अहमदनगर (प्रतिनिधी) १३.६.२४
येथील कापड बाजारात सर्वत्र पडून राहिलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. या समस्येवर व्यापारी महासंघ व कापड बाजार व्यापारी एसोसिएशनकडून अनेकदा तक्रारी करूनही उपाययोजना करण्यात आलेली नाही. कचरा भर दुपारपर्यंत न उचलल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
व्यापारी सकाळी व्यवसायासाठी नवचैतन्याने दुकानात येतात, मात्र लगेचच त्यांना कचऱ्याचे दर्शन घडते. सर्वत्र पसरलेल्या दुर्गंधीमुळे दुकाने उघडता येत नाहीत, ज्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. येणाऱ्या ग्राहकांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. व्यापारी मोठ्या प्रमाणात कर भरतात तसेच महानगर पालिका चे देखील सर्व कर नियमित भरतात, तरीही त्यांना वारंवार हा त्रास सहन करावा लागत आहे.
आजही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि अभिषेक कळमकर यांनी तातडीने हस्तक्षेप करून कचरा उचलण्याची व्यवस्था केली. दुपारी १:३० वाजता कचरा उचलला गेला, पण व्यापाऱ्यांमध्ये असंतोष कायम आहे.
व्यापारी किशोर बल्लाळ, रवी गांधी, संजय काठेड, ललित कटारिया, अमित गांधी, धर्मेंद्र सोनग्रा यांनी आपली व्यथा व्यक्त केली. अहिल्यानगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी इशारा दिला की, जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर व्यापारी मोठे आंदोलन उभारतील आणि कचरा महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात आपापल्या कर्मचाऱ्यांच्या सहायाने कचरा जमा करून त्यांना स्वाधीन करतील.
या वेळी उपस्थित नगरसेवकांनीही व्यापाऱ्यांना पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. सैनिटरी ऑफिसर आणि ठेकेदाराकडून पुन्हा असे होणार नाही याबाबत लेखी आश्वासन घेतले गेले आहे.