अहमदनगर (पंकज गुंदेचा) २०.६.२०२४
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हणजेच आपल्या जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या सिध्दाराम सालीमठ यांच्या निवासस्थानासमोर अनेक दिवसांपासून मोठी उघडी गटार असून त्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत. उघड्या बोडक्या गटारीमुळे परिसरात माशांचे व डासांचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे रोगराई पसरून साथरोग येवू शकतो, अशी परिसरातील नागरिकांची चर्चा आहे. हि गटार पावसाळ्यात रस्त्यांवर तुडुंब भरून वाहत असते. बाहेरगावच्या वाहनचालकांना अंदाज न आल्यामुळे अनेकदा दुचाकी, तीनचाकी व अनेक चारचाकी वाहने गटारीत गेलेली आहेत. गटार थेट डावरेगल्ली, झेंडीगेट, कसाब गल्ली या भागातून वाहत येत असून ती जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून सेंट अण्णा चर्चकडे जाते. म्हणजेच हि गटार चक्क पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यालयासमोर असूनही मनपा प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
चक्क जिल्हाधिकारी निवास, पालकमंत्री कार्यालयासमोरिल उघड्या घाणेरड्या गटारीची दुर्दशा पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. महानगरपालिका प्रशासनाने हि संपुर्ण गटार सिमेंट काँक्रिटमधे बांधून झाकून घ्यावी, जेणे करून दुर्गंधी, साथरोग व अपघात होणार नाहीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री विखे पाटील कार्यालय व जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या घरासमोरील उघडी घाणेरडी गटार तात्काळ सिमेंट पाईपने बंद करून नागरिकांसह पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना दिलासा द्यावा.