पुणे (प्रतिनिधी) १९.६.२०२४
दरवर्षीप्रमाणे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा होणार असून एक दिवस तरी वारी अनुभवावी यासाठी बारामतीपासून ते सणसरपर्यंत वारीत सहभागी होण्याचे आवाहन.
यारे यारे लहान थोर । याती भलते नारी नर ।
करावा विचार । न लगे चिंता कोणाची ।।
तोंडाने विठ्ठल नामाचा गजर करत आणि मनात “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ !”
हा भाव ठेवत हजारो वैष्णवांची दिंडी लवकरच पंढरीला निघणार आहे. विठ्ठल हे बहुजन कष्टकर्यांचे दैवत आहे. इतर देव-देवतांसारखा नवस या दैवताला कधीही बोलला जात नाही. संत परंपरेने उपासना पद्धतीतील कर्मकांडाचे अवडंबर नाकारले. मध्यस्थ नाकारत भक्त आणि पांडुरंगाचे थेट नाते जोडले. ईश्वरकेंद्री धर्म, मानवकेंद्री केला. एवढेच नव्हे तर “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी! ” असे म्हणत “कर्म हीच भक्ती” ही साधी, सोपी, पण अतिशय महत्वाची शिकवण देखिल संतांनी रुजविली. संतांनी सामाजिक समतेचा झेंडा पंढरपूरच्या वाळवंटात रोवला आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात विद्रोह केला. ‘वारी’ हा त्यामुळेच महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि तसा खरा अध्यात्मिक सोहळा ठरला आहे. आपण सर्व ह्या उदारमतवादी परंपरेचा वारसा जपूया. यंदा तुकोबारायांच्या पालखीसोबत एक दिवस दोन पावले चालूया.
यंदा ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ चे ११ वे वर्ष आहे. या वारीत विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक सामील होत आहेत. यंदाही या दिंडीत सामील होण्याचे आवाहन ह. भ. प. शामसुंदर सोन्नर, शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, सुभाष वारे, राजाभाऊ अवसक आदींनी केले आहे.
महत्वाची माहिती – रविवारी ता. ७ जुलै २०२४ रोजी पुणे येथून सकाळी ५ वाजता बारामती येथे जाण्याकरिता बस निघेल. पुणे ते बारामती हे अंतर अंदाजे अडीच तासाचे आहे. सकाळी ७ वाजता बारामती येथे आपण एकत्र येणार. बारामती येथून तुकोबारायांची पालखी सणसर येथे जाण्याकरीता निघेल. बारामतीपासून दुपारच्या विसाव्यापर्यंत चालणार. दुपारच्या विसाव्यानंतर जेवण, समारोप आणि त्यानंतर पुण्याला यायला माघारी निघणार. लांबून येणाऱ्यांची शनिवारी ता. ६ जुलै २०२४ रोजी रात्री मुक्कामाची व्यवस्था एस.एम.जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन पुणे येथे केली जाईल. रात्रीचा मुक्काम आणि जेवण याचे २५०/- रुपये होतील. सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण, पुणे ते बारामती येणे – जाणे बसप्रवास याची रक्कम ५५०/- रुपये असेल. ‘संविधान समता दिंडी’ यंदा पुणे येथून ता. ३० जूनपासून ते पंढरपूरपर्यंत १७ जुलै दरम्यान निघणार आहे. यासाठी नावनोंदणी आवश्यक असून या क्रमांकावर संपर्क साधवा. विशाल विमल – 7276559318, दत्ता पाकिरे – 8888185085, महादेव पाटील – 9987034452.