलादेशविरुद्ध २० षटकात ५ विकेट गमावत १९६ धावा केल्या होत्या आणि हा सामना जिंकला होता. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी एकूण १५ षटकार ठोकले. सध्याच्या स्पर्धेत भारताने या सामन्यात सर्वाधिक षटकार मारले आहेत. याआधी भारतीय फलंदाजांनी बांगलादेशविरुद्ध १३ षटकार ठोकले होते.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जोश हेझलवूडने विराट कोहलीला खाते न उघडताच बाद करून कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. मात्र, रोहित आज वेगळ्याच रंगात दिसला आणि त्याने तुफानी फलंदाजी करत कांगारू संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या काळात रोहितने अवघ्या १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
रोहितने स्टार्कच्या षटकात २९ धावा केल्या आणि जोरदार फलंदाजी सुरू ठेवली. रोहित शतकाकडे वाटचाल करत होता, पण स्टार्कने त्याला बाद केले. रोहितने ४१ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार आणि ८ षटकार मारले. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० षटकार मारणारा रोहित पहिला फलंदाज ठरला आहे. रोहित बाद झाल्यानंतर भारताचा डाव थोडा मंदावला असला तरी ऋषभ पंत (१५), सूर्यकुमार यादव (३१), शिवम दुबे (२८) आणि हार्दिक पंड्या (२७ नाबाद) यांनी काही चांगले फटके खेळले आणि संघाची धावसंख्या २०० च्या पुढे नेली. त्याचवेळी विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि स्पर्धेत दुसऱ्यांदा खातेही न उघडता बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क आणि स्टॉइनिसने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी जोश हेझलवूडला यश मिळाले.
रोहित शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.