Religion: बिरसैत धर्म संस्थापक : आदिवासी योद्धा भगवान बिरसा मुंडा - स्त्रिग्धरा नाईक - Rayat Samachar

Religion: बिरसैत धर्म संस्थापक : आदिवासी योद्धा भगवान बिरसा मुंडा – स्त्रिग्धरा नाईक

रयत समाचार वृत्तसेवा
63 / 100

धर्मवार्ता | १५ नोव्हेंबर | स्त्रिग्धरा नाईक

Religion भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ साली झारखंडातील रांची जिल्ह्यामधील ‘उलीहातू’ या गावात झाला. त्यांचा जन्म बिस्युतवारी म्हणजे गुरुवारी झालेला असल्याकारणाने त्यांचे नामकरण ‘बिरसाʼ असे करण्यात आले. त्यांचे वडील गुराखी होते, गुरे चारण्याचे काम करत.

मुंडा या आदिवासी जमातीत जन्मलेले बिरसा लहानपणापासूनच धर्नुविद्या व नेमबाजीत तरबेज. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात गेले. त्यांना वाचनाची/शिक्षणाची प्रचंड आवड. त्याकाळी शाळेमध्ये दाखला मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्विकारावा लागत. शाळेच्या व्यवस्थापनाच्या अटीनुसार शाळेमध्ये दाखला मिळवण्यासाठी बिरसा यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला. बिरसांच्या वडीलांनी त्यांचे धर्मांतरण करून त्यांना शिक्षणासाठी जर्मन मिशनरी स्कुलमध्ये पाठवले. एके दिवशी काही कार्यक्रमानिमित्त शाळेमध्ये जर्मन लुथेरियन मिशनचे अध्यक्ष फादर नोट्रोट आले. आपल्या भाषणात मुंडा आदिवासींबद्धल बोलताना हा समाज ठग, चोर, बेइमान असल्याचा उल्लेख केला. आदिवासी समाजाबद्धल वापरलेले अपशब्द ऐकून बिरसांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. बिरसांनी फादर नोट्रोट यांना कडक शब्दांनी खडसावत प्रत्युत्तर दिले. या कारणामुळे जर्मन मिशनरी स्कुलने बिरसांना शाळेतून काढून टाकले. पुढे जाऊन बिरसांनी शिक्षणासाठी अंगीकारलेल्या ख्रिश्चन धर्माचा त्याग केला व ते प्रसिध्द वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्याकडून शिक्षण घेऊ लागले.

ब्रिटिश व्यवस्थेतील जमीनदार, जहागीरदार व सावकारांनी आदिवासींचे चालविलेले नाहक शोषण व ब्रिटिश सरकारने आदिवासी समाजाविरुद्ध लावलेला अन्यायाचा तगादा त्यांना कधीच मान्य नव्हता. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले. ब्रिटिश व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी बिरसा मुंडा यांनी आदिवासींचे प्रबोधन करण्यास सुरवात केली. १८९४ साली बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या जमिन व इतर हक्कांसाठी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. सरंजामशाही व्यवस्थेला विरोध करत मुंडा व त्यांच्या अनुयायांनी अनेक ठिकाणी ब्रिटीशांवर हल्ले घडवून आणले. अल्पावधीतच बिरसा मुंडा लोकांचे नेते बनले. लोक आता त्यांना ‘धरती आबा’ (आदिवासी भाषेतील ‘धरती आबा’ अर्थात हिंदीत ‘भगवान’) या नावाने ओळखू लागले.

VIRAJ TRAVELS
Ad image

दरम्यान लोकांना बिडी, दारू, खैनी सेवन करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व नवीन पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी ‘बिरसैत’ नामक नवीन धर्माची स्थापना केली. बिरसैत धर्म अर्थात निसर्गाची पूजा करणारा धर्म. बिरसैत धर्मामध्ये मांस-मच्छी व मादक पदार्थाचे सेवन करणे वर्ज्य असते.

‘राणीचे राज्य संपवा, आमचे साम्राज्य स्थापित करा’ असा नारा देत बिरसांनी आदिवासी समुदायाला आपल्या सांस्कृतिक वारसा व अधिकारांविषयी शिक्षण देऊन प्रेरित करण्यास सुरवात केली. आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी बंडखोरी करत बिरसा व त्यांच्या अनूयायांनी ब्रिटिशांकडे आदिवासी लोकांना ‘वन कर सवलत’ देण्याची मागणी केली. इंग्रजांनी ती मागणी नाकारली. मागणी नाकारताच बंडाचे बिगुल वाजले.

मुंडा बंड! १८९९-१९०० या काळात रांचीच्या दक्षिणेकडील प्रदेशात बिरसांच्या नेतृत्वाखालील आदिवासी समाजाने मोठे बंड पुकारले. बिरसा राज्याचे प्रतीक म्हणून मुंडांनी पांढरा ध्वज उभारला. बिरसा मुंडा यांनी आपल्या लोकांना सरकार दरबारी कोणताही कर न भरण्याचे आदेश दिले. ब्रिटिशांविरुद्ध आदिवासी चळवळ सुरू करत बिरसांनी “अबूया राज एते जाना/ महारानी राज टुडू जाना” (महाराणीचं राज्य संपलं, मुंडा राज सुरू झालं) अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. १८९९ मध्ये या संघर्षाची व्याप्ती आणखीन वाढली. १९०० साल उजाडेपर्यंत बिरसांचे बंड छोटा नागपूरात वणव्यासारखे पसरले. बंडखोरी करत बिरसा आणि त्यांच्या अनुयायांनी जमीनदारांची घरे आगीत पेटवून दिली. बंड इतके फोफावले की इंग्रजांना सैन्याला पाचारण करावे लागले. डोंबारी टेकडीवर आदिवासी आणि सैन्यात युद्ध झाले. असे म्हणतात की, या हल्ल्यात शेकडो आदिवासी मारले गेले. या हल्ल्यादरम्यान बिरसांनी मात्र तिथून यशस्वीपणे सुटका केली.

साल १९०० मध्ये इंग्रजांनी झारखंडातील चक्रधरपूर जंगलातून बिरसांना अटक केली. बिरसा मुंडा यांनी अगदी लहान वयातच इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. त्यांचा मृत्यू ९ जून १९०० साली रांची तुरुंगात अवघ्या २५ व्या वर्षी झाला.

अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू कॉलरामुळे झाला असल्याचा दावा केला. त्यांच्या मृत्यूनंतर चळवळ ओसरली. तब्बल आठ वर्षांनंतर म्हणजेच १९०८ मध्ये, वसाहती सरकारने छोटानागपूर भाडेकरू कायदा आणला. या कायद्यानूसार आदिवासी जमीन बिगर आदिवासी लोकांना हस्तांतरित करण्यास बंदी घालण्यात आली.

- Advertisement -
Ad image

आज संपुर्ण भारत बिरसा मुंडांची १२४ वी जयंती साजरी करत आहे. अगदी लहान वयात आदिवासी समाजाच्या हितार्थ निर्भीडपणे इंग्रजांशी दोन हात करुन आदिवासी समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या सेनानी भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम.

हे ही वाचा : मराठी विश्वकोश येथे वाचा

 

Share This Article
Leave a comment