इंग्लंडने अमेरिकेचा १० गडी राखून केला पराभव; बटलरचे अर्धशतक तर ख्रिस जॉर्डनची इंग्लंडसाठी पहिली हॅटट्रिक; गाठली उपांत्य फेरी - Rayat Samachar
Ad image

इंग्लंडने अमेरिकेचा १० गडी राखून केला पराभव; बटलरचे अर्धशतक तर ख्रिस जॉर्डनची इंग्लंडसाठी पहिली हॅटट्रिक; गाठली उपांत्य फेरी

मुंबई | गुरुदत्त वाकदेकर | २४.६.२०२४

गतविजेत्या इंग्लंडने अमेरिकेविरुद्ध दमदार कामगिरी करत १० षटकांत ११६ धावांचे लक्ष्य गाठले आणि उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. दुसरीकडे, अमेरिकेने सुपर-८ टप्प्यातील तिन्ही सामने गमावले आणि स्पर्धेतून बाहेर पडले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

कर्णधार जोस बटलरचे अर्धशतक आणि फिल सॉल्टसोबत पहिल्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीमुळे गतविजेत्या इंग्लंडने सुपर-८ टप्प्यातील सामन्यात अमेरिकेचा १० गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना, अमेरिकेने १८.५ षटकांत ११५ धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंडने केवळ ९.४ षटकांत कोणतेही नुकसान न करता ११७ धावा करून सामना जिंकला आणि उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. इंग्लंडकडून बटलरने ३८ चेंडूंत ६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ८३ धावा केल्या तर फिल सॉल्टने २१ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

या दणदणीत विजयासह, इंग्लंड संघ सुपर-८ टप्प्यातील गट-२ मध्ये दोन विजय आणि एक पराभवासह तीन सामन्यांतून चार गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा निव्वळ रन रेट +१.९९२ झाला जो दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजपेक्षा चांगला आहे. त्याचबरोबर ग्रुप स्टेजमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अमेरिकन संघाची कामगिरी सुपर एटमध्ये निराशाजनक राहिली आणि संघाने आपले तिन्ही सामने गमावले आणि स्पर्धेबाहेर पडले. तत्पूर्वी, वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने इंग्लंडसाठी हॅटट्रिक घेतली आणि अमेरिकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात तो यशस्वी ठरला. टी२० प्रकारामध्ये हॅट्ट्रिक घेणारा जॉर्डन हा इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत इंग्लंडने एकही विकेट न गमावता विजय मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे. अमेरिकेपूर्वी २०२२ मध्ये इंग्लंडनेही भारताला याच फरकाने पराभूत केले होते.

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाला बटलर आणि सॉल्टने दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या दोन षटकांत इंग्लंडने संथ फलंदाजी केली, पण तिसरे षटक टाकायला आलेल्या सौरभ नेत्रावळकरवर बटलर आणि सॉल्टने हल्ला चढवला. या षटकात इंग्लंडने १९ धावा केल्या. यानंतर दोन्ही फलंदाजांनी जोरदार फलंदाजी करत पॉवरप्ले संपेपर्यंत कोणतेही नुकसान न करता ६० धावा जोडल्या. बटलरने ३२ चेंडूत १ षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बटलरने स्फोटक फलंदाजी केली. नववे षटक टाकण्यासाठी आलेल्या हरमीत सिंगच्या षटकात त्याने ३२ धावा केल्या आणि सलग ५ षटकार मारले आणि पुढच्या षटकात चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

अमेरिकेचा डावखुरा फिरकीपटू हरमीत सिंगच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. हरमीतने इंग्लंडविरुद्ध एका षटकात ३२ धावा दिल्या आणि टी२० विश्वचषकात एका षटकात सर्वाधिक धावा देणारा पाचवा गोलंदाज ठरला.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि अफगाणिस्तानचा अजमतुल्ला ओमरझाई यांच्या नावावर टी२० विश्वचषकात सर्वात महागडे षटक टाकण्याचा अवांछित विक्रम आहे. ब्रॉडने २००७ मध्ये भारताविरुद्ध एका षटकात ३६ धावा दिल्या होत्या आणि ओमरझाईने २०२४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एका षटकात ३६ धावा दिल्या होत्या.

तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून अमेरिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, परंतु अमेरिकेची फलंदाजी अत्यंत खराब झाली. अवघ्या ८८ धावांत अमेरिकेने ५ विकेट गमावल्या होत्या. पहिल्याच षटकात अँड्रिस गौसने रीस टोपलीच्या चेंडूवर षटकार ठोकला, पण दोन चेंडूंनंतर तोच शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना तो डीप स्क्वेअर लेगवर फिल सॉल्टकडे झेलबाद झाला. बॅकवर्ड पॉईंटवर स्टीफन टेलरला मोईन अलीकडे झेलबाद करून सॅम कुरनने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आपली ५०वी विकेट घेतली, ज्यामुळे पॉवरप्लेमध्ये अमेरिकेची धावसंख्या २ विकेट्सवर ४८ धावा होती. जोस बटलरने लेगस्पिनर आदिल रशीदकडे चेंडू सोपवला, ज्याने कर्णधार ॲरॉन जोन्सला त्याच्या दुसऱ्या षटकात सुंदर गुगली टाकून बाद केले. त्यानंतर रशीदने गुगली लावून नितीशचा डाव संपवला. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने १४व्या षटकाच्या शेवटी मिलिंद कुमारला बाद करून धावसंख्या ५ विकेट्सवर ८८ धावांवर आणली. अमेरिकेने १७ व्या षटकात १०० धावा पूर्ण केल्या.

कर्णधार जोस बटलरने जॉर्डनला १९ वे षटक टाकायला पाठवले. विशेष म्हणजे या सामन्यासाठी मार्क वुडच्या जागी जॉर्डनला अंतिम ११ मध्ये स्थान देण्यात आले आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. जॉर्डनने कोरी अँडरसनला पहिल्याच चेंडूवर हॅरी ब्रूककरवी झेलबाद केले. पुढचा चेंडू निर्धाव होता, तर तिसऱ्या चेंडूवर जॉर्डनने अली खानला त्रिफळाचीत बाद केले. नवा फलंदाज म्हणून आलेला नॉथुश केंजिगे चौथ्या चेंडूवर पायचीत बाद झाला आणि पुढच्याच चेंडूवर सौरभ नेत्रावळकरला बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. यासह जॉर्डन टी२० प्रकारामध्ये हॅट्ट्रिक पूर्ण करणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. या विश्वचषकात गोलंदाजाने हॅटट्रिक घेण्याची ही तिसरी वेळ आहे. जॉर्डनपूर्वी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा एकमेव गोलंदाज होता ज्याने या विश्वचषकात दोनदा हॅट्ट्रिक घेतली आहे.

जॉर्डनने या सामन्यात हॅट्ट्रिक तर पूर्ण केलीच पण त्याच्या षटकात पाच चेंडूत चार बळीही घेतले. टि२० विश्वचषकात एका षटकात चार विकेट घेणारा जॉर्डन हा आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरनंतर जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. कॅम्फरने २०२१ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध एका षटकात ४ विकेट घेतल्या होत्या आणि आता जॉर्डननेही हा पराक्रम केला. अमेरिकेकडून नितीश कुमारने सर्वाधिक ३० धावा केल्या आणि कोरी अँडरसनने २९ धावा केल्या, तर हरमीतने २१ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जॉर्डनने ४, तर सॅम कुरन आणि आदिल रशीदने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

आदिल रशीदला सामनावीर पुरस्कार देऊन ख्रिस जॉर्डनवर अन्याय करण्यात आला. उद्या सकाळी ६ वाजता वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका तर रात्री ८ वाजता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहेत. आतापर्यंत स्पर्धेमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोनच संघ अपराजित आहेत. दोन्ही संघ आपापल्या गटांमध्ये विजय मिळवून उपांत्य फेरी गाठू शकतात. परंतु दक्षिण आफ्रिका पराभूत झाल्यास वेस्ट इंडिज सोबत निव्वळ धावगतीवर निर्णय होऊ शकतो.

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment