पाथर्डी (राजेंद्र देवढे) १६.६.२०२४
माहेश्वरी समाज बांधवांनी समाजातील परंपरांचे जतन करत नव्या बदलांना सामोरे जाताना भविष्यकालीन आव्हानांचा वेध घेत वाटचाल करावी. समाजाप्रती असलेली उदासीनता झटकून एकत्र येऊन समाजाच्या जडणघडणीचा संकल्प सर्वांसाठी लाभदायक ठरेल. असे मत माहेश्वरी समाज संघटनेचे जिल्हा सचिव श्रीकांत जाजू यांनी व्यक्त केले.
माहेश्वरी समाजाच्या वंशोत्पत्तीचा दिवस म्हणून महेश नवमीचा उत्सव सर्वत्र देशभर साजरा केला जातो. शहरातील माहेश्वरी समाजाने शहरातून भगवान शंकराच्या प्रतिमेची वाजतगाजत भव्य मिरवणूक काढली. शंकर महाराज मठाचे संस्थापक माधवबाबा, मोहन सुडके महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. महापूजा, आरतीचे मुख्य यजमान अशोक व ज्योती मंत्री यांचे हस्ते सर्व धार्मिक विधी संपन्न झाले. मिरवणूक मार्गावर सकल जैन समाज व लालकृष्ण पतसंस्थेच्या वतीने शीतपेय व पिण्याच्या पाण्याचे वितरण करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, बँडपथक व भजन पथकामुळे मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
माहेश्वरी राम मंदिरात मुख्य सोहळ्यामध्ये, मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व कर्तबगार समाज बांधवांचा गौरव करण्यात आला. महिला मंडळाने घेतलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. मंचावर माहेश्वरी पंच ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विलास बाहेती, तालुका सभेचे अध्यक्ष सचिन बजाज, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदीप बाहेती, युवक मंडळाचे अध्यक्ष गोविंद लाहोटी, तालुका सचिव रामनाथ बंग, महिला आघाडीच्या उज्वला बाहेती, जिल्हा संघटनेचे अशोक मंत्री व रमाकांत लाहोटी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना जाजू म्हणाले, पारशी समाजानंतर देशात अत्यंत छोटा समाज म्हणून माहेश्वरी समाजाकडे पाहिले जाते. धार्मिक दानशूर व उद्योग व्यवसायप्रिय अशा समाजाने संघ शक्ती मजबूत करण्यावर भर देऊन परस्परांच्या भावना जाणून सहकार्य करावे. सोशल मीडिया, मोबाईलचा अतिरेक व आहाराविषयी प्रबोधन करत नव्या पिढीला घडवताना सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करावे. समाजातील विविध क्षेत्रातील कार्यरत बांधवांनी मार्गदर्शकाची भूमिका बजवावी. तालुक्यातील माहेश्वरी समाजाने रामजन्मभूमी लोकार्पण सोहळा जिल्ह्यामध्ये अग्रक्रमाने साजरा करत विशेष योगदान दिले. विविध आरोग्य शिबिरे, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन असे उपक्रम यशस्वीपणे पार पाडले आहेत.
माजी नगरसेवक रामनाथ बंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सारंग मंत्री यांनी स्वागत केले तर ओम डागा यांनी आभार मानले. मुख्य पुरोहित तारा देवा यांनी पौरोहित्य केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, पालकमंत्री राधाकृष्ण विखे , खासदार नीलेश लंके, यासह राज्यातील व जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमानिमित्त पाठवलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. मिरवणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. प्रताप ढाकणे यांनी प्रतिमा पूजन करत माहेश्वरी बांधवांना शुभेच्छा दिल्या. जगदीश लोहिया, अनिल लाहोटी यासह युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.