अहमदनगर (प्रतिनिधी) १४.६.२०२४
राज्यभर गाजलेल्या २९१ कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेच्या नगर अर्बन बँक घोटाळ्यात अनेक पैलू रोज समोर येत आहेत. मल्टीस्टेटचा अनिर्बंध कारभार किती भयानक असू शकतो याची हि फक्त एक छोटीसी झलक असल्याची जाणकारांमधे चर्चा आहे. या घोटाळ्याचा थेट परिणाम अहमदनगर लोकसभा निवडणुकीवर झाल्याचे स्पष्ट आहे. येथील आरएसएस बीजेपीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूकीत या घोटाळ्याच थेट फटका बसला आहे. यातील बहुतांश घोटाळेबाज हे याच पक्षाशी संबंधित आहेत तर प्रमुख इसम कै. दिलीप गांधी हे भाजपाचा माजी खासदार होते. त्यांचे अनेक सहकाऱ्यांनी या घोटाळ्यात हात धुवून घेतल्याचे दिसून येत आहे. त्यातील अनेकजण गजाआड तर काही जण बेपत्ता आहेत.
या विषयी माहिती देताना मुळ फिर्याद, बँक बचाव समिती शिलेदार तथा माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सांगितले की, गोरगरिब जनतेचा पैसा अडकलेला आहे, त्यामुळे घोटाळ्यात सहभागी कोणालाच दयामाया दाखवायची नाही, ही आदर्श भूमिका घेत अहमदनगर जिल्हा एमपीआईडी विशेष न्यायालयाचे सन्माननीय न्यायमुर्ती पी. आर. सित्रे साहेब यांनी काल ता. १३ रोजी पुन्हा एकदा पाच कर्जदारांचे अटकपुर्व जामीन फेटाळले. सात्विक अमित पंडित, सत्येंद्र रावत, संजय सारडा, सुशील सारडा व एक महिला असे हे कर्जदार आहेत.
ते पुढे म्हणाले की, गोरगरीब ठेवीदारांचा पैसा पुर्ण परत मिळावा, यासाठी माननीय न्यायमुर्तींनी आग्रही निरीक्षण नोंदविले आहेत. यामुळे ठेवीदारांना खुप मोठा आधार निर्माण झालेला आहे. यामुळे नगर अर्बन बँकेचे उर्वरित कर्जदारांना हा एक इशाराच आहे. बँकेचे म्हणजे ठेवीदारांचे पैसे परत करण्याशिवाय काहीच गत्यंतर नाही. हे लक्षात घेतलेल्या अनेक कर्जदारांनी आवसायकांशी तसेच बँक बचाव समितीशी संपर्क करून पैसे भरण्याची तयारी दाखवली आहे. आणखी समाधानाची बाब म्हणजे नुकतीच केंद्रीय निबंधकांनी बँकेची एक रक्कमी परतफेड योजनेला मंजूरी दिलेली आहे. या योजने अंतर्गत आता अनेक कर्जदारांना मोठी सवलत मिळणार आहे. यातून बँकेची वसूली होईल, अशी चिन्हे आहेत.
गांधी यांनी सांगितले की, माननीय न्यायाधीश महोदयांनी घेतलेल्या कडक व आदर्श भूमिकेमुळे घोटाळेतील सहभागी सर्वांचेच धाबे दणालेले आहेत. न्यायालयातील सरकारपक्षाचे वकील, ठेवीदारांचे वकील व बँक बचाव समिती सदस्य ॲड. अच्युत पिंगळे यांनी देखील ठेवीदारांची बाजू भक्कमपणे मांडली. अनेक ठेवीदार न्यायालयात समक्ष हजर राहून चिकाटीने पाठपूरावा करत आहेत. बँक बचाव समिती ठेवीदारांचे बाजूने खंबीरपणे उभी आहे त्यामुळे हे सर्वजन अभिनंदनास पात्र आहेत.
कर्जदार पंडीत, रावत, सारडा यांचे अटकपुर्व जामिनअर्ज पून्हा फेटाळले; ठेवीदारांचे पैसे लवकरच मिळण्याची आशा
Leave a comment