दक्षिण आफ्रिकेने जिंकला सलग पाचवा सामना, १५ वर्षांच्या विक्रमाची बरोबरी, अमेरिका १८ धावांनी पराभूत - Rayat Samachar

दक्षिण आफ्रिकेने जिंकला सलग पाचवा सामना, १५ वर्षांच्या विक्रमाची बरोबरी, अमेरिका १८ धावांनी पराभूत

रयत समाचार वृत्तसेवा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) २०.६.२४

सुपर-८ च्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेचा १८ धावांनी पराभव केला आहे. अँटिग्वामध्ये खेळल्या गेलेल्या या सुपर-८ गट-२ सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ४ गडी गमावून १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात अमेरिकेचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १७६ धावा करू शकला. अमेरिकेच्या डावात कागिसो रबाडाने १९व्या षटकात हरमीत सिंगची विकेट घेत सामन्याला कलाटणी दिली. अमेरिकेला शेवटच्या दोन षटकात २८ धावांची गरज होती. त्यावेळी हरमीत आणि अँड्रिज गॉस खेळपट्टीवर होते. पहिल्याच चेंडूवर हरमीत झेलबाद झाला. त्याने २२ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. गॉससोबत ९१ धावांची भागीदारी झाली. मात्र, हरमीत बाद झाल्याने सामना उलटला. रबाडाने १९व्या षटकात केवळ दोन धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात अमेरिकेला विजयासाठी २६ धावांची गरज होती आणि संघाला केवळ सात धावा करता आल्या. गॉसने ४७ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्यानंतर नाबाद राहिला. याआधी दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने ७४ धावांची खेळी केली होती. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने सलग पाचवा सामना जिंकला. त्यांनी यापूर्वी २००९ च्या टी२० विश्वचषकातही सलग पाच सामने जिंकले होते.

क्विंटन डी कॉक आणि कर्णधार एडन मार्कराम यांच्यात दुस-या विकेटसाठी ६० चेंडूत खेळलेल्या ११० धावांच्या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सुपर-८ सामन्यात ४ गडी गमावून १९४ धावा केल्या. डी कॉकने ४० चेंडूंत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने केलेली ७४ धावांची खेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. मार्करामने ४६ धावा केल्या. एकवेळ १४१ धावांवर ४ विकेट पडल्या होत्या, पण क्लासेन (३६*) आणि स्टब्स (२०*) यांनी ३० चेंडूत ५३ धावा जोडल्या आणि आफ्रिकेला १९४ धावांपर्यंत नेले. नेत्रावळकरने २१ धावांत प्रत्येकी दोन आणि हरमीतने २४ धावांत दोन बळी घेतले.

अमेरिकेचा कर्णधार ॲरॉन जोन्सने नाणेफेक जिंकली. आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सौरभ नेत्रावळकरने चमकदार गोलंदाजी सुरू ठेवत रीझा हेंड्रिक्सला (११) बाद केले. क्विंटन डी कॉकने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. त्याने चौथ्या षटकात जसदीप सिंगवर ३ षटकार आणि एक चौकार लगावला. या षटकात एकूण २८ धावा आल्या. पाचव्या षटकात डी कॉकने केन्झिगेवर सलग दोन चौकार ठोकले आणि आफ्रिकेला ४.५ षटकात ५० धावांचा टप्पा पार करून दिला. डी कॉक इथेच थांबला नाही, त्याने सहाव्या षटकात अली खानला मिड-विकेटवर आणखी एक षटकार मारला. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये आफ्रिकेने एका विकेटवर ६४ धावा केल्या. त्याने मार्करामसोबत २७ चेंडूत अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. मार्करामनेही डी कॉकप्रनाणे टेलरला सलग चौकार आणि षटकार ठोकले. डी कॉकने हरमीतवर चौकार मारून आपले अर्धशतक २६ चेंडूत पूर्ण केले. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या ९.५ षटकांत शंभर धावा पूर्ण केल्या.

VIRAJ TRAVELS
Ad image

सह-यजमान अमेरिकेने लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या षटकात सलामीवीर स्टीव्हन टेलरची (२४) विकेट गमावली, ज्याला कागिसो रबाडाने (१८ धावांत ३ विकेट) चेंडू उंच टोलावण्यास प्रवृत्त केले आणि हेनरिक क्लासेनने त्याचा झेल टिपला. गॉस एका टोकाला उभा होता. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात नितीश कुमार (८) रबाडाच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर कर्णधार ॲरॉन जोन्सला खातेही उघडता आले नाही आणि तो केशव महाराजचा (२४ धावांत १ बळी) बळी ठरला. ॲनरिक नॉर्टजे (३७ धावांत १ बळी) नंतर कोरी अँडरसनला (१२ धावा) त्रिफळाचीत बाद केले.

शायान जहांगीर (३) बाद झाल्यानंतर गॉस आणि हरमीत सिंग (३८ धावा, २२ चेंडू, २ चौकार, ३ षटकार) यांनी जबरदस्त खेळ केला, ज्यामुळे विजयाची आशा निर्माण झाली. रबाडाने १९व्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या दोन धावा देत हरमीतची विकेट घेतली. यासह या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी ४३ चेंडूत ९१ धावांची भागीदारी संपुष्टात आली. या स्पर्धेतील सहाव्या विकेटसाठी अमेरिकेची ही सर्वोच्च भागीदारी आहे.

क्विंटन डी कॉकला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्या सकाळी ६ वाजता इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज तर रात्री ८ वाजता भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना होणार आहे.

Share This Article
Leave a comment