पुणे | प्रतिनिधी | २४.६.२०२४
‘महाराष्ट्रात काही अर्बन नक्सल NGO यांनी ‘इंडिया’ आघाडीला छुपा पाठिंबा दिला आहे’ हे विधान अनधिकृत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. निर्भय बनो लोकचळवळीचे ॲड. बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी थेट एकनाथ शिंदेंना कायदेशीर नोटीस पाठवून जर; शिंदेंना महाराष्ट्रातील अनेक अर्बन नक्सल NGO माहिती आहेत तर; त्यांनी त्वरित अर्बन नक्सल असलेल्या सगळ्या NGO यांची माहिती पोलिसांना द्यावी. तसेच, अशा अर्बन नक्सल सामाजिक संस्थांची यादी जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
ॲड. बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी ॲड.असिम सरोदे, ॲड.रमेश तारु व ॲड.संदीप लोखंडे यांच्यामार्फत पाठविलेल्या कायदेशीर नोटीशीमध्ये असेही म्हटले आहे की, मुख्यमंत्री पदावरील एखाद्या व्यक्तीने सतत राजकीय वागणे व सतत राजकीयच वक्तव्य करणे अयोग्य आहे. हे कुणी नागरिकाने आपल्याला सांगावे याची गरज पडू नये.
नोटीसीत म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या पावसाचे पाणी तुंबल्याने लोकांचे जीवन धोकादायक होणे, शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाल्याने ते आर्थिक संकटात असणे, राज्यात पेट्रोल व डिझेल इंधनाचे भाव शेजारच्या काही राज्यांपेक्षा वाढीव असणे, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, राज्यातील बेरोजगारीची समस्या, स्त्रिया व मुलींच्या भरदिवसा होणाऱ्या हत्या, गरीब व अक्षम लोकांना अपघातात चिरडले जाणे, खतांच्या वाढलेल्या किंमती व बोगस बि-बियाण्यांचे प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे, पर्यावरणाचे अनेक रखडलेले दुर्लक्षित विषय अशा अनेक समस्यांनी महाराष्ट्रातील जनतेला घेरलेले असताना तुम्ही अशा प्रश्नांवर गांभीर्याने आणि समस्यांवर उपाय काढण्याच्या दृष्टीने कधीच बोलताना दिसत नाही, हे महाराष्ट्रातील लोकांना अतिशय गंभीर वेदना देणारे असेच आहे.’
बेकायदेशीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने बेताल वक्तव्य करणे आणि, राजकीय स्वरूपाचे आरोप करत राहणे यांतून मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा घालविण्याचाच उपक्रम करीत आहेत असेही नमूद करण्यात आलेले आहे.
दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या व सध्या आपण अपहरण केलेल्या ‘शिवसेना’ नामक राजकीय पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन होता तेव्हा वरळी (मुंबई) येथील भव्य डोममध्ये तसेच; भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत सुद्धा आपण असेच अर्बन नक्सल सामाजिक संस्था महाराष्ट्रात असल्याचे व त्या काही अर्बन नक्सल NGO यांनी INDIA आघाडीला छुपा पाठिंबा दिला असल्याचे अतिशय बेजबाबदार वक्तव्य केलेले आहे.
ॲड. निढाळकर यांनी नोटीशीमधून कळवले आहे की, ‘ते ‘निर्भय बनो’ या लोकशाही रक्षणासाठी काम करणाऱ्या लोकचळवळीचे सक्रिय सदस्य आहेत व निर्भय बनो ही NGO नाही. आम्ही महात्मा गांधी यांचे अहिंसक तसेच, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानिक विचार मानणारे व भारतावर प्रेम करणारे नागरिक एकत्र आलेलो आहोत. आम्हाला हिंसा मान्यच नाही. आम्हाला हिंसक क्रांती मान्य नाही. आम्हाला कोणत्याही धर्माच्या नावाने होणारी हिंसा मान्य नाही. आम्हाला जातीविषयी होणारी हिंसा मान्य नाही. जसा नक्षलवाद आम्हाला मान्य नाही तशीच धर्मांधता सुद्धा आम्हाला मान्य नाही. धर्मांधता हा जसा आतंकवाद आहे तसाच धार्मिक आतंकवाद किंवा नक्षलवाद आम्हाला मान्य नाही.’ मुख्यमंत्रीपदावर असूनही एकनाथ शिंदे बेताल व बेकायदेशीर वक्तव्ये करतात.
‘निर्भय बनो’ या लोकचळवळीने लोकशाहीवर प्रेम करणारी एक नागरिक शक्ती निर्माण केली आणि, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी तसेच; भारताच्या पातळीवर INDIA आघाडी यांच्यासाठी लोकसहभागातून मोठा राजकीय पाठिंबा तयार केला.
आपल्या विरोधातील मत मांडणारे सगळेच देशद्रोही आहेत असा भ्रम पसरवणाऱ्या धर्मांध व जातीवादी भाजप नावाच्या पक्षासोबत असण्याचा परिणाम आपल्या बेताल वक्तव्यातून स्पष्टपणे दिसतो असे निढाळकर यांनी नोटीसीत म्हटले आहे.
नोटीसमधील मजकुरानुसार नक्षलवादी प्रवृतीच्या सामाजिक संस्थांची आपल्याला माहिती आहे अशाप्रकारचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेले जाहीर वक्तव्य अत्यंत गंभीर व महत्वाचे सुद्धा आहे. कारण, ही माहिती पोलिसांना देऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांच्या मदतीने त्यांनी कारवाई केली पाहिजे. परंतु, अशा अनेक हिंसक कारवाया करणाऱ्या व अर्बन नक्सल विविध NGO या वास्तवात नसूनही शिंदेंनी असत्यावर आधारीत वक्तव्ये पसरविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न मुख्यमंत्रीपदावर बसून केलेला असेल तर; आपण ज्याप्रमाणे हे बेताल वक्तव्य जाहीरपणे केले त्याचप्रमाणे आपल्या बेजबाबदार आणि, खोटारड्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी अशी नम्र व लोकशाहीवर आधारित सूचना ॲड. बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी केलेली आहे.