सूर्यकुमार - शिवमच्या शानदार भागीदारीमुळे भारतीय संघाचा अमेरिकेवर विजय, पाकिस्तानच्या आशा कायम - Rayat Samachar

सूर्यकुमार – शिवमच्या शानदार भागीदारीमुळे भारतीय संघाचा अमेरिकेवर विजय, पाकिस्तानच्या आशा कायम

रयत समाचार वृत्तसेवा
7 Min Read

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १३.६.२४

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्या उत्कृष्ट भागीदारीच्या जोरावर भारताने अमेरिकेचा सात गडी राखून पराभव करत सुपर-८ फेरीसाठी पात्र ठरले. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने २० षटकांत ८ गडी गमावून ११० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही, मात्र सूर्यकुमार आणि शिवमने संघाची धुरा सांभाळली आणि त्या जोरावर भारताने १८.२ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १११ धावा करून विजय मिळवला.

या स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. अशा प्रकारे भारताने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर आतापर्यंतचे सर्वोच्च यशस्वी लक्ष्य गाठले. भारतातर्फे सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूंत दोन चौकार व दोन षटकारांसह ५० धावा केल्या तर शिवम दुबे ३५ चेंडूंत एक चौकार व एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा करून नाबाद राहिला. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरने दोन बळी घेतले.

या सामन्यापूर्वी भारत आणि अमेरिका हे एकमेव संघ अ गटात अपराजित राहिले होते. भारताची निव्वळ धावगती त्यांच्या गटात चांगली होती. त्यामुळे पुढील फेरी गाठणे जवळपास निश्चित मानले जात होते. भारताला हरवून अमेरिकन संघाने पाकिस्तानचा प्रवास ग्रुप स्टेजमध्येच थांबवला असता. मात्र, भारताच्या विजयाने पाकिस्तानने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गटामध्ये, भारत सध्या तीन सामन्यांतून तीन विजयांसह सहा गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर पराभवानंतरही, अमेरिकेचा संघ तीन सामन्यांतून दोन विजय आणि एक पराभवासह चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान संघ तीन सामन्यांतून एक विजय आणि दोन पराभवांसह दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने शानदार गोलंदाजी करत पहिल्याच षटकात विराट कोहलीला शून्यावर बाद करून भारताला पहिला धक्का दिला. अमेरिकेविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना कोहली पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. टी२० विश्वचषकाच्या सामन्यात कोहली शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. टी२० विश्वचषकामध्ये कोहलीची बॅट अजिबात कामगिरी करत नाहीये. ग्रुप स्टेजच्या पहिल्या तीन मॅचमध्ये कोहलीची बॅट फ्लॉप ठरली असून तीन मॅचमध्ये त्याने फक्त पाच धावा काढल्या आहेत. कोहलीने आयर्लंडविरुद्ध पाच चेंडूंत एक धाव आणि पाकिस्तानविरुद्ध तीन चेंडूंत चार धावा केल्या. क्रिकेट मंडळाच्या खर्चावर परदेश भ्रमंती सोडून विराटने सरावावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोहलीपाठोपाठ सौरभने भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही तंबूमध्ये पाठवले, जो सहा चेंडूंत तीन धावा काढून बाद झाला.

सुरुवातीच्या धक्क्यानंतर भारतीय फलंदाज दडपणाखाली आले आणि पॉवरप्लेमध्ये त्यांना जास्त धावा करता आल्या नाहीत. भारताने अमेरिकेविरुद्ध पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावून ३३ धावा केल्या, जी टी२० विश्वचषकातील पॉवरप्लेमधील सहावी नीचांकी धावसंख्या आहे. जागतिक स्पर्धेतील पॉवरप्लेमध्ये भारताची सर्वात कमी धावसंख्या नागपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध चार विकेट्सवर २९ धावा आहे.

सुरुवातीच्या धक्क्यांनंतर सूर्यकुमार यादवने यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतसह संघाची जबाबदारी स्वीकारली. सूर्यकुमारने पंतसोबत तिसऱ्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी केली. चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेल्या पंतला अली खानने त्रिफळाचीत बाद केले. त्याने २० चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह १८ धावा केल्या. पंत बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ३९ धावांत तीन विकेट्स अशी होती. त्यावेळी अमेरिका आणखी एक धक्का देईल असे वाटत होते, पण सूर्यकुमारने शिवमसह दमदार कामगिरी करत संघाला संकटातून बाहेर काढले. सूर्यकुमार आणि शिवम यांच्यात चौथ्या विकेटसाठी नाबाद ७२ धावांची भागीदारी झाली, ज्याच्या जोरावर भारतीय संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.

या सामन्यात सूर्यकुमार यादवने जबाबदारीने खेळ करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सूर्यकुमारने शिवम दुबेसह केवळ डाव सांभाळला नाही तर शेवटपर्यंत टिकून राहून संघाला विजयापर्यंत नेले. सूर्यकुमारने १९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमारने ४९ चेंडूत अर्धशतक झळकावले, जे टी२० विश्वचषकातील पाचवे सर्वात संथ अर्धशतक आहे. या जागतिक स्पर्धेत सूर्यकुमार व्यतिरिक्त डेव्हन स्मिथ आणि डेव्हिड हसीने ४९ चेंडूत अर्धशतके झळकावली आहेत. टी२० विश्वचषकात सर्वात संथ अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मोहम्मद रिझवानच्या नावावर आहे, ज्याने यावर्षी न्यूयॉर्कमध्ये कॅनडाविरुद्ध ५२ चेंडूत ही खेळी केली होती.

भारताच्या डावात अमेरिकेला ५ धावांचा दंड ठोठावण्यात आला. वास्तविक, सामन्यात अमेरिकेचा संघ तिसऱ्यांदा वेळेवर षटक सुरू करू शकला नाही. नियमांनुसार, कोणत्याही संघाला ६० सेकंदात षटकाची सुरुवात करावी लागते, परंतु भारताविरुद्ध असे तीन वेळा घडले जेव्हा अमेरिकन संघ वेळेवर नवीन षटक सुरू करू शकला नाही, त्यामुळे ५ धावांचा दंड ठोठावण्यात आला.

तत्पूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून अमेरिकेला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले, परंतु वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सुरुवातीच्या षटकात अमेरिकेला दोन धक्के देत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करण्यासाठी उतरली तेव्हा पहिले षटक डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला देण्यात आले. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट घेतली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने शायन जहांगीरला पायचीत टिपले. जहांगीरला खातेही उघडता आले नाही. याच षटकात अर्शदीपने आणखी एक विकेट घेतली. त्याने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अँड्रिज गॉसला (२) हार्दिक पांड्याकडे झेलबाद केले. या दोन विकेट घेताच अर्शदीपने विक्रम केला. टी२० विश्वचषकात सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा तो पहिला भारतीय आणि एकूण चौथा खेळाडू ठरला.

सुरुवातीच्या धक्क्यानंतर, अमेरिकेची फलंदाजी खूप दडपणाखाली आली आणि पॉवरप्लेमध्ये केवळ एका चौकारासह केवळ १८ धावा केल्या. पहिल्याच षटकात दोन विकेट गमावल्यानंतर अमेरिकेची संपूर्ण जबाबदारी स्टीव्हन टेलर आणि ॲरॉन जोन्स या अनुभवी फलंदाजांवर येऊन पडली. भारतीय गोलंदाजांनी पॉवरप्लेवर वर्चस्व गाजवले. पहिल्या ६ षटकांत २ गडी गमावून अमेरिकेच्या फलंदाजांना केवळ १८ धावा करता आल्या. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताविरुद्ध पॉवरप्लेमध्ये केलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी मीरपूर येथे टी२० विश्वचषक २०१४ मध्ये भारताविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये वेस्ट इंडिजने विकेट न गमावता २४ धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर १८/२ ही अमेरिकेची टी२० इंटरनॅशनलमधील पॉवरप्लेमधील सर्वात कमी धावसंख्या आहे.

अमेरिकेच्या नितीश कुमार आणि स्टीव्हन टेलरने ह्या खेळपट्टीवर टिकून फलंदाजी केली ज्यावर फलंदाजी करणे कठीण होते. अमेरिकेकडून नितीश कुमारने २३ चेंडूंत दोन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने सर्वाधिक २७ धावा केल्या तर टेलरने ३० चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने २४ धावा केल्या. ९व्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या शिवम दुबेविरुद्ध टेलरने षटकार ठोकला. १२व्या षटकात अक्षरविरुद्ध डावातील दुसरा षटकार मारल्यानंतर तो त्रिफळाचीत बाद झाला. यानंतर नितीशने हार्दिकविरुद्ध सरळ षटकार आणि चौकार मारले, तर न्यूझीलंडकडून खेळलेल्या कोरी अँडरसनने (१५) अक्षरचा चेंडू प्रेक्षकांच्या दिशेने पाठवला. शेवटच्या तीन षटकात ३२ धावा दिल्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने अर्शदीपकडे चेंडू सोपवला आणि या गोलंदाजाने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या नितीशला तंबूमध्ये पाठवले. नितीश बाद झाल्यानंतर अमेरिकेचा डाव पुन्हा एकदा फसला आणि मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.

अर्शदीप सिंगला ९ धावांमध्ये ४ गडी बाद केल्याबद्दल सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्या सकाळी ६ वाजता वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड आणि रात्री ८ वाजता बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स तर मध्यरात्री १२:३० वाजता इंग्लंड विरुद्ध ओमान सामना होणार आहे.

Share This Article
Leave a comment