वेस्ट इंडिजचा संघ विजयासह अंतिम-८ मध्ये; न्यूझीलंड शर्यतीतून बाहेर - Rayat Samachar

वेस्ट इंडिजचा संघ विजयासह अंतिम-८ मध्ये; न्यूझीलंड शर्यतीतून बाहेर

रयत समाचार वृत्तसेवा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १३.६.२४

टी२० विश्वचषकाच्या २६व्या सामन्यात आज वेस्ट इंडिजचा सामना न्यूझीलंडशी झाला. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ केवळ १३६ धावा करू शकला.

टी२० विश्वचषक २०२४ च्या २६व्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने न्यूझीलंडचा १३ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ९ गडी गमावून १४९ धावा केल्या. शेरफेन रदरफोर्डने ३९ चेंडूत नाबाद ६८ धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १३६ धावा करू शकला. या विजयासह रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखालील संघ सुपर-८ मध्ये पोहोचला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ सुपर-८ च्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. त्यांना १४ जूनला युगांडा आणि १७ जूनला पापुआ न्यू गिनीशी सामना करायचा आहे. या दोन सामन्यातील विजयही किवी संघासाठी पुरेसा ठरणार नाही. वास्तविक, वेस्ट इंडिजचे तीन सामन्यांत तीन विजयांसह सहा गुण आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानने आतापर्यंत दोनपैकी दोन जिंकले आहेत. त्यांचे चार अंक आहेत. अफगाणिस्तानला १४ जूनला पापुआ न्यू गिनीशी सामना करायचा आहे. हा सामना जिंकल्यास किंवा पावसामुळे सामना वाहून गेल्यास अफगाणिस्तान संघ पात्र ठरेल.

अफगाणिस्तान पापुआ न्यू गिनीकडून मोठ्या फरकाने पराभूत झाला तरच न्यूझीलंडला संधी मिळेल. तथापि, हे घडणे जवळजवळ अशक्य आहे. अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात किवीजचा ८४ धावांनी पराभव केला होता. अशा स्थितीत अफगाणिस्तानही पात्र ठरणार हे निश्चित मानले जात आहे. अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीला पराभूत केल्यास त्यांचे सहा गुण होतील, तर न्यूझीलंडला दोन्ही सामने जिंकले तरी केवळ चार गुण मिळू शकतील. अशा स्थितीत किवी संघाचा प्रवास जवळपास संपला आहे. शेरफेन रदरफोर्डला त्याच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

VIRAJ TRAVELS
Ad image

शेरफेन रदरफोर्डच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने २० षटकांत ९ गडी गमावून १४९ धावा केल्या. वेस्ट इंडिज संघाने ३० धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. जॉन्सन चार्ल्स आणि रोस्टन चेस खाते न उघडताच तंबूमध्ये परतले. त्याचवेळी ब्रँडन किंग ९ धावा करून बाद झाला, निकोलस पूरन १७ धावा करून आणि कर्णधार रोव्हमन पॉवेल एक धावा करून बाद झाले. यानंतर अकील हुसेनने शेरफेन रदरफोर्डसोबत २८ धावांची भागीदारी केली. अकील १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर रदरफोर्डने आंद्रे रसेलसोबत १८ धावांची भागीदारी केली. रसेल ७ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. त्यानंतर रदरफोर्डने रोमॅरियो शेफर्डसोबत २७ धावांची भागीदारी केली. शेफर्ड १३ धावा करू शकला. अल्झारी जोसेफ ६ धावा करून बोल्टचा बळी ठरला. मात्र, शेवटच्या दोन षटकांपर्यंत न्यूझीलंडकडे त्यांचा एकही प्रमुख वेगवान गोलंदाज शिल्लक नव्हता. अशा स्थितीत केन विल्यमसनला १९व्या षटकात डॅरिल मिशेलकडे गोलंदाजी करावी लागली. इथेच रदरफोर्डने सामना फिरवला. या षटकात त्याने तीन षटकार मारले आणि एकूण १९ धावा केल्या. त्याचवेळी २०व्या षटकात विल्यमसनने मिचेल सँटनरकडे गोलंदाजी सोपवली. या षटकात रदरफोर्डने दोन चौकार आणि एका षटकारासह १८ धावा केल्या. वेस्ट इंडिजने शेवटच्या दोन षटकात ३७ धावा करत १४९ धावा केल्या. रदरफोर्डने ३९ चेंडूंत दोन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने गुडाकेश मोतीसोबत शेवटच्या विकेटसाठी १३ चेंडूत ३७ धावांची भागीदारी केली.

१५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. संघाने ३९ धावांत तीन महत्त्वाचे विकेट गमावले होते. डेव्हॉन कॉनवे ५, फिन ऍलन २६ आणि कर्णधार केन विल्यमसन १ धाव करून बाद झाले. रचिन रवींद्रला १० तर डॅरिल मिशेलला १२ धावा करता आल्या. यानंतर ग्लेन फिलिप्ससह जिमी नीशमने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांनी २२ धावांची भागीदारीही केली. अल्झारी जोसेफने नीशमला बाद करून ही भागीदारी भेदली. त्याला १० धावा करता आल्या. फिलिप्सही ३३ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनै ४० धावा करून तंबूमध्ये परतला. टीम साऊदीला खातेही उघडता आले नाही, तर ट्रेंट बोल्ट ७ धावा करून बाद झाला. मिचेल सँटनरने शेवटच्या षटकात तीन षटकार नक्कीच मारले, पण ते संघाला विजयासाठी पुरेसे नव्हते. किवी संघाला २० षटकांनंतर ९ बाद १३६ धावाच करता आल्या. सँटनरने १२ चेंडूत २१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने चार विकेट घेतल्या. तर गुडाकेश मोतीने तीन गडी बाद केले. अकिल हुसेन आणि आंद्रे रसेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Share This Article
Leave a comment